दोन वर्षाच्या कालावधीनंतर आत्ता कुठे शाळा खऱ्या अर्थाने सुरू झाल्या एकदाच्या. आता परत एकदा अभ्यासाकडे जोमाने वळायला हवे.
दोन वर्षाच्या कालावधीनंतर आत्ता कुठे शाळा खऱ्या अर्थाने सुरू झाल्या एकदाच्या. आता परत एकदा अभ्यासाकडे जोमाने वळायला हवे. अभ्यासाच्या गेलेल्या किंवा न लागलेल्या सवयी लावायला हव्यात. शिकण्याचा वेग वाढवायला हवा. त्यासाठीच अभ्यासाची तंत्रे आणि मंत्रे समजून घ्या तुमचा अभ्यास दुप्पट वेगाने आणि उद्दिष्टांकडे जाणारा होईल. मूल लेखनात कमी पडत आहेत ही ओरड दूर करू शकता.
कोणत्याही लेखनाच्या प्रश्नामध्ये एक समस्याच दिलेली असते. दिलेल्या घटनेकडे, प्रश्नाकडे एक समस्या म्हणून पाहिल्यास आपल्याला त्या विषयी अधिक सखोलपणे आणि अनेक बाजूंना स्पर्श करत लिहिता येऊ शकते. लेखन करताना बारकावे, स्पष्टिकरणे, आणि विविध अंगांचा विचार करणे आवश्यक असते. केवळ पाठ केलेले उत्तर देण्यापेक्षा स्वतः उत्तर तयार कसे करायचे याचे तंत्र किंवा पद्धत समजून घेतल्यास कोणत्याही समस्येबाबत किंवा विषयाबाबत लिहिणे सोपे जाईल. परीक्षेच्या वेळेस कोणताही विषय आला तरी या तंत्राचा उपयोग करून आपण आपले लेखन पूर्ण करू शकतो.
समस्येची मांडणी
समस्या काय आहे हे व्यवस्थित आणि स्पष्टपणे मांडणे आवश्यक आहे. समस्या मांडताना ती मोजक्या आणि समस्येचे पूर्ण चित्र उभे राहील या स्वरूपात मांडावी. समस्या भेडसावणे, तिचे स्वरूप नक्की काय आहे याची कल्पना वाचकाला येणे आवश्यक आहे. समस्या, विषय काय आहे हे समजणे महत्त्वाचे. समस्येचे आकलन स्पष्ट तितके त्यावरील उपाय योजना आखणी सोपे.
परिणामांचा विचार
कोणतीही समस्या म्हटली की त्याचे काहीतरी परिणाम हे होणारच. समस्या जाणवण्यासाठी परिणामांची मांडणी करणे आवश्यक आहे. लगेचच आणि दूरगामी परिणाम अशी विभागणी आपण करू शकतो. काही परिणाम हे दृष्य स्वरूपात तर काही दिसत नाहीत. व्यक्तिगत तुमच्या जीवनावर झालेले परिणाम, सभोवताली झालेले परिणाम हे मांडल्याने समस्या समजायला मदत होईल.
समस्येमागील कारणांचा विचार
समस्या ही नेहमीच काही कारणांचा परिणाम म्हणून असते. समस्या उद्भवण्यास कारणीभूत असलेल्या कारणांची मांडणी आणि विचार करणे हे विचारांची परिपूर्णता दर्शविते. कारणांशिवाय समस्या असूच शकत नाही. त्यामुळे कारणांचा शोध घेणे महत्त्वाचे. समस्येमागील कारणांचा धांडोळा घ्या.
उपायांचा शोध
समस्या, परिणाम, कारण यांचा विचार केल्यानंतर क्रमाने उपायांचाही विचार करणे हे ओघाने आलेच. समस्येतून सोडविण्यासाठी उपाय योजना सुचविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उपाय योजनेतूनच आपली विचारांची दिशा कळायला मदत होते. लगेच करायचे उपाय आणि दूरवर करायचे उपाय ठरवता येतील.
आपण पर्यावरणातील ऱ्हास या विषयी लिहीत असल्यास, ही समस्या नक्की कशी आहे याचे वर्णन सुरुवातीला करावे लागेल. नंतर त्या समस्येचे होणारे परिणाम नोंदवावे लागतील. त्यासाठी उदाहरणे द्यावी लागतील. या परिणामांची कारणमीमांसा करत असतानाच त्या मागच्या कारणांचा मागोवा घ्यावा लागेल. कारणांच्या शोधानंतर काही उपाय योजना सुचविता येईल. अशा तऱ्हेने आपण कोणत्याही समस्येवर छान लेखन करू शकाल. एकाच विषयाकडे आपण किती चौफेर नजरेने बघतो यावरच आपल्या लेखनाचा दर्जा अवलंबून असतो. समस्या-परिणाम-कारणे आणि उपाय या तंत्राचा उपयोग करून आपल्या विचारांची दिशा आपण नक्की करू शकाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.