पुणे - पदव्युत्तर शिक्षणानंतर वर्षभर दिवसरात्र अभ्यास करून सेट-नेट उत्तीर्ण झाले. मोठ्या मुश्किलीने पीएच.डी.साठी मार्गदर्शक मिळाले. विद्यापीठांचा लालफितीचा कारभार आणि कर्मचाऱ्यांची मनमानी सहन करत पीएच.डी.ही सुरू केली. इतरांप्रमाणे मला कोणतीही पाठ्यवृत्ती नाही.
संशोधनात काहीतरी चांगले करतेय म्हणून वेळप्रसंगी पोटालाही चिमटा दिला. बार्टीच्या संशोधन पाठ्यवृत्तीचा मोठा आधार होता. पण दोनदा रद्द झालेली परीक्षा, वारंवार बसणारी आर्थिक झळ आणि प्रचंड मनस्तापामुळे आता पीएच.डी.ही नकोशी झाली आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका संशोधक विद्यार्थिनीने व्यक्त केली.
सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांच्या संशोधन पाठ्यवृत्ती चाळणी परीक्षेतील गोंधळाने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा केला आहे. एकदा काय ते ठरवा आणि आम्हाला पाठ्यवृत्ती द्या, अशी मागणी उमेदवार करत आहे. बुधवारी (ता.१०) झालेल्या पाठ्यवृत्ती चाळणी परीक्षेतील उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाला स्थगिती देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा हजारो उमेदवारांच्या पाठ्यवृत्तीचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. सरकारच्या एकंदरीत विश्वासार्हतेबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता नक्की यातून काय मार्ग काढला जाणार हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पेपर फुटीचा आरोप निराधार -
पाठ्यवृत्तीच्या चाळणी परीक्षेचे मूल्यमापन थांबविताना सेट विभागाने पेपर फुटीचा आरोप निराधार असल्याचे पुन्हा म्हटले आहे. यासंबंधीचे परिपत्रक त्यांनी प्रसिद्ध केले आहे. ते म्हणतात,‘‘ए आणि बी प्रश्नपत्रिका संचास सील होते, परंतु सी आणि डी प्रश्नपत्रिका संच वेगळ्या मुद्रणालयाकडून छपाई करून घेतले असल्याने त्यांना सील नव्हते.
अशा प्रश्नपत्रिका संचाच्या पाकिटांना सील करण्यात आले होते. या पाकिटांचे सील परीक्षा केंद्रांवरच उघडण्यात आले होते. परीक्षा होण्यापूर्वी प्रश्नपत्रिकांची प्रत कोणत्याही व्यक्तीकडे कोणत्याही स्वरूपात उपलब्ध नव्हती. तसेच त्या प्रश्नपत्रिकांमधील मजकूरदेखील कोणत्याही व्यक्तीला कळालेला नव्हता.
संपूर्ण परीक्षा प्रक्रियादेखील सर्व परीक्षा केंद्रांवर अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात आली. त्यामुळे सदर परीक्षेच्या पेपर फुटीसंदर्भात केलेले आरोप हे पूर्णतः निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही,असे सेट समन्वयक बाळासाहेब कापडणीस यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रकटनात नमूद केले आहे.
सकाळकडे आलेल्या निवडक प्रतिक्रिया -
दुसऱ्यांदा गोंधळ झाल्यामुळे परीक्षेसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन पीएचडी करण्यासाठी प्रवेश मिळावा म्हणून रात्रंदिवस अभ्यास करतात. त्यासाठी मोठ्या शहरात राहण्याचा, खाणावळीचा आणि पुस्तके खरेदी करावी लागतात. हा सर्व खर्च सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. त्यामुळे पीएचडी करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळत आहे.यामुळे विद्याविभूषित विद्यार्थ्यांची एक प्रकारची अवहेलना केली आहे.
- किसन एकनाथ पिसे, चिखली (बुलडाणा)
शासनाने एकाधिकारशाही राबविण्याचा प्रयत्न येथेही केलेला आहे. सरसकट पाठ्यवृत्ती न देता पुन्हा पुन्हा परीक्षांचा घाट घालून संशोधक विद्यार्थ्यांना जेरीस आणणे, विद्यार्थी संघटनांमध्ये दुफळी निर्माण करणे, उच्च शिक्षणापासून परावृत्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
- दीपक मोरे, संशोधक विद्यार्थी
सातत्याने वादग्रस्त ठरणाऱ्या या परीक्षांमुळे एकंदरीत प्रक्रियेबद्दलचीच विश्वासार्हता धोक्यात आली आहे. मुळात पीएच.डी.ला प्रवेश घेतानाच आम्ही अनेक परीक्षा देतो. त्यात या परीक्षेचा घाट कशाला, सर्वच उमेदवार पात्र आणि लायक असून, त्यांना पाठ्यवृत्ती देण्यात यावी.
- वनिता आर. शिंदे, संशोधक विद्यार्थिनी
पाठ्यवृत्तीसारख्या विद्यार्थांच्या मूलभूत अधिकाराचीच गळचेपी होत आहे. आमची सर्व कामे सोडून इमाने इतबारे वारंवार त्या परीक्षांना सामोरे जात आहोत. परंतु प्रत्येक वेळा आमच्याच पदरी निराशा पडत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आधीच सारथी आणि महाज्योतीच्या २०२२ च्या विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्ती मिळाली असून, बार्टीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय का?
- नीलेश साबळे, बार्टी संशोधक विद्यार्थी २०२२
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.