- डॉ. उमेश दे. प्रधान
विद्यार्थी म्हणून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची हेच शाळेतून शिकवले जात असेल. मात्र, आज मी तुम्हाला उत्तरांविषयी नाही, तर प्रश्नांविषयी सांगणार आहे. अभ्यास करताना तुम्हाला प्रश्न पडत असेल तर त्याचा सरळ अर्थ तुम्ही शिकत आहात. एकवेळ उत्तर सापडेल किंवा नाही मात्र प्रश्न हे पडायलाच हवेत. आपल्याला प्रश्न पडला म्हणजे आपल्याला अभ्यासातील येत नाही, असा अर्थ होत नाही. उलट समजून घेण्याच्या प्रक्रियेमधला तो एक महत्त्वाचा टप्पाच आहे.
बरं मग प्रश्न म्हणजे नेमकं काय? कोणतीही संकल्पना, विषय समजून घेताना आलेली समस्या, अडचण किंवा एखादी गोष्ट आपल्या तत्त्वात न बसणं, मनात येणारी शंका म्हणजे प्रश्न. समस्येचा दुसऱ्या बाजूने विचार करताना मनात येणारा विचार, आपल्या मताशी कुणी सहमत आहे, की नाही हे समजून घेणं हे सर्व प्रश्नाच्या मुळाशी असते. अभ्यास करताना असे तुम्हाला कधी जाणवले का?
पाठ्यपुस्तकात जे सांगितले आहे ते किंवा शिक्षक सांगत आहेत ते आपल्याला जसेच्या तसे पटते का? नाही ना, मग तिथेच तर प्रश्नाचा उगम होतो. मग असे मनात येणारे प्रश्नच तुम्हाला अभ्यासाची दिशा देतील. विज्ञानात, गणितात जे शोध लागले त्याच्या मुळाशी शास्त्रज्ञांना भेडसावणारे प्रश्नच होते.
प्रश्न म्हणजे काय?
प्रश्न विचारण्यात महत्त्वाचे ते काय? प्रश्न आपल्याला स्वतःचे विचार करायला प्रवृत्त करतात. प्रश्नामागोमाग उत्तर तयार करण्याच्या, मिळवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. त्यामुळे आहे त्या ज्ञानात भर पडायला सुरुवात होते. प्रश्न नवविचार रुजवतो. सरधोपट मार्गाने न जाता एक वेगळाच विचार, कल्पना आपण करायला लागतो.
प्रश्न हे अभ्यासाचे उपयुक्त साधन आहे. त्याच्यामुळे संप्रेषणाचा मार्ग खुला होतो. एखाद्या विषयाबद्दल जास्तीची माहिती मिळवायची असल्यास प्रश्न ही एक गुरुकिल्लीच उपयोगी पडते. परस्परसंवाद सुधारणे, परिस्थितीचे विश्लेषण आणि निदान सुलभ करणे हे प्रश्नाच्या साहाय्याने शक्य होते. स्वतःच्या कल्पना मांडण्याची तयारी ही प्रश्न विचारतानाच होते.
शिकण्यासाठी प्रेरणा आपल्या मनात उमटणाऱ्या प्रश्नांनी होते. प्रश्न हे खऱ्याअर्थी अभ्यासाचे प्रेरक असतात. आपल्यातील सर्जनशीलतेला, कल्पनाशक्तीला, चालना देण्याचे साधन म्हणजेच प्रश्न. त्यामुळे खर शिक्षण हे उत्तरामध्ये नाही तर तुम्हाला वेळोवेळी पडणाऱ्या प्रश्नांमध्ये आहे.
एखाद्या अभ्यासाच्या विषयाकडे आपण जेव्हा सर्वांगाने पाहायला लागतो तेव्हा काही बाबतीत आपली संभ्रमावस्था होऊन जाते. आपली बुद्धी जास्तीची माहिती किंवा कारण शोधायला सुरुवात करते, अगोदर शिकलेल्या बाबींशी आपण तुलना करून पाहायला लागतो, इतर विषयातून जे अभ्यासले त्याच्याशी ताडून पाहायला लागतो. यातूनच प्रश्न निर्मितीला सुरुवात होते. मग आता मनात कोणताही प्रश्नाचा तरंग उठला तर मागे राहू नका.
तो प्रश्नच कदाचित एखाद्या संकल्पनेबाबात विचारांची दिशाच बदलवून टाकेल. नव्याची भर घालेल आणि आपला अभ्यास जास्त परिपूर्ण करेल. केवळ परीक्षेसाठी नाही तर जीवनातील प्रत्येक टप्प्यावर प्रश्न महत्त्वाचे. म्हणून प्रश्न पडायला पाहिजेत आणि ते विचारायलाही हवेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.