टेक करिअर : रोबोटिक्स, इंडस्ट्रिअल इंटरनेट ऑफ थिंग्ज

महापालिकांच्या मलनिस्सारण वाहिन्यांमध्ये दुरुस्तीसाठी अजूनही माणसाला उतरावे लागते आणि त्यात अनेक वेळा गुदमरून कामगारांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचतो.
Robotics
RoboticsSakal
Updated on
Summary

महापालिकांच्या मलनिस्सारण वाहिन्यांमध्ये दुरुस्तीसाठी अजूनही माणसाला उतरावे लागते आणि त्यात अनेक वेळा गुदमरून कामगारांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचतो.

- प्रा. डॉ. गणेश काकांडीकर

महापालिकांच्या मलनिस्सारण वाहिन्यांमध्ये दुरुस्तीसाठी अजूनही माणसाला उतरावे लागते आणि त्यात अनेक वेळा गुदमरून कामगारांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचतो. रेल्वे रूळांवरती त्यांची देखभाल करण्यासाठी दररोज मैलोन मैल चालत जाणारे कष्टकरी किंवा साध्या पिठाच्या गिरणीतील कामगार ते आस्थापनांमध्ये रंगांची फवारणी करणारा कामगार वा शेतांमध्ये कीटकनाशकाची फवारणी करणारा शेतकरी या सर्वांच्या श्‍वसनातून पिठाचे बारीक कण/रंग कण/रसायने त्यांच्या फुफुसात जातात, ज्यामुळे जिवाला धोका संभवतो.

रोबो हेच उत्तर!

या झाल्या काही प्रातिनिधिक घटना, एकविसाव्या शतकात अशा क्लिष्ट, अपायकारक आणि धोकादायक कामांसाठी अजूनही मानवाला जोखीम पत्करावी लागते हे सत्य आहे, पण हे अभिमानास्पद नाही. याला ह्याला काहीच उपाय नाही का? नक्कीच आहे, तो म्हणजे रोबो-यंत्रमानव. ज्या ठिकाणी मानवाच्या जीवाला धोका संभवतो किंवा अत्यंत कष्टकारक काम करण्यासाठी मानवांऐवजी यंत्रमानवांचा उपयोग केला जाऊ शकतो आणि ती वेळ आता आली आहे. स्वयंगती यंत्र, ज्याच्या हालचाली संगणक प्रणालींद्वारे नियंत्रित करता येतात आणि जे विशिष्ट कार्ये अगदी अचूकतेने कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय करू शकते त्याला यंत्रमानव असे संबोधतात. साधारणतः १९५०च्या दरम्यान ‘युनिमेट’ या पहिल्या यंत्रमानवाची निर्मिती जॉर्ज देओल या वैज्ञानिकाने केली. सर्वांत प्रथम ‘युनिमेट’चा वापर १९६१मध्ये जनरल इलेक्ट्रिक या कंपनीमध्ये करण्यात आला. रोबोट ही रोबोटा या झेक शब्दापासून घेतलेली संकल्पना असून, त्याचा अर्थ सक्तीचा कामगार (गुलाम) असा होतो. यंत्र मानवांचा उपयोग आतापर्यंत प्रामुख्याने उत्पादन आस्थापनांमध्ये करण्यात आला. बदलत्या परिस्थितीनुसार, चांगल्या दर्जाची उत्पादने कमी किमतीत आणि कमी वेळात उपलब्ध होण्यासाठी तसेच मानवाच्या जीवाला असलेला धोका टाळण्यासाठी रोबोट्स वापर सुरू झाला. आजच्या परिस्थितीत उत्पादनात एकावेळी अनेक रोबोट्स एकत्रितपणे वापरात असलेले दिसतात, या समूहाला स्वार्म रोबोटिक्स म्हणजेच यंत्र मानवांचा थवा असे संबोधले जाते.

