- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस
आपण समाजात वावरताना पाहतो की, काही लोक खूप लोकप्रिय असतात. सतत त्यांच्या आजूबाजूला लोकांचा गराडा असतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नैसर्गिकरीत्या चुंबकीय शक्ती आहे की काय, असा आभास होतो. लोक त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांची प्रशंसा करतात, त्यांच्या सहवासात राहू इच्छितात. प्रत्येकाला त्यांच्यात काही तरी वेगळं जाणवतं.
समाजातील अनेक यशस्वी लोक, नेते, खेळाडू, सिने कलाकार यांचा यात समावेश असतो. मग असे काय असते की, ज्यामुळे हे लोक इतके लोकप्रिय होतात? त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वेगळेपण काय असतं? अशा अनेक लोकांमध्ये आढळणारी काही समान वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊया.
प्रशंसा : असे लोक खुल्या मनाने इतरांचे कौतुक करणारे असतात. त्यामुळे कोणाचंही मनापासून कौतुक करा. मनापासून व्यक्त करण्याची प्रत्येक संधी हे लोक घेतात. ते अशा संधी सोडत नाहीत. त्यामुळे ते इतरांमध्ये वेगळे ठरतात.
अभिप्राय : प्रत्येक व्यक्ती, विक्रेता किंवा कोणालाही अभिप्राय हवा असतो. एक सकारात्मक अभिप्राय, एखाद्या व्हिडिओमुळे व्यवसायाची भरभराट होऊ शकते. याउलट नकारात्मक अभिप्राय दिला गेला, तर त्या व्यक्तीचा व्यवसाय बंद पडू शकतो. त्यामुळे अभिप्रायाला खूप महत्त्व असते.
गुगल रिव्ह्यू, कोर्सनंतरचे व्हिडिओ फीडबॅक, पोस्टवरील टिप्पणी, अनुभवानंतरचा लिखित संदेश, विक्रेत्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता किंवा चिंता या सर्व गोष्टी त्या संबंधित व्यक्तीसाठी फार महत्त्वाच्या असतात. तो त्या गंभीरपणे घेतो. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही कुठे तरी गेल्यावर जर तुम्हाला तुमचा अभिप्राय विचारला, तर न लाजता आणि न घाबरता प्रामाणिकपणे तुमचा अभिप्राय द्या. शक्य तो प्रशंसा करा.
काही उणीव असेल, तर ती खासगीत सांगा. आपला अभिप्राय देताना तो रचनात्मकदृष्ट्या योग्य आणि उपयुक्त असल्याचे सुनिश्चित करा. तुम्ही मोकळेपणाने दाद दिली, तर लोक निश्चितच तुमचे मत विचारात घेतील आणि तुम्ही लोकप्रिय व्हाल.
ऐकणे : तुम्ही एक निरीक्षण केले आहे का की, तुमचे सर्वांत जवळचे मित्र, व्यवसायातले भागीदार आणि इतरही जवळचे लोक तुम्हाला काय म्हणायचे आहे हे लक्षपूर्वक ऐकतात. कारण त्यांना तुमचं म्हणणं जाणून घ्यायचं असतं. मात्र, इतरांबाबत आपण असं करत नाही. त्यामुळे सर्वसामान्यपणे प्रत्येकाला कोणीतरी ऐकणारं हवं असतं.
बहुतेक लोकांना अशी एखादी व्यक्ती हवी असते की, जी तुमचं म्हणणं ऐकून घेईल. असे लोक तुमच्याशी शांतपणे बोलतात. स्वतःबद्दल बोलण्याऐवजी ते तुम्हाला तुमच्याबद्दल, आरोग्याबद्दल आणि व्यवसायाच्या वाढीबद्दल विचारतात. ते निर्णय किंवा सल्ला देत नाहीत, परंतु सहानुभूतीपूर्वक ऐकतात. असे लोक सर्वांना आवडतात.
कठीण काळातील साथ : एका यशस्वी उद्योजकाने मला एकदा सांगितले की, ‘मी कोणाच्याही अंत्यविधीला जाणे चुकवत नाही. माझ्या प्रिय व्यक्तींच्या घरच्यांची पुण्यतिथी असेल तर तिथेही मी जातो आणि माझ्या सद्भावना देतो. कारण त्या क्षणी लोकांना जास्त गरज असते. त्यामुळे अशा काळात तुम्ही इतरांना साथ दिली, तर लोक तुम्हाला कधीही विसरत नाहीत.
ऊर्जा : माणसांनी भरलेल्या खोलीत एखादाच माणूस असा असतो की, ज्याच्याकडे सर्वांचं लक्ष असतं, तो चैतन्याने सळसळत असतो. उत्साहाने बोलत असतो. काही लोक सुपर डायनॅमिक असतात. ते अत्यंत सहजपणे इतरांना आपलेसे करून घेतात. याचे कारण त्यांच्यामधली ऊर्जा, चैतन्य हे असते. आपण असे म्हणतो की, ‘जेथे लक्ष जाते, तिथे ऊर्जा वाहते’, पण यापेक्षा हे अधिक खरे आहे की, ‘जेथे ऊर्जा असते, तिथेच आपले लक्ष जात असते’. त्यामुळे मरगळ येऊ न देता सतत ऊर्जादायी राहण्याचा प्रयत्न करा.
हाताने लिहिलेल्या नोट्स : ज्याने तुम्हाला प्रेरणा दिली, शिकवले किंवा पाठिंबा दिला अशा एखाद्या व्यक्तीला तुम्ही शेवटच्या वेळी हाताने लिहिलेले पत्र केव्हा पाठवले होते? हाताने लिहिलेल्या पत्रांमध्ये (किंवा किमान ई-मेल) लोकांशी संपर्क साधण्याची, त्यांच्या मनात घर करण्याची जबरदस्त शक्ती आहे. त्यामुळे जमेल तेव्हा पत्र, ई-मेल लिहा.
पार्श्वभूमी : एका मुलाखतीत तीन अत्यंत यशस्वी भारतीय व्यक्तींनी ते पंतप्रधान मोदींना भेटले त्या क्षणाची आठवण सांगितली होती. त्या वेळी एकाने सांगितले की, मोदीजींनी त्यांना त्यांच्या आईच्या प्रकृतीबद्ल विचारले. याचाच अर्थ, त्यांना भेटण्यापूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी किती माहिती घेतली असेल, वाचन केले असेल. हे आपल्याला यातून कळते.
व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध पैलूंबाबत आणि गोष्टींबाबत जाणून घेण्यासाठी pranjal_gundesha या इन्स्टाग्राम पेजला आणि TheIntelligencePlus या यू-ट्यूब चॅनेलला भेट द्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.