पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांसाठीचे मोफत अनिवासी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांकडून येत्या १४ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
यासाठी यंदा ३०० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. ही निवड करण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. ही सीईटी येत्या २७ ऑगस्ट रोजी घेतली जाणार असून, यामध्ये गुणानुक्रमे आणि संवर्गानिहाय पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असल्याचे ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांनी सांगितले.
या सीईटी परीक्षेसाठी इच्छुकांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. यानुसार इच्छुकांनी त्यांचे अर्ज करण्यासाठी www.siac.org.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन सुनील वारे यांनी केले आहे.
राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील (एससी) एकूण ३००विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. यासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या ( पूर्व व मुख्य) पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी पुरस्कृत केले जाणार आहे.
या ३०० जागांपैकी महिलांसाठी ३० टक्के जागा (९० जागा) या महिलांसाठी, दिव्यांग व्यक्तीसाठी (Person With Disability) ४ टक्के जागा (१२ जागा) आणि अनुसूचित जातीअंतर्गत येत असलेल्या वंचित जातींमधील (वाल्मीकी व तत्सम जाती उदा. होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी आदी) विद्यार्थ्यांकरिता ५ टक्के जागा (१५ जागा) राखीव असणार आहेत.
मोफत प्रशिक्षणासाठी आवश्यक पात्रता
- इच्छुक विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा
- संबंधितांकडे राज्यातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा
- इच्छुक विद्यार्थी हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
- इच्छुकाचे वय हे संघ लोकसेवा आयोगाच्या अटी व शर्तीनुसार असावे
- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी पात्र असावा
- वार्षिक उत्पन्न कमाल ८ लाखापर्यंत असावे
दरमहा प्रत्येकी १३ हजार रुपयांचे विद्यावेतन
या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षण शुल्क भरण्यात येते. याशिवाय हे प्रशिक्षण अनिवासी असल्याने या विद्यार्थ्यांना दिल्ली येथील निवास व भोजनाची व्यवस्थेकरिता दरमहा प्रत्येकी रक्कम १३ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते.
या प्रशिक्षणाच्या सुरवातीस दिल्ली येथे जाण्याकरिता प्रत्येकी पाच हजार रुपये (फक्त एकदा) आणि प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासाकरिता प्रत्येकी पाच हजार रुपये (फक्त एकदा) प्रवास खर्च दिला जातो. तसेच पहिल्या महिन्यासाठी आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी तीन हजार रुपये हे एकरकमी) दिले जातात, असे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.