पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निकालांना उशीर होण्यामागे ‘अंतर्गत मुल्यांकनातील गोंधळ’ हे एक महत्त्वाचे कारण आहे. मुल्यांकनाला उशीर करण्यापासून ते विद्यार्थ्यांना चुकीचे गुणदान करण्यापर्यंतचे प्रकार उन्हाळी परीक्षेत घडले होते. आता हे टाळण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण सूचना फलकावर लावण्याचा नियम काटेकोर पाळणे बंधनकारक असल्याचे परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.
अंतर्गत गुणदानातील गोंधळामुळे विद्यापीठाने नुकतेच ७४ महाविद्यालयांवर कारवाईही केली होती. आता विद्यापीठाच्या वतीने ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ ची सत्र परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात येत असून, प्रात्यक्षिक परीक्षेची घोषणाही करण्यात आली आहे. कोरोनानंतर विस्कळीत झालेले शैक्षणिक वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी पुन्हा एकदा परीक्षा विभाग आणि महाविद्यालयांमध्ये समन्वयाची गरज आहे.
प्रत्येक वेळी विद्यार्थीच या संपूर्ण प्रक्रियेत भरडला जात असून, यंदा कोणती खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे यांना विचारली असता, ते म्हणाले, ‘कोरोनानंतर आता परीक्षेचे वेळापत्रक पूर्वपदावर येत असले तरी एका महिन्याचा विलंब अजूनही आहे. पुढील शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू करण्यासाठी परीक्षेशी निगडित सर्व घटकांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे.
विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अंतर्गत मुल्यमापनाचे गुण विद्यार्थ्यांसाठी १५ दिवस सूचना फलकावर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. महाविद्यालयांनी हा नियम पाळल्यास गोंधळ टळेल.’ बहुतेक महाविद्यालयांमध्ये अंतर्गत गुण सूचना फलकावर घोषीत करण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे गुणदानासंबंधी कोणतीच माहिती मिळत नाही.
म्हणून गरजेचे..
- नियमानूसार अंतर्गत गुण सूचना फलकावर लावणे बंधणकारक
- विद्यार्थ्यांना त्यांचे गुण समजतात, त्याचबरोबर गुणदानातील त्रुटीही समोर येतात
- विद्यार्थ्याची अनुपस्थिती किंवा विहीत पुर्ततेबद्दल स्पष्टता येते
- विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेच्या नियोजनात मदत होते
विद्यार्थ्यांनो हे करा...
- परीक्षा अर्ज बिनचूक भरा, महाविद्यालयात तपासून घ्या
- सत्र परीक्षा पूर्ण होण्यापूर्वी अंतर्गत गुणांची खातरजमा करावी
- प्रवेशपत्रातील विषयांची खात्री करावी
- जुन्या विषयांचा समकक्ष विषयाची खातरजमा करा
प्राध्यापकांसाठी महत्त्वाचे...
- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज बिनचूक आहे का नाही याची खात्री करावी
- महाविद्यालय स्तरावर ते कन्फर्म करावे
- अंतर्गत गुण विहित वेळेत भरावे
- गुणांची कमाल आणि किमान मर्यादा तपासावी
- सूचना फलकावर अंतर्गत गुण प्रसिद्ध करावेत
विद्यार्थ्यांची ससेहोलपट थांबणार का?
परीक्षा अर्जातील त्रुटींपासून निकालापर्यंत अनेक अडचणींसाठी विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठात पाठविले जाते. मुळात परीक्षेच्या कामासाठी विद्यार्थ्याला विद्यापीठात पाठविणे चुकीचे आहे. बहुतेक प्रकरणात परीक्षा विभाग आणि महाविद्यालयाने समन्वय साधल्यास प्रश्न मिटतो. मात्र, असे असतानाही विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या चकरा मारायला सांगितले जाते.
परस्पर पाठविणे, परीक्षा विभागातही विद्यार्थ्यांशी नीट संवाद साधला जात नाही. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा त्रागा होतो. त्यामुळे यंदा तरी विद्यार्थ्यांची ही ससेहोलपट थांबवली जाणार का? हा मोठा प्रश्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.