संवाद : चिकाटी

अभ्यास करणं ही आपल्या सवयीची बाब आहे. सवय जशी लावाल तशी असते आणि तशी ती वाढत जाते. आपल्या अभ्यासाच्या सवयी काय आहेत? कशा आहेत? हे जरा तपासून पहा.
Study
StudySakal
Updated on
Summary

अभ्यास करणं ही आपल्या सवयीची बाब आहे. सवय जशी लावाल तशी असते आणि तशी ती वाढत जाते. आपल्या अभ्यासाच्या सवयी काय आहेत? कशा आहेत? हे जरा तपासून पहा.

अभ्यास करणं ही आपल्या सवयीची बाब आहे. सवय जशी लावाल तशी असते आणि तशी ती वाढत जाते. आपल्या अभ्यासाच्या सवयी काय आहेत? कशा आहेत? हे जरा तपासून पहा. काही जणांना सतत अभ्यासाचा विषय, जागा, वेळ बदलण्याची सवय असते. काही जण एकच विषय घेऊन बसतात आणि तो सोडत नाहीत. काही जण तासन तास वाचत तरी बसतात नाहीतर लिहीत तरी बसतात. यातून एकच विषय पक्का व्हायला लागतो आणि इतर विषय मात्र कच्चे राहतात. त्यामुळे एक ना धड आणि भाराभर चिंध्या अशी अवस्था होऊन जाते. त्यामुळे अभ्यासाच्या सवयीमधील चिकाटी आवश्यक बनते.

चिकाटी म्हणजे काय तर सोसत राहण्याची वृत्ती. तुम्ही हाती घेतलेला अभ्यास कष्टपूर्वक, सातत्य राखून पूर्ण करणे. अभ्यास करत असताना धरसोड वृत्ती अजिबात उपयोगाची नाही. जे काम हाती घेतलेले आहे ते संपवेपर्यंत दुसऱ्या कामाला हात न लावणे यातच चिकाटी अपेक्षित आहे. कार्य तडीस नेणे आवश्यक असते. ते अर्ध्यावर सोडून काय उपयोग? अनेक वेळा आपण आरंभ शूर असतो, सुरुवातीला सगळा उत्साह असतो परंतु जसजसे आपण पुढे जातो तसतसा आपला उत्साह मावळून केवळ अभ्यास उरकायला सुरुवात होते. तेव्हा आपण चिकाटी घालवून बसतो आणि आपल्यातील चंचलता, केवळ अभ्यासाला स्पर्श करून सोडून देण्याची वृत्ती वाढायला लागते. ज्याचा परिणाम परीक्षेतील यशावर व्हायला लागतो. अभ्यास करताना अडचणी, अपयश हे येणारच. सतत काही यशस्वी होऊच असे नसते. थोडावेळ वाट पहावी लागते, परत परत मेहनत घ्यावी लागते. यासाठीच आपल्या कामात दटून रहाणं, त्यातच गढून जाणं आवश्यक. कोणताही विरोध झाला, सुरुवातीला जमलं नाही तरी कसोशीने प्रयत्न करत राहणं महत्त्वाचं. काहीतरी करण्याचा किंवा साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न करणे हेच तर चिकाटीत अपेक्षित असते. कृती करत राहणे हेच चिकाटीचे उदाहरण आहे.

अभ्यासात मनाची स्थिरता आवश्यक असते. मन सतत वेगवेगळ्या गोष्टी करण्यात बदलत असल्यास आपल्याला अपेक्षित यश मिळणार नाही. त्यामुळे अटल, अविचल राहणे, एका जागचे न हलणे, अभ्यासाची बैठक न मोडणे हे प्रथमत- आवश्यक असते. अभ्यास हातावेगळा केला की आपल्याला एक वेगळेच समाधान मिळून जाते. शिवाय अभ्यासपूर्ण केला की आत्मविश्वास वाढायला लागतो.

परीक्षेच्या काळात आपल्याला एकाच ठिकाणी तीनपेक्षा जास्त तास बैठक लावून बसायचे असते आणि बौद्धिक कामात स्वत-ला जागृत ठेवत काम करायचे असते. अशा वेळेस आपल्याला इतर गोष्टींसाठी अजिबात वेळ नसतो. म्हणूनच एका जागी बसण्याचाही सराव असणं आवश्यक आहे. कदाचित तो एक व्यायामाचा प्रकारच होऊ शकेल.

अभ्यासातील चिकाटी, अनेक प्रकारे फायद्याची ठरू शकते. अभ्यासातील वेग वाढतो, अनेक गोष्टी करण्यासाठी मग वेळ प्राप्त होऊ शकतो. चिकाटीने एकाग्रता वाढण्यास मदत होते, परिणामत- आठवून पहायला सोपे जाते. एकंदरीतच चिकाटीची वृत्ती हेतुपूर्वक जोपासणे हे सुरुवातीपासून केल्यास यश मिळवणे जड जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.