तंत्रशिक्षणाला मिळतोय नवा आयाम! महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून के-स्कीम जाहीर, वाचा सविस्तर...

Maharashtra News: तंत्र शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने एक योजना जाहीर केली आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
Maharashtra State Board of Technical Education
Maharashtra State Board of Technical EducationESakal
Updated on

शिक्षण माणसाच्या मुलभूत हक्कांपैकी एक. शिक्षणामुळे जगाचे दरवाजे आपल्यासमोर उघडतात. करियरच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध होतात. शिक्षण माणसाला स्वबळावर उभे राहण्याच्या संधी निर्माण करते. परंतु आजही केवळ परिस्थितीमुळे अनेकांना शिक्षणाला मुकावं लागतं.आपल्या आजुबाजूला अनेक अशी होतकरू व मेहनती मुलं असतात ज्यांना पैसे कमवणे ही प्राथमिक गरज असल्यामुळे शिक्षणाला दुय्यम स्थान द्यावं लागतं. परिणामी अनेकदा विविध कारणांमुळे शिक्षणात खंड पडतो. परिस्थिती बदलल्यावर विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षण सुरू करण्याची इच्छा असते. यावेळी योग्य ते मार्गदर्शन व प्रोत्साहन न मिळाल्यामुळे त्यांचे शिक्षण पुन्हा सुरू होऊ शकत नाही.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने पदविका तंत्र शिक्षणाच्या अभ्यासक्रमाकरीता के-स्कीम जाहीर केली आहे. ही अभ्यासक्रम योजना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या मार्गदर्शक तत्वानुसार विकसित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त युवकांना पदविका पूर्ण करण्याची संधी मिळावी व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच पदविका तंत्रशिक्षणातून रोजगारासाठी संधी उपलब्ध व्हाव्यात हा मुख्य उद्देश आहे.

औद्योगिक क्षेत्राची सद्यस्थिती आणि भविष्यातील संधींचा विचार करून अनेक नवीन तंत्रज्ञानाचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२० मधील निकषांच्या आधारे के-स्कीम अंतर्गत ४९ पदविका अभ्यासक्रम विकसित करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम Outcome based असून यात क्रेडिट सिस्टिमचा वापर केला आहे. सदर अभ्यासक्रमांची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून टप्प्याटप्प्याने करण्यात आलेली आहे.

NCrF नियमावलीनुसार मंडळाने Credits accumulation system अंगिकारली असून NAD (National Academic Depository) च्या Academic Bank of Credits (ABC) मध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले credits जमा करण्यात येत आहेत. अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना प्रत्येक विद्यार्थ्यांचे एक डिजिटल खाते सुरू होईल. ज्यात त्याने जो अभ्यासक्रम पूर्ण केला त्यानुसार क्रेडिट्स डिजिटल पद्धतीने विद्यार्थ्यांच्या ABC (Academic Bank of Credits) खात्यामध्ये जमा होतील. विद्यार्थ्यांना त्यांनी पूर्ण रूप केलेल्या प्रत्येक सत्राचे क्रेडिट्स मिळण्याची तरतूद केली आहे. इतकंच नाही तर हे क्रेडिट्स एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत सहजपणे हस्तांतरीत करता येतील.

Maharashtra State Board of Technical Education
Airport Jobs 2024 : विमानतळावर नोकरीसाठी अर्ज भरण्यास मिळाली मुदतवाढ! अर्ज कुठे करावा? पगार किती मिळेल? वाचा सविस्तर

औद्योगिक क्षेत्रातील जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने औद्योगिक प्रशिक्षण (Industrial Training) हे या आधीच्या अभ्यासक्रमात असलेल्या ६ आठवडयांच्या कालावधी वरून सध्याच्या अभ्यासक्रमात किमान १२ आठवडयांचे करण्यात आले आहे. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणातील इंग्रजी भाषेच्या वापरामुळे अडचण निर्माण होते. भाषेचे या बंधनात न अडकता शिक्षणाचा लाभ घेता यावा म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम व्दिभाषेतील शिकविण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला जातो. यामुळे आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना इंग्रजी बरोबरच मराठी भाषेतून शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. पदविका अभ्यासक्रमांची मराठी भाषेतील शिक्षण सामग्री सर्व विद्यार्थी व शिक्षकांसाठी निःशुल्क उपलब्ध करून दिली आहे.

के-स्कीम अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणे, त्यांचे कौशल्य वाढवणे, जागरुक व जबाबदार नागरिक घडविणे, विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरता व इतर सामाजिक कौशल्ये विकसित करणे व स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे या घटकांवर जास्त भर दिला आहे. पदविका अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती वाढावी यासाठी 'स्कूल कनेक्ट' हा उपक्रम देखील राबवला जातो. यामध्ये विविध शासकीय शाळांमध्ये जाऊन, विशषेतः इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमांची माहिती दिली जाते. तसेच त्यांचा भविष्यासाठी होणारा फायदा समजावून दिला जातो. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना या नवीन अभ्यासक्रमाबाबत माहिती देणे हा देखील या उपक्रमाचा एक भाग आहे.

पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परिक्षा देण्याची गरज नाही. सदर प्रवेशाकरीता शासनाने केंद्रीभुत ऑनलाइन प्रक्रिया जाहीर केली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळे फॉर्म भरण्याची गरज भासत नाही. प्रवेश प्रक्रिया सुलभ होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे विद्यार्थी कुठूनही आणि कुठल्याही इंटरनेट जोडलेल्या मोबाइल किंवा संगणकावरून प्रवेश अर्ज भरू शकतात.

विद्यार्थ्यांना आवडीनुसार शिक्षण घेण्याकरिता मार्ग बदलणे, तसेच पूर्ण केलेल्या शिक्षणाच्या टप्प्यानुसार योग्य रोजगार संधी उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून मल्टीपल एन्ट्री मल्टीपल एक्झिट ची तरतूद करण्यात आली आहे. प्रथम वर्षाअंती एग्झिट करणा-या विद्यार्थ्यांना Certificate of Vocation, व्दितीय वर्षाअंती एग्झिट करणा-या विद्यार्थ्यांना Diploma in Vocation व तृतीय वर्षाअंती Diploma in Engineering ची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच व्दितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेशाकरिता मल्टीपल एन्ट्रीची तरतूद करण्यात येत आहे. या तरतुदीमुळे शिक्षणापासून दूर गेलेले जास्तीत जास्त विद्यार्थी पुन्हा शिकण्यास सुरू करण्यास इच्छुक होतील हे नक्की! महाराष्ट्र राज्यातील तंत्रशिक्षणाच्या विविध पदविका शाखा व या पदविकांचे के-स्कीम अंतर्गत विकसित अभ्यासक्रम याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.msbte.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.