आपण मागील दोन लेखांपासून मज्जासदृश जालीय प्रारूपाविषयी जाणून घेतो आहोत. आजच्या लेखात त्याविषयी आणखी काही माहिती घेऊया! कृत्रिम मज्जातंतूचे कार्य आपण मागच्याच लेखात सोदाहरण पाहिले : यामध्ये दोन भागांत गणन केले जाते. प्रथम आपण प्रत्येक गुणवैशिष्ट्याला त्याच्या भाराने गुणून आणि त्यांची बेरीज करून उत्तर मिळविले जाते. हे उत्तर एक संख्या स्वरूपात असते. या प्रक्रियेला ‘रेषीय संयोजन’ असे म्हणतात. यातून मिळालेले उत्तर आपण नॉन-लिनिअर फंक्शनमध्ये पाठवतो आणि त्यापासून अंतिम उत्तर मिळवतो. या प्रक्रियेला activation किंवा सक्रियकरण असे म्हणतात. तर, असे रेषीय संयोजन आणि सिग्मोईड सक्रियकरण करणारा एक कृत्रिम मज्जातंतू स्वरूपातील प्रारूप ‘लॉजिस्टिक रिग्रेशन’ या नावाने ओळखले जाते. मज्जासदृश जालीय प्रारूपांमध्ये आपण अशा कृत्रिम मज्जातंतूचे जाळे तयार करतो. उदाहरणादाखल पुढील आकृतीमध्ये असे एक प्रारूप दाखविले आहे.
हेही वाचा : ‘एआय’च्या व्यवहार्यतेचा अभ्यास!
या प्रारूपाचे स्वरूप समजावून घेऊया. यामध्ये मुख्यत्वे तीन थर दिसतात. प्रथम स्तरावर गुणवैशिट्ये आहेत. येथे कृत्रिम मज्जातंतूंचा वापर केला जात नाही. त्यानंतरच्या दोन थरांमध्ये कृत्रिम मज्जातंतूंचा वापर केलेला पाहायला असतो. प्रारूपाचे वर्णन करताना कृत्रिम मज्जातंतू वापरलेल्या थरांचा उल्लेख केला जातो. या प्रारूपामध्ये दोन गुणवैशिष्ट्यांचा समावेश आहे आणि त्यांच्यावर प्रक्रिया करून आपल्याला उत्तर (y) प्राप्त होते (हे उत्तर संख्येच्या स्वरूपात किंवा एखाद्या वर्गवारीच्या स्वरूपात आढळते.) या प्रारूपामध्ये दोन थर किंवा स्तर आहेत, पहिला थर प्रच्छन्न (लपलेला) आहे असे म्हटले जाते आणि दुसरा थर दृश्य स्वरूपाचा आहे. या प्रारूपाला द्विस्तरीय प्रारूप म्हणतात. पहिला स्तर प्रच्छन्न आणि दुसरा दृश्य! याव्यतिरिक्त प्रत्येक प्रारूपातील मज्जातंतूंची संख्या त्याच्या निवारणासाठी वापरली जाते - येथे पहिल्या स्तरात २, तर दुसऱ्या स्तरामध्ये १ कृत्रिम मज्जातंतू वापरला आहे. थोडक्यात, आपण द्विस्तरीय जालीय प्रारूपाचा वापर केला आहे - प्रथम स्तरामध्ये दोन तर दुसऱ्या स्तरामध्ये एक मज्जातंतू वापरला आहे.
हेही वाचा : ‘एआय’ आणि स्टार्टअप संस्कृती
तालीम संचातील प्रत्येक उदाहरणाची गुणवैशिष्ट्ये प्रथम स्तरातील कृत्रिम मज्जातंतूंना दिली जातात त्यावर प्रक्रिया होऊन मिळाले उत्तर हे दुसऱ्या स्तरातील मज्जातंतूला दिले जाते. येथे दोनच थर असल्याने दुसऱ्या स्तरातून आपल्याला अपेक्षित उत्तर प्राप्त होते. पहिल्या स्तरातील प्रत्येक मज्जातंतूमधील रेषीय संयोजन प्रक्रियेमध्ये तीन गुणकांचा समावेश आहे. या स्तरावर आपण दोन मज्जातंतू वापरत असल्यामुळे एकूण सहा गुणकांचा किंवा पॅरामीटर्सचा वापर करतो. दुसऱ्या स्तरावरील एकमेव मज्जातंतूला दोन इनपुट्स आहेत आणि पूर्वभाकीतच एक असे एकूण तीन गुणक आहेत. अशा प्रकारे दोन्ही स्तरांवर मिळून एकंदरीत नऊ गुणकांचा वापर या प्रारूपामध्ये केला आहे. यामध्ये गणन कसे होते आणि हे गुणक तालीम संचावरून कसे शिकायचे हे पुढील भागात बघूया!
दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.