शस्त्रक्रिया आणि शुश्रूषा

येत्या काळात यंत्र मानवांच्या अनुप्रयोगांचा परीघ वाढत जाणार आहे. हिमालयासारख्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीत सैनिकांऐवजी यंत्रमानवांचा उपयोग केला जाऊ शकतो, अमेरिकेने तो चालूही केला आहे. वैद्यकीय क्षेत्र हे यंत्र मानवांच्या उपयोगासाठी अत्यंत नावीन्यपूर्ण आहे. शास्त्रक्रियेसोबतच रुग्णांवर उपचार आणि शुश्रूषा यासाठी त्यांचा वापर प्रभावीपणे केला जाऊ शकतो. निष्णात डॉक्टर्स कुठूनही अगदी दूरच्या रुग्णावर यंत्रमानवाच्या साहाय्याने यशस्वी शस्त्रक्रिया करू शकतात. कोरोना काळात भारतात दवाखान्यात यंत्रमानव असते, तर कदाचित आपण काही डॉक्टरांचा जीव निश्‍चितच वाचवू शकलो असतो. याच बरोबर शेती, अंतराळ संशोधन, पाण्याच्या खालील संशोधन, दैनंदिन जीवनातील गरजा जसे, सुरक्षा, घराची स्वच्छता, अन्न प्रक्रिया, करमणूक इत्यादी क्षेत्रात ही उपयोग वाढेल. मानवरहित हवाई वाहन हे कुठल्याही वैमानिकांशिवाय उडू शकते, आता त्याला प्रचलित भाषेत आपण ड्रोन म्हणून ओळखतो, जो रोबोटिक्सचाच एक प्रकार आहे.

हे वाहन मानवरहित विमान प्रणालीचा एक भाग असून, ज्याचे उड्डाण जमिनीवरील दूरस्थ नियंत्रणाद्वारे संदेशवहनातून केले जाते. हेरगिरी, टेहळणी आणि हल्ला/आक्रमण यापासून सुरु झालेला ड्रोनचा प्रवास, संरक्षण क्षेत्रात प्रतिमा प्रक्रियांचा वापर करून आता भूसुरंगाचा शोध लावण्यासाठी अतिशय प्रभावीपणे केला जात आहे. हवाई छायाचित्रण हे नागरी अनुप्रयोगांमध्ये अत्यंत सोपे झाले आहे. पिकांची पाहणी व त्यावरील रोगांची माहिती गोळा करण्याकरिता ड्रोन उपयोगात आणले जात आहेत. संकटांमध्ये शोध आणि बचाव कार्य, विजेच्या तारांची पाहणी, अनधिकृत बांधकामांचे नियंत्रण, जमिनींचे सर्वेक्षण, भूस्खलन मोजणी, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासाच्या मार्गाची टेहळणी या नवीन क्षेत्रांचा समावेश होत आहे. जंगलातील प्राण्यांची गणना, जंगलातील आगीचा पाहणी आणि शोध, शिकाऱ्यांचा शोध या विशिष्ट कार्यांच्या अन्वेषणातही आता ड्रोन्स वापरले जात आहेत.

भविष्यात अनेक करिअर संधी

पेरू मधील शास्त्रज्ञांनी पुरातत्त्व अभ्यासासाठी या हवाई वाहनांचा उपयोग चालू केला आहे. अतिदुर्गम भागात औषधी आणि छोटी वैद्यकीय उपकरणे पाठविण्यासाठीचा प्रयोग सुद्धा डीएचएल या जगप्रसिद्ध मालवाहतूकदाराने केला आहे आणि तो यशस्वी ठरला आहे. इंडस्ट्रिअल इंटरनेट ऑफ थिंग्ज हे बुद्धिमान साधनांचे जाळे असून, ही प्रणाली माहितीचे संकलन, देवाणघेवाण, अवलोकन आणि विश्लेषण करते. यंत्रमानव जेंव्हा थव्यांमध्ये काम करतात तेव्हा इंडस्ट्रिअल इंटरनेट ऑफ थिंग्स चा वापर केला जातो. या प्रणाली मध्ये संवेदक आणि प्रेरकांचा उपयोग केला जातो. या माहितीवरूनच अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. कृत्रिम बुद्धिमत्ता हे सर्वच क्षेत्रासाठी जणू आता वरदानच ठरत आहे. मानवी बुद्धिमत्तेला यंत्र प्रणालीमध्ये वापरून त्यांना मानवाप्रमाणे निर्णय घेण्यास तयार करणे यास कृत्रिम बुद्धिमत्ता असे संबोधतात. यंत्र मानवांना अत्यंत प्रगत अशा क्षमतांनी सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्दीमत्तेचाच उपयोग केला जातोय. या क्षेत्रात काम करण्यासाठी चार पर्याय उपलब्ध आहेत. यंत्रमानव निर्मिती, यंत्रमानव आज्ञावली निर्मिती, नवीन अनुप्रयोगांचा शोध घेणे आणि कृत्रिम बुद्धीमत्ता. रोबोटिक्स या क्षेत्राचा भविष्यातील विस्तार पाहता यंत्र अभियांत्रिकी, यंत्रमानव अभियांत्रिकी, अणुविद्युत अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी या शाखांच्या विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक संधी उपलब्ध होतील.

(लेखक डॉ. विश्वनाथ कराड एम.आय.टी. विश्वशांती विद्यापीठ येथे प्राध्यापक व संकुल प्रमुख आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.