काळ बदलला, प्रवाह बदलला, शिक्षण पद्धती बदलतेय, विद्यार्थी आणि त्याप्रमाणे शिक्षक/प्राध्यापक ही बदलले. सध्याचा काळ शिक्षण क्षेत्रातील बदलांचा आणि संक्रमणाचा आहे.
- प्रा. डॉ. गणेश काकांडीकर
काळ बदलला, प्रवाह बदलला, शिक्षण पद्धती बदलतेय, विद्यार्थी आणि त्याप्रमाणे शिक्षक/प्राध्यापक ही बदलले. सध्याचा काळ शिक्षण क्षेत्रातील बदलांचा आणि संक्रमणाचा आहे. मेकॉलेची शिक्षण पद्धती पूर्णपणे उखडून टाकून परंपरागत, गौरवशाली आणि मूल्याधारित भारतीय शिक्षण प्रणालीकडे जाताना प्राध्यापकांची भूमिका महत्त्वाची आहे. कोरोनाने एकूणच शिक्षण क्षेत्राची परीक्षा घेतली. प्राध्यापकांना सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली. ती म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या जाळ्याचा वापर करून संगणक वा भ्रमणध्वनीच्या साहाय्याने आभासी वर्ग घेण्याची.
याबद्दल माहीत असूनही प्रभावीपणे वापर करण्याचा कधी प्रश्नच आला नव्हता. हा काळ प्राध्यापकांच्या खडतर प्रशिक्षणाचा व संघर्षाचा होता. स्वयं प्रशिक्षणाची एक नवी गाथा सुरू झाली. तुटपुंज्या साधनांचा व सुविधांचा उपयोग करून झूम, गूगल मीट, वेबेक्स, मायक्रोसॉफ्ट टीम या आणि इतर शिक्षण व्यवस्थापन प्रणाली अगदी कमी अवधीत अवगत केल्या आणि अध्यापन अविरतपणे सुरू ठेवले. मुले समोर असताना विषयाची प्रभावीपणे मांडणी करणे आणि या प्रणाली वापरून शिकविणे यात खूप फरक होता, त्यासाठीही बरीचशी मानसिक तयारी करावी लागली. एक तास वर्गात मनसोक्तपणे वावरत असताना मुक्त असलेला प्राध्यापक खुर्चीत बसून जरा अवघडलाच, त्यासाठी मानसिकतेत थोडा बदल करावा लागला. तो अंगीकारून संकटावर मात करत शिक्षणाचा झरा अखंड ठेवला.
नवीन शिक्षण प्रणालीतील घटकांचा अभ्यास केल्यास असे आढळून येईल की, विद्यार्थ्यांची समग्र प्रगती हाच याचा मूळ गाभा आहे. विखुरलेल्या उच्च शिक्षण संस्था पासून बहूशाखीय विद्यापीठांची रचना ही काळाची गरज आहे. शिक्षण संस्था आणि प्राध्यापक यांना जास्तीत जास्त स्वायतत्ता प्रदान करून सक्षम करणे हे गर्भित उद्दिष्ट आहे. प्रशिक्षण, संशोधन आणि समुदायाप्रती प्रतिबद्धता हे शिक्षण संस्थांचे स्वरूप असेल आणि त्यातूनच राष्ट्रविकास साधला जाईल. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आल्हाददायक आणि आश्वासक वातावरण निर्मिती करून प्रगत अभ्यासक्रमांच्या साहाय्याने, अद्यापनशास्त्राच्या विविध तंत्रांचा वापर करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल. नोकरी करताना ज्यांना उच्च शिक्षण घ्यावयाचे आहे त्यांना सुवर्ण संधी असेल. हुशार विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या प्राप्त करता येतील. शैक्षणिक श्रेयांक पेढी अभ्यासक्रमांच्या लवचिकतेतून शिक्षणाच्या विस्तारीकरणाला हातभार लावेल.
शिक्षण क्षेत्रातील या सगळ्या महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक बदलांच्या अंमलबजावणीमध्ये प्राध्यापकांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. किंबहुना या सर्व बदलांचा केंद्रस्थानी शिक्षक वर्गच असेल. विविधांगी भूमिका स्वीकारून प्राध्यापकांना विद्यार्थ्यांसाठी पोषक वातावरण निर्मिती करावी लागेल. पारंपरिक विचार सरणीला छेद देऊन, आंतरशाखीय आणि बहुशाखीय शिक्षण प्रणालीचा स्वीकार आणि अंगीकार करावा लागेल. विद्यापीठे अधिकाधिक विद्यार्थीकेंद्रित कशी होतील याची काळजी घ्यावी घेऊन त्यांची समाजाप्रती कर्तव्ये जपावी लागतील. मागच्या शतकातील शिक्षण क्षेत्राच्या अत्यंत महत्त्वाच्या कालखंडाचा घटक होण्याची ही सुवर्ण संधी आहे. प्राध्यापकांची पिढी या सर्व बदलांचे व्यवस्थापन करून, त्यांचा बौद्धिक योगदानातून समाज निर्मिती साधतील याबाबत मी आश्वस्त आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.