तू वाचतोस काय आणि वाचत असल्यास नेमके काय वाचतो? हा प्रश्न मी बरेचदा मुलाखतीमध्ये उमेदवारांना हमखास विचारतो. हा प्रश्न विचारला की बऱ्याच जणांची दांडी उडते. पुस्तक सोडा, काही जण तर रोजचा पेपरही वाचत नाहीत, त्यांना त्याची गरज वाटत नाही.
‘वाचाल तर वाचाल’ हे तसं ऐकून ऐकून आपल्याला सरावाचंच झालेलं असतं. वडीलधाऱ्यांनी हे नेहमीच सांगितलेलं असतं. पण खरं सांगा, वाचन ही गोष्ट आपण किती गांभीर्यानं घेतो? हा प्रश्न विचारल्यावर बऱ्याचदा उमेदवार चाचपडतात. काही जण ठोकून देतात. कोणत्या तरी पुस्तकाचे नाव सांगतात. पण हे सर्व वरवरचे असते हे कळतेच. एका उमेदवाराला हाच प्रश्न मागील महिन्यात विचारला, त्यानं अब्दुल कलाम यांचं ‘इग्नायटेड माईण्ड्स’ हे उत्तर दिलं.
‘केव्हा वाचलं?’ ‘मी बारावीला असताना,’ त्याचं उत्तर. म्हणजे गेल्या काही वर्षांत या महाशयांनी एकही पुस्तक वाचलं नव्हतं. ‘वर्तमानपत्र वगैरे वाचतोस की नाही?’ दुसऱ्या उमेदवाराला मी प्रश्न विचारला.
‘हो, वाचतो की,’ त्याचं उत्तर. ‘बरं सांग, आजची हेडलाईन काय होती?’ या प्रश्नावर त्याचं उत्तर ‘सर आज वेळच नाही मिळाला.’ नंतर लक्षात आलं की हे महाशयही चुकून कधीही वर्तमानपत्र वाचत नव्हते.
अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तकं, वर्तमानपत्र वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा समज असतो. अनुभवी उमेदवारांना वाचन म्हणजे वेळेचा अपव्यय वाटतो. न वाचतानाही पैसे मिळतात की? नोकरी तर चालू आहे, असे लोकांना वाटू शकते. वर्तमानपत्रे किंवा पुस्तके का वाचावीत? त्यामुळे काही फायदा होतो का? कदाचित पुस्तके वाचल्यामुळे काहीच फायदा होत नाही, असा गैरसमज या उमेदवारांचा/कर्मचाऱ्यांचा होत असावा. वाचन केल्याने आपली विचारांची रुंदी वाढते. उंची वाढते. विचार प्रगल्भ व्हायला मदत मिळते. शब्दसंचय वाढतो. तुम्ही एकटे असाल, तर पुस्तकेच तुमचे खरे मित्र असतात. महान लोकांची आत्मचरित्रे जगण्याचा नवा मार्ग दाखवतात. या जगात आपणच अयशस्वी नाही, तर मोठमोठी माणसेही अयशस्वी होती. त्यांनी यश कसे मिळवले, हे आपल्याला कळते. जॉब मिळाल्यावर तुम्हाला बऱ्याचदा वेगवेगळ्या विषयांवर (अर्थात व्यवसायासंबंधी) गोष्टीवर, प्रोजेक्टवर मते द्यावी लागतात. प्रेझेंटेशन्स घ्यावी लागतात. अवांतर वाचनाची त्यासाठीही मदत होते. ‘हाऊ यू अपडेट युवर नॉलेज?’ तुझं ज्ञान तू कसं अद्ययावत, ठेवतो हाही प्रश्न मुलाखतीत असतो. काही मुले इंटरनेट वगैरे पाहतो, अशी उत्तरे देतात. पण फोकस विषयावर ठेवून नीट ज्ञान मिळवायचे असेल तर वाचन हवेच.
आजकाल ऑनलाइन पुस्तके, मासिके आणि वर्तमानपत्रेही उपलब्ध आहेत. त्याचाही उपयोग आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी होऊ शकेल. अनेक उमेदवार चांगले असूनही हमखास या टप्प्यात कमी पडतात. त्यांना जगाचे काही ज्ञान नसते, ना भान असते. आणि मग त्यांना कळत नाही की, आपल्याकडे सगळे असून आपले सिलेक्शन का होत नाही. उत्तर एकच, तुमचे वाचन नाही, तुम्ही अपडेट नाही. आपल्या आजूबाजूला माहितीचा स्फोट होतो आहे. आपण भरपूर माहिती वापरतो आहोत. ती माहिती आपल्या करिअरवर प्रभाव गाजवते आहे. स्वतःची क्षितिजे विस्तृत करण्यासाठी चांगली वाचन/लेखन क्षमता असणे आवश्यक आहे. काहीतरी नवीन शिकणे आवश्यक आहे, त्याचबरोबर आपले ज्ञान इतरांना सांगणे/दाखवणेदेखील आवश्यक आहे.
न वाचता कदाचित तुम्हाला एखादी नोकरी मिळेल, परंतु तुमचे करिअर नक्कीच होणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.