अभ्यास करताना आपले मन, विचार कसे असतात? ते स्वतःला आनंद देणारे असतात की त्रास निर्माण करणारे. नकोसे वाटणारे असे ते क्षण असतात, की हवीहवीशी अशी ती वेळ असते.
अभ्यास करताना आपले मन, विचार कसे असतात? ते स्वतःला आनंद देणारे असतात की त्रास निर्माण करणारे. नकोसे वाटणारे असे ते क्षण असतात, की हवीहवीशी अशी ती वेळ असते. या मनाच्या वाटण्यावर बरेच काही अवलंबून असते. त्यामुळे अभ्यासाच्या बाबतीत सतत आशावादी रहाणे फायद्याचे ठरते. असे आपले मन राखले, तर आपल्याला आपण करत असणाऱ्या अभ्यासाचे जास्त चांगले परिणाम अनुभवायला मिळतात. आशावादी म्हणजे काय, तर होकारात्मक रहाणे. मला हे येते आहे, जमते आहे, मी हे करू शकतो, हा सकारत्मकतेचा मंत्र त्यासाठी जपणे आवश्यक असते. आपल्या मनाला उभारी देणे, त्याला तणावरहित ठेवता येईल असा प्रयत्न करायला हवा. असे मोकळे प्रसन्न मन ठेवले, की मग बघा ते सुद्धा तुम्हाला कसे अपेक्षित ते करायला सुरुवात करते.
चांगल्या विचारांची साखळी
मनात आपण चांगले विचार ठेवल्यास नेहमी त्याला चांगल्या विचारांचीच जोड मिळणार. एका चांगल्या विचारांनी दुसरे चांगले विचार आपोआप जोडले जातात. अशा चांगल्या विचारांची एक साखळीच तयार व्हायला लागते. मन आनंदी ठेवले तरच केलेला अभ्यास व्यवस्थित समजणे, तो लक्षात रहाणे, सहजपणे आठवणे, त्या विषयी खात्री वाटणे, तो बरोबर असणे हे घडू लागते. याउलट मनात वाईट विचारांनी जागा घेतली, की त्याच विचारांचीच साथ मिळायला सुरुवात होते. अशातून वाईट तेच साध्य होते. जसे चांगल्या विचारांकडे नेहमी चांगले विचारच आकर्षित होतात, त्याच प्रमाणे वाईट विचारांचे. मन हे आपल्या विचारांच्या आधीन असते. जसा विचार तसा परिणाम साधला जात असतो. ‘रिकामे मन’ हे सैतानाचे घर यासाठीच म्हटले जाते.
आपण इतरांपेक्षा किती सुखी आहोत याचा विचार करून जास्तीत जास्त प्रयत्नांची जोड देण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांशी तुलना न करता स्वतःच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करा. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या नकारात्मक, विध्वंसक गोष्टी पाहण्यात किंवा वाचण्यात वेळ घालवण्यापेक्षा चांगले ते पाहा आणि केवळ त्याचाच विचार करा. चांगल्या विचारांनी केवळ चांगलेच विचार जोडले जाऊ शकतात. अभ्यास करताना विशेषतः ज्या गोष्टींमुळे नकारात्मकता पसरण्याची शक्यता आहे अशा विचारांपासून दूर राहा. केवळ चुकांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आणि सतत त्याचाच विचार करण्याऐवजी आपल्याला येते त्यावर समाधान मानून राहून पुढील उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करा. आपल्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये विविधता आणा म्हणजे आपल्याला अपेक्षित सकारात्मकता आपोआप साकार होईल.
स्वतःशी संवाद
सकारात्मक राहण्यासाठी स्वतःशीच असणारा संवाद हा नेहमी चांगला असाच असावा. विशेषतः अभ्यास करत असताना आपल्या मनाला आपण सतत खात्रीपूर्वक पटवून दिले पाहिजे, की ते तुम्हाला जमत आहे. आपल्या विचारात नकारात्मक बाबी जागा घ्यायला लागल्या, तर मात्र सोप्या असणाऱ्या गोष्टी अवघड व्हायला लागतात. आपल्या अभ्यासात आपण कधीच एकटे नसता. आपले पालक, भाऊ-बहीण, मित्र, शिक्षक हे सर्व आपल्या सोबत असतात. ते आपल्याला अनेक प्रकारे साहाय्यच करत असतात. मग आपण आपल्या विषयी खात्री बाळगायला काहीच हरकत नाही. अभ्यासात हा सकारात्मकतेचा मंत्र जपत रहा सर्व गोष्टी सहज साध्य होतील. तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही असता.
त्यामुळे बी पॉझिटिव्ह.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.