पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रता परीक्षेबरोबरच (सेट) पीएच.डी. प्रवेश परीक्षेचीही (पेट) जय्यत तयारी केली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये विद्यापीठाची ‘पेट’ परीक्षा घेण्याच्या निर्णयास व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संशोधन केंद्रात विद्यार्थ्यांना पीएच.डी.प्रवेशाची संधी लवकरच प्राप्त होणार आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीस विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र विखे-पाटील ,डॉ. देविदास वायदंडे, डी.बी. पवार, सागर वैद्य, बागेश्री मंठाळकर आदी उपस्थित होते.
विद्यापीठाची नवीन कार्यप्रणाली, प्राध्यापकांची भरती, नवीन महाविद्यालयांच्या इरादा पत्राला मान्यता आदी विषयांवर व्यवस्थापन परिषदेत चर्चा झाली. विद्यापीठाच्या पीएच.डी प्रवेश प्रक्रियेबाबत झालेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमावलीनुसार पीएच.डी.प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक तयारी केली जात होती.
यापुढील काळात ज्या ठिकाणी संशोधन केंद्र आहेत, त्याच ठिकाणच्या संशोधक मार्गदर्शकाला पीएच.डी.साठी विद्यार्थी घेता येणार आहेत. त्यामुळे पुढील काळात पीएच.प्रवेशाच्या जागा काही प्रमाणात कमी होणार आहेत. विद्यापीठातर्फे नोव्हेंबर २०२२ मध्ये पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरानंतर नवीन प्रवेश प्रक्रियेची घोषणा झाली आहे.
प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी -
विद्यापीठाची अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेच्या ठरावांना केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप सागर वैद्य यांनी केला. ते म्हणाले, ‘विद्यापीठाच्या कामासंदर्भातील अनेक फाईल्स कित्येक महिने प्रलंबित राहतात.. प्राध्यापक भरती, नेट-सेट स्कृटनी, प्रमाद समितीचे अनेक विषय प्रलंबीत आहे. तसेच विद्यापीठाची प्रस्तावित कार्यप्रणाली (एसओपी) लोकशाहीला धोक्यात आणणारी आहे. प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक सदस्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे.’
महत्त्वाचे विषय -
- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी ८० नवीन महाविद्यालयांना सुरू करण्याच्या इरादापत्रांना शिफारशीसह मंजिरी देण्यात आली
- युवा संगम तिसरा टप्प्यातील (आसाम) सांस्कृतिक शैक्षणिक प्रवास भेट उपक्रमाला मंजुरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.