मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने हालचाली सुरू केल्या आहेत.
माळीनगर (सोलापूर) : मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती (Pre Matric Scholarship) योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने हालचाली सुरू केल्या असून, राज्यस्तर व जिल्हा स्तरावर ऑनलाइन तसेच ऑफलाइन बैठकांचे सत्र सुरू आहेत. दरम्यान, या योजनेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी केंद्र शासनाने (Central Government) 30 नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती राज्य उपसंचालक राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी दिली.
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या इयत्ता पहिली ते दहावी या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी बारा वर्षांपूर्वी म्हणजे 23 जुलै 2008 च्या शासन निर्णयान्वये राज्यातही प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2008-09 पासून सुरू झाली आहे. चालू वर्षी एनएसपी 2.0 पोर्टलवर नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुरुवात 18 ऑगस्टपासून झाली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत दिलेली मुदत आता वाढवून 30 नोव्हेंबर अखेरपर्यंत करण्यात आली आहे.
शाळा स्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2021 असून, जिल्हा स्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. प्रौढ व अल्पसंख्याक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर पाटील यांनी राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक, सर्व प्राथमिक, माध्यमिक व निरंतर शिक्षणाधिकारी यांची नुकतीच ऑनलाइन बैठक घेऊन सर्व योजनांचा आढावा घेतला. त्यात प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. राज्यस्तरावरील पथके विविध जिल्ह्यात अशा अर्जांची कागदपत्रे तपासण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळा स्तरावरून तपासताना संबंधित सर्व कागदपत्रे तपासावीत. त्यामध्ये प्रामुख्याने सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेले पालकांच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत आहे याची खात्री करावी. शाळास्तरावर एकही अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित राहणार नाही याची खबरदारी मुख्याध्यापकांनी घ्यावी. कागदपत्रावरील माहिती व अर्जामधील माहिती यामध्ये तफावत आढळल्यास अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची सूचना विद्यार्थ्यास एक संधी देण्यात यावी. यासाठी अर्ज डिफेक्ट करावा. विद्यार्थ्यास संधी देऊनही माहिती चुकीची भरल्यास अर्ज रिजेक्ट करण्यात यावा. विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत नसल्यास किंवा अर्ज बनावट आढळल्यास अर्ज फेकमार्क करावे. शाळांचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांची माहिती आधारनुसार एनएसपी 2.0 या पोर्टलवरती भरावी, अशा सूचना सर्व क्षेत्रीय अधिकारी व शाळांना देण्यात आल्या आहेत.
नवीन व नूतनीकरणाचे अर्ज www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची असून अर्ज भरण्याची सोय www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे. अर्ज भरताना मोबाईल क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. हा क्रमांक पालकांचा असेल तर तो दोन पाल्यांसाठीच वापरता येईल.
ठळक बाबी...
चालू शैक्षणिक वर्षासाठी नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांकरिता पन्नास टक्के गुणांची अट शिथिल
शाळांच्या नोडल ऑफिसर यांची आधारनुसार नोंदणी एनएसपी पोर्टल वर करणे बंधनकारक
शाळा व जिल्हा अशा दोन स्तरावर अर्जांची पडताळणी होणार
विहित मुदतीत दोन्ही स्तरावरील अर्जांची पडताळणी करणे बंधनकारक
राज्यातून आतापर्यंत नवीन 2 लाख 56 हजार 229 आणि नूतनीकरणाचे पाच लाख 31 हजार 852 ऑनलाइन अर्ज प्राप्त
संचालक दिनकर पाटील यांनी सदर शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. नवीन अर्जातून महाराष्ट्र राज्याकरिता शिष्यवृत्ती कोटा दोन लाख 85 हजार इतका आहे. त्यामुळे अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज अपेक्षित आहेत.
- राजेश क्षीरसागर, राज्य उपसंचालक, प्रौढ व अल्पसंख्याक शिक्षण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.