शिक्षक दिनानिमित्त अनेक शिक्षकांनी तसे अनुभव कथन केले आहेत. त्यांना शाळा, शिक्षकांचा धाक राहिलेला नसून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरल्याचे निरीक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी नोंदविले असून त्या मुलांना सलग दोन वर्षे उपचारात्मक शिक्षण द्यावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
सोलापूर: पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा मार्च 2020 पासून बंद आहेत. नव्याने पहिलीत व पहिलीतून दुसरीत गेलेली मुले अक्षरश: शिक्षक कोण असतो, त्यांचे काम काय, याबद्दल अनभिज्ञ असल्याचे वास्तव समोर आले आहे. शिक्षक दिनानिमित्त अनेक शिक्षकांनी तसे अनुभव कथन केले आहेत. त्यांना शाळा, शिक्षकांचा धाक राहिलेला नसून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरल्याचे निरीक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी नोंदविले असून त्या मुलांना सलग दोन वर्षे उपचारात्मक शिक्षण द्यावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
आई-वडिलानंतर मुलांचा गुणवत्तेच्या दृष्टीने शैक्षणिक पाया मजबूत करण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून शाळाच उघडल्या नसल्याने अनेक विद्यार्थी एकलकोंडी बनली असून त्यांच्यातील लठ्ठपणा, स्थूलपणा वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. हातावरील पोट असलेल्या कुटुंबातील मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेली असून ते मजुरी करू लागले आहेत. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा होत असतानाच, शहरातील काही शिक्षकांनी त्यांचे अनुभव सांगितले.
शिक्षकांच्या दबावाखाली राहणारी मुले आता शिक्षकांसमोर बिनधास्तपणे वावरू लागली आहेत. त्यांना शिक्षक म्हणजे काय, तो कोण असतो, त्यांचे काम काय, याची माहिती नसल्याचे निरीक्षण शिक्षकांनी नोंदविले आहे. शिक्षक हा पुस्तकात असतो, तो कसा दिसतो, कुठे राहतो, याबद्दलही ते अज्ञानी आहेत. ऑनलाइन शिक्षणातून मुलांना प्रवाहात आणणे, शाळाबाह्य मुलांचे प्रमाण कमी करणे हा त्यामागे हेतू आहे. मात्र, ज्या शाळाबाह्य, बालमजूर विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश दिला, त्यांचा शिक्षकांना अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. दुसरीकडे ऑनलाइन तासास सहभागी विद्यार्थी अनावश्यक व्हिडिओ पाहत आहेत. ज्यांना चष्मा नव्हता, त्यांच्या डोळ्यावर आता चष्मा दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनामुक्त गावांमध्ये आठवड्यातील काही दिवस ऑफलाइन शाळा सुरु कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अॅक्शन प्लॅन तयार, पण आदेशाची प्रतीक्षा
सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार शाळांची रंगरंगोटी करून स्वच्छता करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यादृष्टीने पाऊल उचचले आहेत. त्यांनी ग्रामीणमधील बहुतेक मुले शिक्षणापासून दूर असल्याने 'पारावरील शाळा' सुरु केली होती. मात्र, शासनाच्या निर्देशानंतर तो उपक्रम काही दिवसांतच बंद करण्यात आला. आता कोरोनामुक्त गावांमध्ये पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याची संपूर्ण तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. परंतु, शासनाचा आदेश नसल्याने शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवून शाळा सुरु करण्याचे नियोजन असल्याचेही स्वामी यांनी सांगितले.
शाळा बंदचे तोटे...
- पालक घरी नसल्याने मुले विनामास्क बिनधास्तपणे इतरत्र फिरतात
- ग्रामीणमधील अनेक बालकांना कोरोनाची बाधा; काही मुलांचा कोरोनामुळे मृत्यू
- ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांवरील शिक्षणाच्या खर्चाचा भार वाढला; मुले झाली चिडचिडी
- अॅन्ड्राईड मोबाइल नसलेली मुले शिक्षणापासून वंचित; हॉटेल, विटभट्टी, किरणा दुकानात मजुरीवर चिमुकली
- शिक्षक म्हणतात, शाळा सुरु करा अन्यथा मुलांचे शैक्षणिक भविष्य चिंताजनक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.