पुणे : तुम्ही अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत असाल, तर नक्की इकडे लक्ष द्या. पुण्यातील नामांकित महाविद्यालयात बी. ई. किंवा बी. टेक. अभ्यासक्रमाला प्रवेश हवा असेल, तर तुम्हाला प्रवेश परीक्षेत किमान ९० पर्सेंटाईल किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे गरजेचे आहे. होय, शहरातील नामांकित महाविद्यालयातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीतील ‘कट-ऑफ’ हा नव्वदीपार आहे. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशासाठी आणि त्यातही आवडती शाखा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा असल्याचे दिसून येते.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाची पहिली फेरी जाहीर झाली आहे. या फेरीतील कट-ऑफ देखील सीईटी सेलने जाहीर केला आहे. पहिल्या फेरीत नामांकित महाविद्यालयातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी), आर्टिफिशल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग, आर्टिफिशल इंटेलिजन्स ॲण्ड डेटा सायन्स शाखांचा कट-ऑफ ९९ ते ९० पर्सेंटाईल असा सर्वाधिक असल्याचे दिसून येते. तर, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग (ई ॲण्ड टीसी), मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अशा शाखांमध्ये तुलनेने कमी पर्सेंटाईल असले, तरीही प्रवेशाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.
नामांकित महाविद्यालयातील पहिल्या यादीतील ‘कट-ऑफ’ (शाखानिहाय पर्सेंटाईल) :
महाविद्यालयांचे नाव : कॉम्प्युटर इंजिनिअरिंग : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग : इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग : आयटी
१. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी) : ९९.८८४४१०५ : ९९.३१११७२६ : ९९.६५२००२३ : ---
२. पीआयसीटी, धनकवडी : ९९.५९७५५४८ : --- : ९७.९४७०१९९ : ९९.१५३६८७९
३. पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग : ९८.३०३२१५० : --- : ९५.१९५५५३९ : ९७.८७१८६००
४. कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वूमेन : ९७.८१३३२७८ : --- : ९४.९९२९८८१ : ९७.२२७९७२७
५. पीव्हीजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग : ९७.५६७५९४७ : --- : ८९.३८०६७०२ : ९५.७९२८६३४
६. एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, आळंदी : ९५.५२९२१२५ : ७९.९५१७५४२ : ८९.४६१३८२६ :---
७. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, (अवसरी खुर्द) : ९४.३५०२२४८ : --- : ८८.७५४३७०४ :---
८. पीईएस मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग : ९३.४९९८५३१ : --- : ८०.२३०८९५० : ९१.३८६०६९०
९. मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्वेनगर : ९२.६२७७१६६ : --- : ७५.९०५०७४५ : ९०.५०८७८६३
‘‘अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा एकूणच निकालात वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा प्रवेशाचा ‘कट-ऑफ’देखील वाढल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांकडून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला जास्त पसंती असल्याने या शाखेसाठीचा कट-ऑफ हा तुलनेने अधिक आहे. परंतु, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अर्टिफिशल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग, अर्टिफिशल इंटेलिजन्स ॲण्ड डेटा सायन्स अशा शाखांनाही विद्यार्थी प्राधान्य देतात. विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि त्यांच्याशी संबंधित अभ्यासक्रमांना विद्यार्थी-पालकांकडून पसंती दिली जात आहे.’’
- डॉ. कल्याणी जोशी, प्राचार्य, पीईएस मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाबरोबरच हे करणे शक्य :
- मल्टी डिसिप्लिनरी अभ्यासक्रम निवडणे
- कौशल्यावर आधारित कोर्सेस करणे
- अभ्यासक्रमाची संबंधित सर्टिफिकेट कोर्सेस करणे
‘‘कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट-ऑफ हा ‘टॉप’ला आहे. सध्या सर्वच क्षेत्रात डिजिटायझेशनला असणारे प्राधान्य लक्षात घेता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये जास्त नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. त्या तुलनेत लॉकडाउननंतर देखील उत्पादन आणि ॲटोमोबाईल क्षेत्र म्हणावे तितके स्थिरावलेले नाही. या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरी भरतीत सातत्य नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगकडे जाण्याला विद्यार्थी पसंती देत नसल्याचे दिसून येते.’’
- डॉ. डी. आर. पानगव्हाणे, प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.