ग्रोइंग माइंड्स
प्रांजल गुंदेशा , संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस
आदर्श नेतृत्व म्हणजे केवळ इतरांना मार्गदर्शन करणे नाही. नेतृत्व याचा अर्थ इतरांप्रती सहानुभूती, दयाळूपणा असणं आणि सचोटीने एखादी गोष्ट पुढे नेणं होय. आपल्या देशात अनेक यशस्वी उद्योगपती होऊन गेले आहेत. मात्र, ‘टाटा’ यांचं नाव आज सर्व लोक ज्या आदराने, कौतुकाने घेतात, त्याच प्रकारे दुसरं एखादं नाव क्वचितच घेतलं जात असेल. यामागे अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे, जेव्हा त्यांनी जमशेदपूरमध्ये लोह आणि पोलादचा प्रकल्प बांधला, तेव्हा त्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगले जीवन जगता यावं यासाठी निवृत्तिवेतन (पेन्शन) योजना सुरू केली. कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी नवे शहर वसवले. याचाच अर्थ ते काळाच्या अनेक दशकं पुढचा विचार करत होते. रतन टाटा अनेकदा हे नमूद करतात की, हे कार्य हाच टाटा कुटुंबाच्या संस्कृतीचा खरा वारसा आहे. त्यांनी याच गोष्टींचे निरीक्षण केले आणि यातूनच त्यांची जडण-घडण झाली.