ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन कसेही शिकलात, तरी जोपर्यंत तुम्ही स्वतःहून अभ्यास करायला लागत नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही.
ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन कसेही शिकलात, तरी जोपर्यंत तुम्ही स्वतःहून अभ्यास करायला लागत नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही. या लेखमालेतून आपण अभ्यास करायच्या काही पद्धतींचा विचार केला. अभ्यास कसा करावा याची चर्चा करण्याचे कारण काय? प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने अभ्यास करतच असतो. वेळोवेळी अभ्यास करा, ‘अभ्यास करा’ असा पाढा शिक्षक, पालक यांच्याकडून नेहमीच ऐकावा लागतो. परंतु, अभ्यास करा, म्हणजे नक्की काय करायचं, कोणती कृती म्हणजे अभ्यास ते मात्र सांगितले जात नाही. प्रत्येक जण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने स्वतःला विविध प्रकारे मग्न ठेवत असतो. शिक्षक सांगतील ते, मित्रमंडळी ठरवतील ते, मनाला वाटेल ते असे सर्व प्रकार सुरू होतात.
अभ्यास म्हणजे नक्की काय?
अभ्यास म्हणजे कोणत्याही विषयाबद्दल ज्ञान मिळवण्यासाठी दिलेला वेळ आणि लक्ष.
कोणत्याही विषयाबद्दल ज्ञान संपादनासाठी केलेले शोधन आणि पृथक्करण किंवा विश्लेषण यालाच म्हणायचे अभ्यास.
अभ्यास करायचा असल्यास विविध पद्धती, तंत्रे माहीत करून घेणे गरजेचे आहे.
अभ्यासात स्वतःहून केलेली कृती गृहीतच आहे. अभ्यासासाठी दुसऱ्या कोणीतरी श्रम घेऊन चालत नाहीत. आपला अभ्यास आपल्यालाच करावा लागतो.
त्यामुळे कोणतीही व्यक्ती ज्ञान मिळवण्यासाठी स्वतःहून धडपडत असते कारण वैयक्तिक बौद्धिक विकास हा शेवटी प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतो.
या प्रक्रियेत शिक्षक हा केवळ त्याला मार्गदर्शन करणारा दिशादर्शक असतो.
म्हणूनच अभ्यासाची पद्धती, तंत्रे, प्रक्रिया या विषयी विद्यार्थ्यांशी बोलणे गरजेचे आहे. तरच विद्यार्थी जास्त चांगल्या प्रकारे ज्ञान संपादन करू शकतील.
लक्षात ठेवण्यासाठी...
शिकवून झाल्यानंतर प्रत्येकाला ती माहिती लक्षात ठेवण्यासाठी, त्याचा योग्य वापर करता यावा यासाठी तो पक्का करावा लागतो. तो आत्मसात करावा लागतो. जेणे करून प्राप्त माहितीचा आणि ज्ञानाचा वापर तो कधीही आणि कोठेही करू शकेल. तसेच प्राप्त ज्ञानाचा उपयोग करून आपले वर्तमान आणि भविष्य उज्ज्वल करता येईल. अभ्यासू वृत्ती ही नैसर्गिक असेलही, परंतु प्रत्येकाने स्वतःला प्रशिक्षित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आता अभ्यास ही एक जाणीवपूर्वक केलेली क्रिया म्हणून तिचा विचार केला पाहिजे.
सवयी अभ्यासाच्या
अभ्यासाच्या कोणत्या सवयी आपण स्वतःला लावतो, कोणती पद्धती वापरतो हे समजून घेतले पाहिजे. अभ्यास कसा करावा? अभ्यास मित्रांबरोबर करावा की एकट्यानेच? अभ्यासाची जागा कशी निवडावी? अभ्यासाचे वेळापत्रक कसे बनवावे? या सर्वांविषयी स्पष्टीकरण यापूर्वी दिले आहेच. परीक्षा आहे म्हणून आपण अभ्यास करतो. अभ्यास करण्यामागचे हे एक संकुचित कारण झाले. जीवनात यशस्वीरीत्या जगण्याकरीता ज्या कौशल्यांची आणि माहितीची आवश्यकता असते ते मिळवणे आवश्यक आहे. जीवन आनंददायी होण्यासाठी आवश्यकता असलेले ज्ञान मिळवलेच पाहिजे. म्हणून अभ्यास. केवळ परीक्षेतील यशासाठी आवश्यक आहे म्हणून अभ्यास हा विचार बदलला पाहिजे. त्यामुळे त्यामागील खरी भूमिका, स्वरूप, त्यातील टप्पे समजून घेणे अगत्याचे होईल.
(समाप्त)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.