वेगळ्या वाटा : ‘केमिकल इंजिनिअरिंग’चे क्षेत्र खुणावतंय..!

अनेक विद्यार्थी ‘रासायनिक अभियंता’ बनण्याचे स्वप्न पाहत करिअरची सुरूवात करू पाहत आहेत.
Chemical Engineer
Chemical EngineerSakal
Updated on

- डॉ. सदानंद गुहे

पारंपरिकरीत्या करिअरचा विचार करीत असताना विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी आणि मेडिकल शाखेकडे कल दिसतो. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसतात. अभियांत्रिकीच्या प्रत्येक शाखेत करिअरच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत.

अनेक विद्यार्थी ‘रासायनिक अभियंता’ बनण्याचे स्वप्न पाहत करिअरची सुरूवात करू पाहत आहेत. अभियांत्रिकीची शाखा रसायन प्रक्रियेच्या अभियांत्रिकीमध्ये, नवीन उत्पादनांच्या तंत्रज्ञानाचा विकास आणि संबंधित तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी कार्य करते. रासायनिक अभियंता मानवाचे दैनंदिन जीवनमान आणि राहणीमानाचा दर्जा वाढवत असतात.

रासायनिक अभियंत्याचे मुख्य कार्य म्हणजे नैसर्गिक रासायनिक कच्चामाल, त्यांचे घटक आणि सामग्री याच्यावर प्रक्रिया करून उपयुक्त आणि वातावरणाला कमी हानिकारक रासायनिक उत्पादनांमध्ये रूपांतर करणे होय. हे क्षेत्र कच्च्या मालास उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतरित करण्यासाठी रासायनिक प्रक्रिया विकसित करते.

यासह, रासायनिक अभियांत्रिकी केमिकल प्लांट्सचे डिझाइन, देखभाल, देखरेख, बांधकाम, स्थापना व कार्यान्वयन संबंधी कामदेखील करतात. या क्षेत्रातील अभियंते बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, मिनरल प्रोसेसिंग, सिंथेटिक फायबर, पेट्रोलियम रिफायनिंग, प्लांट्स डिझाईन, रासायनिक प्रक्रीया, त्याचे विघटन व नियोजन व कंट्रोल इत्यादी ज्ञान एकत्र करीत असतात आणि व्यावसायिक स्तरावर या ज्ञानाचा समाजोपयोगासाठी उपयोग करतात. म्हणून रासायनिक अभियंत्यांना ‘युनिव्हर्सल इंजिनिअर’ असेही संबोधले जाते.

रासायनिक अभियंता बनण्यासाठी यातील विविध अभ्यासक्रमांसाठी असलेली प्रवेश प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या संस्था आपल्या पातळीवर यास्तव परीक्षा घेत असतात. तसेच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून देशातील संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा पर्याय विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असतो.

दहावीनंतर पॉलिटेक्निक डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी रासायनिक अभियांत्रिकीच्या चार वर्षाच्या बी.टेक अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ शकतात. बी.टेक पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये एम.टेक करू शकतात.

रासायनिक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तेल आणि वायू उद्योग, रसायने उत्पादन उद्योग, पेट्रोलियम उद्योग, खाद्य क्षेत्र, रबर उद्योग, वस्त्रोद्योग, कागद उद्योग, एरोस्पेस उद्योग, प्लास्टिक उद्योग, सिमेंट उद्योग, औषधे, प्रदूषण नियंत्रण, सोप्स आणि डिटर्जंट.

घनकचरा, प्रदूषित पाणी व्यवस्थापन शुद्धीकरण व पुनर्वापर, सेमीकंडक्टर व इलेक्ट्रिक व्हेईकल उद्योग, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, खत उद्योग, ऊर्जा उद्योग, फार्मास्युटिकल्स, सरकारी विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. यशस्वी रासायनिक अभियंता बनण्यासाठी तांत्रिक कौशल्ये, प्रकल्प व्यवस्थापन, क्रिटिकल थिंकिंग, समस्या सोडवण्याची, ऑपरेशनल, संघटनात्मक, वैयक्तिक आणि संभाषण कौशल्ये आवश्यक आहेत.

(लेखक ‘एमजीएम’ विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.