अकोला : उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील विविध घटकांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मात्र, आता या उद्देशालाच हरताळ फासत विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात मोठी वाढ करून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा घाट घातला आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. बी.ए.-१ व बी.कॉम.-१ चे शैक्षणिक शुल्क रु.१,७०२ वरून रु.२,९८८ करण्यात आले आहे. ही वाढ ७५ टक्के आहे. विद्यापीठातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ५० टक्क्यांहून जास्त विद्यार्थी हे बी.ए. व बी.कॉम. अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतात.
त्यामुळे याच अभ्यासक्रमांमध्ये मुक्त विद्यापीठाने नेमकी शैक्षणिक शुल्कामध्ये ७५ टक्के वाढ केल्याने, समाजातील गरीब विद्यार्थी, जे पारंपरिक विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ शकत नाहीत, ते मुक्त विद्यापीठामध्ये पण पैशाअभावी प्रवेश घेऊ शकणार नाहीत,
अशी परिस्थिती शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने निर्माण झाली आहे. शैक्षणिक शुल्कात निर्दयीपणे वाढ करून विद्यार्थ्यांवर भुर्दंड लावण्याची काहीच गरज नसल्याचे विद्यापीठाच्या विद्वत परिषद व वित्त समितीचे माजी सदस्य प्रा.डॉ.संजय खडक्कार यांनी राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
विद्यार्थी संख्या घटतेय!
१९८९ मध्ये ५०० विद्यार्थी असलेल्या विद्यापीठाची विद्यार्थीसंख्या सहा लाखांपर्यंत पोचली होती. मागील शैक्षणिक वर्षात ती पाच लाखांपर्यंत घसरली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये एकूण नोंदणी प्रमाण २०३५ पर्यंत ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचा सरकारचा मानस आहे. सध्या तो जवळपास २९.१ टक्के आहे. तो वाढविण्यात मुक्त विद्यापीठ भरीव कामगिरी करू शकते. ते करण्याच्या दृष्टीने पावले पडणे आवश्यक आहे.
एकाच वेळी भरावे लागेल शुल्क
या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात वाढलेले प्रवेश शुल्क एकाच वेळी भरण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत.आतापर्यंत दोन टप्प्यांत प्रवेश शुल्क भरण्याची मुभा विद्यार्थ्यांना होती. प्रवेश शुल्क एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची बाब असो की एकाच टप्प्यात प्रवेश शुल्क भरण्याची अट असो, त्यामुळे आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंना विविध अभ्यासक्रमांमध्ये केलेली शैक्षणिक शुल्क वाढ कमी करण्याचे निर्देश राज्यपालांनी द्यावेत. जेणेकरून पैशाअभावी सामान्य विद्यार्थी, जे बिकट परिस्थितीची झुंजून, मोठ्या अथक प्रयासाने, उच्च शिक्षण घेऊ इच्छितात, ते प्रवेशापासून वंचित राहणार नाहीत.
- प्रा.डॉ.संजय खडक्कार, माजी सदस्य,विद्वत परिषद व वित्त समिती, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.