- ॲड. प्रवीण निकम
शिक्षण आणि शिक्षणपद्धतीमध्ये सध्या आमूलाग्र बदल होत आहेत. भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणातही विद्यार्थी व शिक्षण केंद्री शिक्षणव्यवस्थेवर अधिक भर देण्यात आल्याचे दिसून येते. शिक्षणाचा पाया मजबूत होईल, तेवढे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी नवी भरारी घेण्यासाठी धडपडतील. सर्व स्तरातील आणि वर्गातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे. सर्व मुलांमध्ये शिकण्याची क्षमता असतेच.
ती त्यांना वापरता येण्यासाठी शाळा-महाविद्यालयाची मदत होते. भारतातील उच्च शिक्षण असो की, परदेशातील असो, कोणतेही शिक्षण हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचे आहे. त्यामुळेच अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण का महत्त्वाचे आहे? त्याची गरज काय? हे ठामपणे समजावून सांगणे आवश्यक आहे.
क्षमतांचा विकास
प्रत्येक मुलामध्ये कोणती तरी क्षमता दडलेली असते. त्या क्षमतेला योग्य पद्धतीने वाढवण्याचे काम शिक्षणातून होते. उच्च शिक्षणाचा विचार करता विद्यार्थ्यांमध्ये विविधांगी बदल होत असतात. त्याची मानसिक-भावनिक, सामाजिकदृष्ट्याही जडणघडण होत असते. शाळेत लाजरे-बुजरे राहणारे मूल महाविद्यालयात गेल्यावर तेथील पोषक वातावरणामुळे अधिक मुक्तपणे आपली मते मांडते, कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी धडपडते, आत्मविश्वासाने वावरताना दिसते.
विविध विषयांच्या शिक्षणामुळे आणि वयामुळे महाविद्यालयीन पातळीवर हे बदल होतात. याच क्षमतेच्या जोरावर ते मूल विकासाच्या नवीन वाटादेखील निर्माण करते. मात्र, अजूनही कित्येक मुलांमध्ये क्षमता असूनही त्यांना आर्थिक व सामाजिक कारणास्तव उच्च शिक्षण घेता येत नाही, असे दिसते. अशा वेळी शिष्यवृत्तीच्या मदतीने विद्यार्थांनी उच्च शिक्षण घेणे आवश्यक आहे.
कौशल्याधारित जीवन
उच्च शिक्षणामुळे जीवनकौशल्ये वाढीस लागतात. आपल्या आवडी-निवडी, भावना व वृत्ती यांच्याबद्दल स्पष्टपणे विचार करता येतो. व्यक्तीला आपल्या जीवनाचा व अस्तित्वाचा खरा अर्थ समजतो. यामुळेच निर्णयक्षमता, चिकित्सक विचार, सर्जनशील विचार, व्यक्ती-व्यक्तींमधील सहसंबंध निर्माण होतात.
विद्यार्थ्यांना, तसेच सर्वसामान्य व्यक्तीला जीवन आणि शिक्षण यांची सांगड घालताना जीवनकौशल्यांचा उपयोग होत असून, त्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात विकास होणे अपेक्षित आहे. यशस्वी जीवन जगण्यासाठी शिक्षणाची, प्रशिक्षणाची व कौशल्यविकासाची अत्यंत गरज आहे.
संशोधनात्मक वृत्ती
उच्च शिक्षण घेतल्याने विद्यार्थी जास्तीत जास्त प्रश्न विचारू लागतात. कोणतीही गोष्ट करताना आपण ती करतोय? त्या विषयाचा गाभा किंवा आशय काय आहे? त्याचे निकष कोणते आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्याची सवय उच्च शिक्षणामुळे निर्माण होते. संवाद व संशोधनवृत्ती अंगी असलेल्या विद्यार्थ्यांची जडणघडण अधिक वेगाने होते.
विचारांचा विस्तृत आलेख
शैक्षणिक जडणघडणीचा परिणाम विद्यार्थांच्या आचार व विचारांवर होत असतो. ज्ञानात्मक कक्षा रुंदावल्या की, विचारांची देवाण-घेवाणदेखील अधिक होते. उच्च शिक्षणामुळे अधिक वाचन, लेखन, तसेच चिंतन-मनन होतं असल्याने विचारदेखील टप्प्याटप्प्याने वाढताना दिसतात. ही ज्ञानाधिष्ठित सामाजिक व व्यक्तिगत वाटचाल विद्यार्थांसाठी महत्त्वाची आहे.
रोजगारक्षमता
सध्याचे युग स्पर्धात्मक आहे. उच्च शिक्षण आणि अनुभव अधिक तेवढ्या जास्त संधी खुणवतात. त्यामुळे रोजगाराच्या संधी आणि आवड लक्षात घेऊनच उच्च शिक्षण घेणे आवश्यक आहे. शिक्षणाचा प्रवास हाच शिक्षण ते रोजगार या मार्गावरील अडथळ्यांना सामना करण्याचे बळ देत असतो. त्यामुळेच केवळ उच्च शिक्षण घेऊन थांबता येत नाही तर, व्यवसायाभिमुख शिक्षण, प्रशिक्षण घेणेही आवश्यक ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.