MPSC : नैसर्गिक न्यायापासून उमेदवार वंचित

एमपीएससीच्या लघुलेखकांसाठीच्या संयुक्त चाचणी परीक्षेतील प्रकार
MPSC
MPSCesakal
Updated on

पुणे : रविवारी (ता.२५) रात्री साडे बारा वाजता राजेशची बस पुण्यात दाखल झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) लघुलेखक पदाच्या परीक्षेसाठी तो लातूरहून पुण्यात आला होता. रात्री मित्राकडे थांबला अन् सोमवारी पहाटेच हडपसरच्या परीक्षा केंद्रावर निघाला.

मात्र, परीक्षा केंद्र मुख्य शहरापासून गैरसोईच्या ठिकाणी असल्यामुळे, वाहनाची व्यवस्था झाली नाही. एवढा आटापिटा करत ८ वाजून २० मिनीटांनी केंद्रावर पोचला, मात्र प्रवेशद्वारातून आत जाईपर्यंत साडेआठ वाजून गेले अन् त्याला बाहेर थांबविण्यात आले. राजेशसारखे असंख्य उमेदवार यांत्रिकी पद्धतीचे बळी ठरले.

हडपसरच्या रामटेकडी डिजिटल परीक्षा केंद्र, गोळीबार मैदान आदी निवडक परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना हा कटू अनुभव आला आहे. अनेकांसाठी कदाचित परीक्षेची संधी हुकली असेल, पण राजेश सारख्या वयोमर्यादेच्या टोकावर असलेल्या काही उमेदवारांना सरकारी नोकरीवर कायमचे पाणी सोडावे लागले आहे.

असाच अनुभव सांगताना वृषाली म्हणते, ‘‘परीक्षा केंद्रावर अर्धातास आधी पोचावे हा नियम आम्हालाही माहीत आहे. त्यानुसारच आम्ही वेळेआधी निघालो होतो. परंतु, मुख्य शहरा ऐवजी दूरवर आणि माहीत नसलेल्या केंद्रांवर परीक्षा ठेवण्यात येते. जाण्या-येण्याच्या सोई नसल्यामुळे एक-दोन मिनीट उशीर झाला तर नैसर्गिक न्यायाने आम्हाला परीक्षेला बसू द्यायला हवे.’’ उमेदवारांनी परीक्षा केंद्र चालकांना विनंती केली. मात्र, आम्ही फक्त एमपीएससीच्या नियमांचे पालन करतो, असे म्हणत त्यांनीही हात काढते घेतले.

उमेदवारांचे प्रश्न..

- मुख्य शहर सोडून गैरसोईच्या ठिकाणी परीक्षा केंद्र का?

- सकाळी साडेसात वाजताचा रिपोर्टींग टाइम योग्य आहे का?

- बाहेरगावच्या विद्यार्थ्यांचा विचार करत पूर्वी १० नंतर परीक्षा असायची, आता सकाळी नऊ वाजताच कशी?

- दोन-पाच मिनीटे उशिरा दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देणारा नैसर्गिक न्याय नको का?

- केंद्रावर एमपीएससीचे प्रतिनिधी का नाही?

- आदेशाच्या नावाखाली उमेदवारांना हकलण्यात का आले?

गावाकडे तयारी केली, परीक्षा शुल्क भरले. एवढा वेळ आणि पैसा खर्च करून परीक्षा केंद्रावर दाखल झाले. मात्र, यांत्रिक पद्धतीने घड्याळाकडे बोट दाखवत माझी परीक्षेची संधी नाकारण्यात आली.

- रेखा, परीक्षार्थी

खूप वर्षांनंतर लघु लेखक, टंकलेखक, आदी पदांसाठी भरती काढण्यात आली होती. त्यामुळे मी कसोशीने अभ्यास केला. वाहन व्यवस्था नसतानाही, एवढा आटापिटा करत परीक्षा केंद्रावर दाखल झालो. मात्र, केवळ पाच मिनीटे उशिरा आलो म्हणून मला परीक्षेला बसू दिले नाही.

- राहुल, परीक्षार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.