- इंद्रनील चितळे
कोरोनाच्या परिणामांमुळे आरोग्याविषयी जागरूकता वाढली आहे. त्यामुळे फूड इंडस्ट्रीचे महत्त्वही वाढले आहे. या उद्योगात सातत्याने टिकून राहण्यासाठी वाढ करणे हेही आव्हान आहे. फूड इंडस्ट्रीमध्ये नव्याने सुरूवात करणे सहज शक्य आहे, मात्र येथे उत्तम गुणवत्ता राखून टिकून राहणे हे खरे आव्हान आहे. मार्केट प्लेस मिळवणे सध्या शक्य आहे, परंतु ती टिकवणे आवश्यक आहे.
त्यासाठी गुणवत्ता जपली पाहिजे आणि दुसरे म्हणजे तुम्ही सतत ग्राहकांच्या समोर दिसला पाहिजे. नव उद्योजकांनी तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावीपणे वापर करावा. स्वतःचा ब्रँड तयार करण्याची क्षमता असावी. त्यामुळे मार्केटिंग करताना पहिल्या दिवसापासूनच ग्लोबल अपील करण्याचा दृष्टिकोन ठेवावा.
आम्ही चितळे बंधू ७० वर्षांपासून या व्यवसायात आहोत, तरीही आमचा बँड हा महाराष्ट्राचा म्हणूनच ओळखला जातो. तो देशभरात विकला जावा, जगभरात विकला जावा असा आमचा प्रयत्न सुरू आहे, त्यासाठी आम्हाला ब्रॅण्डिंग बदलावे लागेल आहे. हाच प्रयत्न या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांनी करावा. त्यासाठी डिजिटल मार्केटिंग महत्त्वाचे असून ‘मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम’ (एमआयएस) चा वापर करावा.
शेती क्षेत्रात प्रयोगांना मोठी संधी आहे. कृषी क्षेत्रात काम करण्यासाठी बी.एस्सी, एम.एस्सी. अॅग्रीसारखे पर्याय आहेत. परदेशात जाऊन करण्यासारखे पदव्युत्तर कोर्सेस उपलब्ध आहेत. बी.टेक, एम. टेक फूड टेक्नॉलॉजी किंवा डेटा सायन्स आपल्याकडे आणि परदेशात आहेत. त्यावर पीएच.डी. पर्यंत काम करण्याचा वाव आहे. त्याचबरोबर नॅनो टेक्नॉलॉजी आणि बायो टेक्नॉलॉजी यामध्ये विविध कोर्सेस आहेत. भारत सरकारच्या सेंट्रल फूड टेक्नॉलॉजीकल रिसर्च इन्स्टिट्यूट, (सीएफटीआयआर) म्हैसूर आणि गुडगाव, हरियाना येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी (निफटेम) या संस्थांची पदवीही फूड इंडस्ट्रीमध्ये महत्त्वाची मानली जाते.
फूड इंडस्ट्रीमध्ये पेटंट मिळवणाऱ्यांची संख्या कमी आहे. ती वाढवण्यासाठी स्कॉलर विद्यार्थी तयार करणे आणि त्यांना योग्य शिष्यवृत्ती देणे आवश्यक वाटते. सध्या शिक्षणाचा वेग आणि उद्योजकांना आवश्यक असणारे कौशल्य याबाबत शैक्षणिक संस्थांना विचार करावा लागेल. फूड इंडस्ट्रीमध्ये नोकरी करण्यासाठी पदवी अभ्यासक्रमाच्या वेळी सांगितली जाणारी इंटर्नशिप महत्त्वाची असते. त्यातून विद्यार्थ्यांना संबंधित कंपनीच्या प्रोसेस आणि सिस्टिमची माहिती होते.
या क्षेत्रात व्यवसायासाठी चांगली टीम बनवावी लागते. आपल्याकडे फूड इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय करताना अनेक प्रकारचे परवाने घ्यावे लागतात. बिझनेस, मार्केटिंग आणि फायनान्स शिकणे आवश्यक आहे. चांगला सहकारी घेऊन तांत्रिक बाजू पक्की करू शकता. बिझनेस डेव्हलपमेंट स्किल आवश्यक जमले पाहिजे. तुम्ही खूप टेक्निकल असल्यास बिझनेस डेव्हलपमेंट करणारा पार्टनर निवडा. तुमचे बिझनेस डेव्हलपमेंट स्किल चांगले असल्यास टेक्निकल टीम अधिक भक्कम ठेवावी.
(लेखक ‘चितळे उद्योग’ समूहाचे व्यवस्थापकीय भागीदार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.