भारतीय नौदलात तांत्रिक क्षेत्रात भरती करण्यासाठी बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दर वर्षी संधी उपलब्ध असतात. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दहावीनंतर बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयांसह कमीत कमी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
याशिवाय ते शारीरिकदृष्ट्या सक्षम असावेत. उमेदवारांची उंची कमीत कमी १५७ सेंटिमीटर असायला हवी व त्यांचे वजन उंचीनुरुप असावे. उमेदवारांची दृष्टी निकोप असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत दर वर्षी सर्वसाधारणपणे जून महिन्यात ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ व ‘रोजगार समाचार’ यासह अन्य प्रमुख वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित करण्यात येते. या जाहिरातीनुरुप अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना सैनिकी निवड मंडळातर्फे सर्वसाधारणपणे सप्टेंबरमध्ये बंगळूर वा भोपाळ येथे सैन्य निवड मंडळाच्या निवड चाचणी व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलाविण्यात येते.
सैनिक निवड मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या चार दिवस कालावधीच्या निवड चाचण्यांमध्ये मानसशास्त्रीय निवड परीक्षा, वैयक्तिक परीक्षा, समूहचर्चा, बुद्ध्यांक चाचणी व प्रत्यक्ष मुलाखत इत्यादींचा समावेश असतो. त्यानंतर उमेदवाराची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येऊन त्यातून उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते.
नौदलात निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण साधारणपणे जानेवारी महिन्यात सुरू होते. उमेदवारांना सुरुवातीचे सहा महिने गोव्यातील नौदल अकादमीत प्राथमिक प्रशिक्षण देण्यात येऊन त्यांना त्यानंतरच्या चार वर्षांमध्ये नौदलाच्या लोणावळा येथील आयएनएस शिवाजी या विशेष प्रशिक्षण केंद्रात तांत्रिक शिक्षण दिले जाते. हे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची बीटेक पदवी पात्रता देण्यात येते.
निवड झालेल्या उमेदवारांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना मिडशिपमॅन म्हणून सुरुवातीला पाठ्यवेतन देण्यात येते. त्यानंतर उमेदवारांना ऍव्हिंग सच - लेफ्टनंट, लेफ्टनंट, कमांडर अशा भविष्यकालीन बढतीच्या संधी उपलब्ध असतात.
बारावी झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना भारतीय नौदलातील या आव्हानपर व आकर्षक संधींचा लाभ घ्यायचा असेल अशांनी जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह पाठविण्याचा पत्ता ः डायरेक्टर ऑफ मॅनपॉवर प्लॅनिंग अँड रिक्रूटमेंट, नौदल मुख्यालय, कक्ष क्र. २०४, ‘सी’ विंग, सेनाभवन, नवी दिल्ली ११० ०११.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.