पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशप्रक्रियेंतर्गत बालकांच्या शाळा प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता मंगळवारपर्यंत (ता. ४) मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही मुदतवाढ अंतिम असून, यापुढे कोणत्याही प्रकारे मुदतवाढ दिली जाणार नाही, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रवेशप्रक्रियेंतर्गत पालकांना दिलासा मिळाला आहे.
‘आरटीई’नुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रक्रियेंतर्गत दरवर्षी राज्यातून तीन लाखांहून अधिक अर्ज येत असतात.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी नव्याने सुरू केली. त्यात पालकांना आपल्या पाल्याचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता या प्रक्रियेत नावनोंदणीसाठी मंगळवारपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.
प्रवेशप्रक्रियेतील आकडेवारी
एकूण शाळा - ९,२०९
रिक्त जागा - १,०५,११६
आलेले अर्ज - २,२५,९४२
पालकांनी हे करावे
अर्ज भरताना आपल्या राहत्या घराचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन तपासून पाहावे
संपूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये
आपल्या बालकाचा अर्ज भरताना जन्म दाखल्यावरीलच जन्मतारीख लिहावी
एक किलोमीटर, एक ते तीन किलोमीटर अंतरावर शाळा निवडताना कमाल दहाच शाळा निवडाव्यात
अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत
प्रवेशाची सोडत (लॉटरी) जाहीर झाल्यानंतर कागदपत्रे नसल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो
एका पालकाने आपल्या बालकांसाठी डुप्लिकेट अर्ज भरू नयेत
एकाच बालकाचे दोन अर्ज आढळल्यास दोन्ही अर्ज बाद होतील आणि ते अर्ज सोडत प्रक्रियेत समाविष्ट केले जाणार नाहीत
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.