नोव्हेंबरमध्ये भरती प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासनाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
सोलापूर: राज्य सरकारच्या महसूल, कृषी, पशु संवर्धन, शालेय शिक्षण व क्रिडा, मराठी भाषा, सार्वजनिक आरोग्य, मेडिकल, जलसंपदा, अन्न व नागरी पुरवठा यासह एकूण 43 विभागांमधील जवळपास 18 हजार 743 पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पुढील आठवड्यात पाठविली जातील. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये भरती प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासनाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्य शासनाच्या गृह विभागात जवळपास 29 हजार, आरोग्य विभागात 20 हजार 594, जलसंपदा विभागात 21 हजार, कृषी विभागात साडेचौदा हजार, महसूल विभागात 13 हजार तर शालेय शिक्षण व क्रिडा विभागात 8 ते 10 हजार, सार्वजनिक बांधकाम विभागात अंदाजित नऊ हजार पदे रिक्त आहेत. सद्यस्थितीत जवळपास अडीच लाख पदे रिक्त असून मागील काही वर्षांत त्याची भरतीच झालेली नाही. तत्कालीन फडणवीस सरकारने 70 हजार पदांची मेगाभरतीची घोषणा केली, परंतु पुढे काहीच झाले नाही. महाविकास आघाडी सरकारने जवळपास एक लाख पदांच्या भरतीची घोषणा केली, परंतु कोरोनामुळे ती होऊ शकली नाही.
दरम्यान, स्पर्धा परीक्षा निकालाच्या प्रतीक्षेतील पुण्यातील स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जवळपास 15 हजार पदांची भरती होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यानंतर 30 सप्टेंबरपर्यंत सर्वच विभागांनी आयोगाला मागणीपत्र सादर करावीत, असा शासन निर्णय निघाला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही सप्टेंबरमध्ये तशा सूचना सर्वच विभागांना दिल्या. मात्र, अजूनपर्यंत मागणीपत्र न पाठविल्याने विद्यार्थी आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यावर राज्यमंत्री भरणे म्हणाले, उच्चस्तरीय समितीमार्फत रिक्त पदांच्या आरक्षणाची पडताळणी केली जात असून पुढील आठवड्यात मागणीपत्र आयोगाला जातील.
राज्य शासनाच्या विविध विभागांमधील रिक्त पदांचे मागणीपत्र आयोगाला पुढील आठवड्यात सादर होतील. जवळपास 18 ते 19 हजार पदांची भरती आयोगामार्फत लगेचच राबविली जाईल. जेणेकरून सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळेल.
- दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, सामान्य प्रशासन
ठळक बाबी...
- राज्य सरकारच्या 43 विभागांमध्ये जवळपास अडीच लाख पदे रिक्त
- पहिल्या टप्प्यात 'एमपीएससी'मार्फत 18 हजार 743 पदांची होईल भरती
- आठ दिवसांत सर्वच विभागांकडून आयोगाला जातील रिक्त पदांचे मागणीपत्र
- नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबविली जाईल भरती प्रक्रिया
- राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर टप्प्याटप्याने भरली जाणार रिक्त पदे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.