नाशिक : इयत्ता दहावीचा निकाल अद्याप जाहिर झालेला नसला तरी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेतील पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. तंत्रनिकेतनमध्ये पदविका (डिप्लोमा) शिक्षणक्रमास प्रवेशासाठी बुधवार (ता.३०) पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. पात्र विद्यार्थ्यांना २३ जुलैपर्यंत ऑनलाइन स्वरुपात अर्ज भरता येणार आहे. (deadline for diploma admission after 10th is till 23rd July)
कोरोना महामारीमुळे इयत्ता दहावीची परीक्षा रद्द झाली असून, अद्याप निकालही प्रलंबित आहे. असे असतांना दहावीनंतर तंत्रशिक्षण शाखेचा पर्याय असलेल्या पदविका प्रवेशाकरीता विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाने दार खुले केले आहे. पॉलीटेक्नीक अर्थात तंत्रनिकेतनमध्ये पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्वरुपात अर्ज करायचा आहे. तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असेल.
कागदपत्र पडताळणीसाठीदोन पर्याय उपलब्ध
तंत्रशिक्षण संचालनालयाने गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही ई-स्क्रुटीनी व प्रत्यक्ष स्क्रूटीनी असे दोन पर्याय कागदपत्र पडताळणीसाठी उपलब्ध केले आहे. त्यानुसार ई-स्क्रूटीनीमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रांची स्कॅनकॉपी अपलोड करायची आहे. तर प्रत्यक्ष स्क्रूटीनी निवडणार्या विद्यार्थ्यांना सुविधा केंद्रामार्फत कागदपत्रे स्कॅन व अपलोड करता येतील.
अशी असेल प्रक्रिया
दहावीचा निकाल लागलेला नसल्याने परीक्षेकरीता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा आसन क्रमांक भरुन अर्ज भरता येईल. संबंधित विद्यार्थ्यांचे दहावीचे गुण शिक्षण मंडळाकडून प्राप्त होणार्या निकालाच्या माहितीवरुन थेट घेतले जातील. सीबीएसई, आयसीएसई बोर्डातील विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल प्राप्त झाल्यानंतर शैक्षणिक पात्रता तपशील भरुन अर्ज पूर्ण करता येईल. विद्यार्थ्यांनी अर्ज छाननीची योग्य पद्धत निवड करून ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांचे स्कॅन छायाप्रति अपलोड करावे लागतील. त्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदत असणार आहे.
असे आहे प्रक्रियेचे नियोजन
सध्याच्या वेळापत्रकानुसार २६ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाईल. यासंदर्भातील तक्रार, हरकती नोंदविण्यासाठी २७ ते २९ जुलै असा कालावधी उपलब्ध असेल. ३१ जुलैला अंतीम गुणवत्ता यादी जाहिर केली जाईल. व त्यानंतर कॅप राउंडच्या माध्यमातून प्रवेश निश्चितीची प्रक्रिया पार पडेल.
दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अर्ज भरतांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. तत्पूर्वी अर्ज प्रक्रियेविषयीच्या सर्व सूचना व्यवस्थित समजून घ्याव्यात.
- डी. पी. नाठे, सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय.
(deadline for diploma admission after 10th is till 23rd July)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.