प्रा. विजय नवले
मनुष्यासाठी स्वास्थ्य आणि निरोगी जीवनमान हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. विविध आजार, शारीरिक-मानसिक समस्या, वार्ध्यक्यातील आजार, दुर्धर व्याधी आदींसाठी मनुष्य सातत्याने विविध उपचार पद्धतींचा स्वीकार करत आला आहे. आजही त्याच अनुषंगाने वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणून कार्यरत राहण्यासाठी विविध उपचारपद्धती आहेत. त्यापैकी एक आहे होमिओपॅथी! ही एक नैसर्गिक उपचारप्रणाली आहे. यामध्ये खासकरून जीवनशैली, मानसिकता, सवयी, आहारविहार पद्धती, वातावरण यांचा विचार केला जातो. थोडा अधिक कालावधी गेला तरी चालेल, पण आजार मुळापासून नष्ट व्हावा यासाठी होमिओपॅथीचे प्रयत्न असतात. होमिओपॅथी डॉक्टर होण्यासाठीची पदवी आहे - बीएचएमएस म्हणजेच बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी.