‘आयटीआय’चे विद्यार्थी आणि कौशल्यविकास

आय.टी.आय.चे प्रमाणपत्र असणाऱ्या व यांत्रिक अभियांत्रिकीशी संबंधित असलेल्या उमेदवारांकडे कोणती कौशल्ये असावीत याचा आढावा आपण घेऊया.
ITI Student
ITI Studentsakal
Updated on

- निशिकांत चक्रदेव

मोठ मोठ्या औद्योगिक संस्थांना त्यांच्या रोजच्या कामासाठी कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असते. बऱ्याच वेळा कुशल मनुष्यबळाअभावी अनेक जागा रिक्त असतात. अशा कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणारा मोठा स्रोत म्हणजे सरकारी किंवा खासगी मालकीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) या संस्थांमधील विद्यार्थ्यांनी स्वतःतील कौशल्ये अधिक विकसित करणे आवश्‍यक आहे.

आवश्‍यक कौशल्ये

आय.टी.आय.चे प्रमाणपत्र असणाऱ्या व यांत्रिक अभियांत्रिकीशी संबंधित असलेल्या उमेदवारांकडे कोणती कौशल्ये असावीत याचा आढावा आपण घेऊया. आय.टी.आय.मध्ये यांत्रिक अभियांत्रिकीशी संबंधित फिटर, मशीनिस्ट, मशीनिस्ट ग्राइंडर, टर्नर, टूल अँड डायमेकर यांसारखे दोन वर्ष मुदतीचे अभ्यासक्रम शिकवले जातात.

इंजिनिअरिंग ड्रॉइंग ही अभियंत्यांची भाषा आहे. त्यामुळे यांत्रिक अभियांत्रिकी संबंधित सर्व उमेदवारांना इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. यामध्ये कॉम्पोनन्टचे मटेरियल, टॉलरन्सेस, सरफेस फिनिश, कॉम्पोनन्टवर मशिनिंगनंतर कोणती प्रोसेस होणार आहेत? यांसारख्या अनेक गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे. ड्रॉइंग बनवण्यासाठी बहुतेक ठिकाणी ऑटोकॅड या ‘सॉफ्टवेअर’चा उपयोग केला जातो. त्यामुळे ऑटोकॅड या सॉफ्टवेअरची पूर्ण माहिती असणाऱ्या उमेदवाराला प्राध्यान्य दिले जाते.

क्षमता

कॉम्पोनन्ट मोठ्या प्रमाणावर बनवताना त्यांची गुणवत्ता राखणे महत्त्वाचे आहे. यासाठी कॉम्पोनन्ट बनवताना आणि पूर्ण झाल्यानंतर त्याचे मोजमाप करणे आवश्यक आहे. कॉम्पोनन्टचे मोजमाप वर्निअर कॅलिपर, मायक्रोमीटर, डेप्थ गेजसारख्या अनेक मोजमापाच्या साधनांचा उपयोग केला जातो. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या मोजमपाच्या साधनांचा योग्य आणि अचूक वापर करता येणे जरूरीचे आहे.

ही उपकरणे नाजुक असल्याने त्यांची हाताळणी काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. यांत्रिक अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना सी.एन.सी. मशीन ऑपरेशन आणि प्रोग्रामिंगची माहिती असणे आवश्यक आहे. बऱ्याच खासगी संस्था ऑटोकॅड या सॉफ्टवेअरवर, तसेच सीएनसी मशीन ऑपरेशन आणि प्रोग्रामिंग याविषयी अभ्यासक्रम घेतात.

सॉफ्टवेअरची माहिती

आजकाल नेटवर गुगल किंवा यू-ट्यूबवर ही सर्व माहिती अतिशय चांगल्या प्रकारे मिळते. विद्यार्थ्यांनी अभ्यास सांभाळून त्यांना जमेल अशा सुट्टीच्या दिवशी जवळच्या औद्योगिक संस्थांना भेट देऊन जास्तीत जास्त माहिती गोळा करावी. याचा त्यांना पुढील काळामध्ये खूप उपयोग होईल. आजकाल सर्व क्षेत्रात संगणकाचा वापर केला जातो. त्यामुळे यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रात विशेषत: सी.एन.सी. मशीनवर काम कारण्याऱ्या सर्वांना संगणकाची आणि त्या संबंधित उपयोगी पडणाऱ्या काही सॉफ्टवेअरची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षण

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानंतर एक वर्षाचे अप्रेंटिस ट्रेनिंग असते. या एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीचा विद्यार्थ्यानी पुरेपूर उपयोग करून घेत अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनखाली जास्तीत जास्त वेगवेगळ्या मशीनवर स्वतंत्रपणे काम करण्याचा प्रयत्न करावा. वर्कपीस पकडण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा.

अप्रेंटिस ट्रेनिंगदरम्यान विद्यार्थ्यांनी औद्योगिक सुरक्षेचा पूर्णपणे मान राखावा आणि औद्योगिक सुरक्षेकडे पूर्ण लक्ष द्यावे. याचा त्यांना भविष्यात खूप उपयोग होईल. विद्यार्थ्यांनी वर सांगितलेल्या कौशल्य संचाचा विकसित केल्यास त्यांना रोजगार मिळेल आणि औद्योगिक संस्थांना कुशल मनुष्यबळ मिळेल.

(लेखक डी.आर.डी.ओ.मधील सेवानिवृत्त टेक्निकल ऑफिसर असून, त्यांना सी.एन.सी. मशीन प्रोग्रामिंग आणि मशीन ऑपरेशन क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.