परदेशी शिकताना : सक्षम नेतृत्व निर्माण करणारी संस्था

शैक्षणिक व संशोधन क्षेत्राचे केंद्रस्थान म्हणून ओळखले जाणारे केंब्रिज शहरातील सर्वात जुने विद्यापीठ म्हणजे हार्वर्ड विद्यापीठ.
abroad education
abroad educationsakal
Updated on

- ॲड. प्रवीण निकम

शैक्षणिक व संशोधन क्षेत्राचे केंद्रस्थान म्हणून ओळखले जाणारे केंब्रिज शहरातील सर्वात जुने विद्यापीठ म्हणजे हार्वर्ड विद्यापीठ. अमेरिकेतील सर्वांत जुनी शिक्षण संस्था म्हणून हार्वर्ड विद्यापीठाचे नाव घेतले जाते. पूर्वी या विद्यापीठाचे नाव ‘न्यू कॉलेज’ असे होते. जॉन हार्वर्डच्या प्रेरणेतून १६३९मध्ये हार्वर्ड विद्यापीठ हे नाव उदयास आले.

‘व्हेरिटास’ म्हणजे सत्य या ब्रीदवाक्याला अनुसरून या संपूर्ण विद्यापीठाची वाटचाल १९व्या शतकानंतर शैक्षणिकदृष्ट्या अधिक झालेली दिसून येते. भलामोठा २०९ एकरचा परिसर, विविध ग्रंथालये, अध्यापन-संशोधनाच्या सुसज्ज खोल्या आणि उच्च शिक्षणासाठी अनुकूल असा संपूर्ण परिसर. खरंतर परदेशी उच्च शिक्षणाचा विचार करत असताना मुख्यत्वे प्रगत शैक्षणिक केंद्र, अभ्यास संशोधनासाठी पूरक वातावरण यांचा विचार केला जातो. या निकषांवर आधारित विचार करता तुमच्यासाठी हार्वर्ड विद्यापीठ हा उत्तम पर्याय आहे.

हार्वर्ड विद्यापीठातील अभ्यासक्रम हा प्रकर्षाने लवचिकतेला प्राधान्य देतो. तुम्हाला आवड असलेल्या क्षेत्रातील व्याप्ती समजून घेणं. त्यावर स्व: नेतृत्वाच्या जोरावर अध्ययन कार्य पूर्ण करणे हे येथील अभ्यासक्रमाचे वेगळेपण आहे. येथे पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधींचे आहेत. या चार वर्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व कौशल्य, परदेशी भाषेविषयी जाण, एकाग्रता, विषयांतील प्रावीण्य संपादन कौशल्य यावर अधिक भर दिला जातो.

एकूण ११ स्वतंत्र शैक्षणिक संस्था कार्यरत असून मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ स्कूल, स्कूल ऑफ डेंटल मेडिसिन, ग्रॅज्युएट स्कूल ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्स, बिझनेस, डिझाईन यासह सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, कला व विज्ञान अशा विविध शाखांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या-त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते.

सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टिफिकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय उपलब्ध आहेत. या सर्व अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा अभ्यासक्रम म्हणजे नेतृत्वावर भर देणारे व कौशल्य विकास करणारे विविध कोर्स. उदा- डॉक्टर ऑफ एज्युकेशन लिडरशीप, प्रारंभिक शिक्षणातील नेतृत्व, शिक्षण व्यवस्थापन आणि नेतृत्वगुण...या सर्व अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांसाठीच्या जडणघडणीत स्वतःच्या क्षमतेचा विकास होण्यास मदत होते.

कोणत्याही कार्याच्या अंमलबजावणीत नेतृत्वाची गरज असते. कोणत्याही क्षेत्रात गेल्यावर नेतृत्व असणे गरजेचे असते‌ हे जाणून येथील हा अभ्यासक्रम विशेष ठरतो. असे विविधतेला महत्त्व देणारे, सर्वसमावेशक संस्कृतीला प्रोत्साहन देणारे समुदायातील प्रत्येक सदस्यासाठी आपलेपणाची प्रगल्भ भावना निर्माण करणाऱ्या तेथील वातावरणाबरोबर तज्ज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी यात निराळा वाटचालीचा धागा कायम दिसून येतो.

विद्यार्थ्यांना सर्वोत्तम उपकरणे, लाखो पुस्तकांचा संग्रह आणि पायाभूत सुविधा मिळू शकतात. इतकेच नाहीतर विद्यार्थांना उच्च शिक्षणासाठी व संशोधनाकरिता स्कॉलरशिप माध्यमातून मदत मिळते‌. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील तज्ज्ञ, समुपदेशक व इतर अनेक तज्ज्ञ मंडळी कायम सोबत असतात. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिकू इच्छिणारे विद्यार्थी हार्वर्डकडे आकर्षित होतात.

जवळपास जगभरातील शिकणारे ६ लाख लोक हार्वर्डच्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मद्वारे अभ्यासक्रम घेतात. हार्वर्ड विद्याशाखा स्थानिक शैक्षणिक संस्था, सरकारी संस्था, व्यवसाय आणि समुदायांशी जोडणारी परदेशातील स्थाने यासोबत जोडलेली आहे. जगभरातल्या तीसहून अनेक देशांचे प्रमुख हे या विद्यापीठाचे विद्यार्थी राहिलेले आहेत.

(लेखक ‘समता सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे चेवेणींग स्कॉलर आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.