स्थापत्य अभियांत्रिकी

धरणे, पूल, रस्ते, कमानी, बोगदे, गोद्या व बंदरे, धक्के, यांच्या बांधकामासाठी स्थापत्य अभियंताच लागतो.
Civil Engineering
Civil Engineeringsakal
Updated on

मागील भागात आपण अभियंत्यांचे चार प्रकार पाहिले. अत्यंत भिन्न प्रकारची कौशल्ये व वृत्ती लागणारे अभियंत्यांचे भिन्न-भिन्न प्रकार अभियंता या एकाच शीर्षकाखाली येतात. त्यामुळेच प्रत्येक प्रकारच्या अभियंत्यांना कोणत्या प्रकारचे ज्ञान, कौशल्ये, वृत्ती लागते? हे आपण यापुढे पाहूया. स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंग.

अभियांत्रिकी प्रकारातला महत्त्वाचा, पण सध्याच्या काळात किंचित दुर्लक्षित झालेला प्रकार. कोणत्याही प्रकारची वास्तू मग ती निवासी असू दे की, कार्यालयीन, शासकीय असू दे की, धार्मिक ती बांधायची असेल, तर स्थापत्य अभियंत्याची गरज पडते. धरणे, पूल, रस्ते, कमानी, बोगदे, गोद्या व बंदरे, धक्के, यांच्या बांधकामासाठीसुद्धा स्थापत्य अभियंताच लागतो.

अलीकडच्या काळात या क्षेत्रात पाणीपुरवठा व मलनिःस्सारण, जलव्यवस्थापन आणि वाहतूकव्यवस्था यांचाही अंतर्भाव झाला आहे. बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यावर बहुतेक सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयात असणारा व महत्त्वाची शाखा असणारा असा हा अभ्यासक्रम!

कौशल्ये व जोखीम

वास्तुविशारदांनी (आर्किटेक्ट) नियोजन आराखडा करून दिला की, त्याचे बांधकामात रूपांतर करणे हे स्थापत्य अभियंत्याचे मुख्य काम. त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य, रसायने, त्यात आलेली नवनवीन तंत्रे-यंत्रे, याचे अद्यायावत ज्ञान असावे लागते. द्विमितीत केलेल्या आरेखनाचे त्रिमितीत असलेल्या बांधकामात रूपांतर करता येणे, मोजमाप, भूमीचे भारग्रहण (भार सहन करण्याची क्षमता) गुणधर्म व तिचे स्थैर्य याचे अंदाज बांधता येणं, भूकंपप्रवण भागात भूकंपरोधक बांधकाम करणे, इमारतीच्या उपयोग प्रकाराप्रमाणे बांधकाम साहित्य व रचना ठरवता येणं हे अतिशय कौशल्याचे व जोखमीचे काम आहे.

आधुनिक तंत्रज्ञान

इमारत बांधणे हे एक मोठे गटकार्य असते. प्रत्यक्ष कामगार, ठेकेदार यांच्याकडून उद्योजक व कायदेतज्ज्ञ यांच्या मार्गदशनाखाली समन्वय साधत काम करून घ्यावे लागते. तसे पाहिले, तर कामाचा मोठा ताण येतो. मोठमोठी कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी साहित्य मिळवणे, त्याची वाहतूक, परवानग्या मिळवणे, पाण्याची व विजेची व्यवस्था करणे ही सगळी कसरतीची कामे असतात.

यात आर्थिक जोखीम मोठ्या प्रमाणावर असते. बहुतेक ठिकाणी अभियंत्यांना प्रत्यक्ष काम करावे लागले नाही, तरी बांधकामावर पर्यवेक्षण (सुपरव्हिजन) करावे लागते. धरणे किंवा रस्ते यांसारख्या मोठ्या कामांमधे अचूक मापनासाठी हवाई छायाचित्रण, कृत्रिम उपग्रह छायाचित्रण, रेडिओ संकेत, लेजर किरणे, ध्वनिशलाका इत्यादींमार्फत मिळालेल्या माहितीचे नकाशांमध्ये परिवर्तन केले जाते.

त्यामुळेच अभियंत्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जाण असणे गरजेचे असते. अलीकडच्या काळात शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक बांधकामाचे तंत्रज्ञान माहीत असणे गरजेचे झाले आहे. वाढत्या लोकसंखेमुळे उपलब्ध स्रोतांच्या मर्यादेमुळे मलनिःस्सारण व पाण्याचा पुनर्वापराचे तंत्र महत्त्वाचे झाले आहे.

प्रत्यक्ष काम

भारतासारख्या विकसनशील देशात मोठ्या प्रमाणात घरे व इतर बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्याच्याकडे आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आहे अशा अभियंत्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे व त्याला संगणक अभियंत्यापेक्षाही जास्त पगार मिळतो. मात्र, स्थिर नियुक्तीचे प्रमाण कमी असते.

वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम पूर्ण होईस्तोवर नियुक्ती दिली जाते, परंतु मागणी खूप असल्याने काम मिळाले नाही असे सर्वसाधारणपणे होत नाही. कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन लक्ष ठेवायचे असल्याने प्रवास करावा लागतो. बऱ्याच वेळा एकापेक्षा अधिक ठिकाणी बांधकाम चालू असते. त्यामुळे प्रवासाचे प्रमाण व ओढाताण वाढते.

कामाचे समाधान

बदलत्या काळात या क्षेत्रात मोठी आव्हाने आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या बांधकामांची गरज निर्माण झाली आहे. गरिबांसाठी स्वस्त, पण मस्त घरांपासून ते वृद्धाश्रमांच्यासाठीच्या विशेष घरांपर्यंत नवनवीन रचना बनवाव्या लागत आहेत. बैठ्या बंगल्यांपासून ५० मजली टोलेजंग इमारतीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मागणी आहे. ग्रामीण भागातही पैसा निर्माण झाल्याने आणि शहरात काम करून निवृत्त झाल्यानंतर शहराच्या धकाधकीपासून दूर जाऊन राहण्याची इच्छा असलेले खूप जण आहेत.

त्यामुळे ग्रामीण भागातही टुमदार बंगले बांधून देण्याची मोठी मागणी आहे. मात्र, या कामासाठी ग्रामीण भागात जायची तयारी हवी. हे कार्यक्षेत्र थोडे असले तरी, या अभियंत्यांना शहराचे सुशोभीकरण केल्याचे, एखादी विशेष वास्तू उभे केल्याचे श्रेय मिळते. देशावर अथवा शहरावर आपला ठसा उमटवता येणे याचा आनंद काही औरच असतो, नाही का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com