गणिताशी करा दोस्ती!

शालेय आयुष्यात असणारा सर्वांत मोठा खलनायक कोणता असं विचारलं असता बहुसंख्य व्यक्ती गणित या विषयाचे नाव घेतात. आकडेमोड करण्याचा तर तिटकाराच असतो बहुतांश विद्यार्थ्यांना!
Mridula Adavadkar writes do friendship with math hard subject for student is mathematics National Achievement Survey Report
Mridula Adavadkar writes do friendship with math hard subject for student is mathematics National Achievement Survey Reportsakal
Updated on
Summary

शालेय आयुष्यात असणारा सर्वांत मोठा खलनायक कोणता असं विचारलं असता बहुसंख्य व्यक्ती गणित या विषयाचे नाव घेतात. आकडेमोड करण्याचा तर तिटकाराच असतो बहुतांश विद्यार्थ्यांना!

- मृदुला अडावदकर

शालेय आयुष्यात असणारा सर्वांत मोठा खलनायक कोणता असं विचारलं असता बहुसंख्य व्यक्ती गणित या विषयाचे नाव घेतात. आकडेमोड करण्याचा तर तिटकाराच असतो बहुतांश विद्यार्थ्यांना! या निरीक्षणास सुसंगत असा नॅशनल ॲचिव्हमेंट सर्व्हेचा अहवाल नुकताच वाचायला मिळाला. यानुसार गणित विषयातील संपादणुकीचा विचार करता महाराष्ट्रातील विद्यार्थी विविध गणितीय क्षमतांमध्ये बरेच मागे आहेत. त्याची कारणे शोधून त्यावर शिक्षण विभागाच्या मार्फत उपाय केले जाणार आहेत. असे काय आहे गणित विषयात, की त्यासाठी सरकारी यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यरत होणार आहेत?

अभ्यासक्रमाची निवड

करिअर घडविण्याच्या संदर्भात एकही क्षेत्र असे दिसत नाही की जिथे गणिताची भूमिका नाही. आजचा विद्यार्थी करिअरकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहे. एक विद्यार्थीवर्ग पारंपरिक परीक्षा, स्पर्धा परीक्षांच्या मार्गाने जाऊन करिअर घडवत आहे. स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेत गणिती क्षमतांवर आधारित प्रश्न असतातच. मग ती शालेय पातळीवरील स्कॉलरशिप, एमटीए, एनटीएस, ऑलिम्पियाड असो सेवा आयोगाची एमपीएससी, युपीएससी असो, एनटीएची जेईई, नेट-सेट असो किंवा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी असो गणित पक्के असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यात बाजी मारल्याचे दिसून येते.

अद्ययावत अभ्यासक्रम आणि गणित

नव्याने उदयाला येणारी डिझाइन, ॲनिमेशन, त्रिमिती छपाई, रोबोटिक्स, मशिन लर्निंग, तसेच डेटावर आधारित डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, इन्फॉर्मेटिक्स, कृत्रिम प्रज्ञा आणि बायो इंजिनिअरिंग, जेनेटिक इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन, ॲनिमेशन असे बहुशाखीय अभ्यासक्रम या क्षेत्रात कॉम्प्युटर सॉफ्टवेअर हे माध्यम म्हणून भूमिका बजावत असल्या कारणाने गणिती तर्कशास्त्र, अचूक मोजमापे इथेही लागतात. संशोधन क्षेत्रात निष्कर्षांची मांडणी सादर करण्यासाठी गणिती भाषाच लागते. बारावीला गणित हा विषय घेऊन उत्तीर्ण होणे म्हणजे वरील सर्व क्षेत्रांतील अभ्यासक्रमाची दारे आपल्यासाठी खुली करणे.

खुद्द गणित विषयात शिक्षण घ्यायचं असेल तर भारतात यूजीसी संलग्न महाविद्यालये, केंद्रीय विद्यापीठे, डीम्ड विद्यापीठे येथे गणित विषय घेऊन पदवी व पदव्युत्तर अर्हता मिळवता येते. त्यासाठी त्यांची प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. सर्व उच्च शिक्षण संस्था आयसर, एनआयएसईआर, आयआयटी, आयआयएससी इत्यादी ठिकाणी जे.ए.एम. (JAM) नावाची परीक्षा देऊन पदव्युत्तर गणित हा विषय घेऊन पुढे कॉमर्स, फायनान्स, डेटासायन्स, इन्फॉर्मेटिक्स निगडित क्षेत्रामध्ये करिअर करता येते. याशिवाय बरीच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे ऑनलाइन माध्यमातून गणिताचा मोफत अभ्यासक्रम शिकवतात. परीक्षा देऊन सर्टिफिकेट हवे असेल तरच फी भरावी लागते.

गणित आणि बरंच काही

धाडसीपणाने वेगळ्या व्यावसायिक वाटा चोखाळून करिअर घडविणारा दुसरा विद्यार्थीवर्ग आहे. व्यवसायाच्या फायद्याचे गणित मांडताना, बिझनेस मॉडेल लिन कॅनव्हास तयार करताना व्यावहारिक गणिताशी दोस्ती त्यांनाही यश मिळवून देणारी ठरते.

विद्यार्थी मित्रांनो, पहिली ते बारावी गणिताचा अभ्यास करण्याचे, आवडता अभ्यासक्रम निवडता येण्याबरोबर इतर अनेक फायदे आहेत. गणिताचा नियमित अभ्यास केल्याने गणिती क्षमतांबरोबरच, स्वभावात नियमितता, तर्कनिष्ठ विचार करण्याची सवय, समस्या निरसन करण्याची वृत्ती हे गुण बरेच वेळा आपोआपच निर्माण होतात. एक कंटाळवाणा, रटाळ, नावडता विषय म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. नव्याने उदयाला येणाऱ्या क्षेत्रात प्रवेश मिळविण्याची किल्ली म्हणून गणिताकडे पाहा. प्रयत्नपूर्वक गणिताचा अभ्यास करताना प्रथम पासूनच फक्त आकडेमोडीवर भर न देता त्यातील बारकावे समजून घ्यावे. आकलन, अचूकता आणि वेग याकडे लक्ष द्यावे. दहापर्यंतचे तरी पाढे पक्के पाठ करावे, रोज वेगवेगळी पाच गणिते सोडवावी. आपल्या शिक्षकांकडून योग्य ती मदत घेऊन नियमित अभ्यास केल्यास गणितात अवघड काहीच वाटणार नाही. तर मग आजपासूनच गणिताशी मैत्री करा आणि आपल्या करिअरचा मार्ग सुकर करा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.