School : शाळांच्या वेळापत्रकात असणार ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आनंददायी शनिवार’
school
schoolsakal

पुणे - शालेय शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जावा, या दृष्टिकोनातून राज्य सरकारने दर शनिवारी शाळांमध्ये ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेतला असला, तरी या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये होणार आहे. त्याप्रमाणे शाळांच्या वेळापत्रकातही बदल होतील. त्यामुळे आता शाळांच्या वेळापत्रकात दर शनिवार हा खास आनंददायी ठरणार असणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वीच घेतला आहे. या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

शालेय शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास व्हावा, त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात, सहकार्य वृत्ती वाढावी, तर्कसंगत विचारांबरोबरच रचनात्मक कल्पनाशक्ती आणि नैतिक मुल्यांसह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज शिक्षण विभागाला प्रकर्षाने जाणवली. त्यातूनच ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबविल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढेल आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल.

विद्यार्थ्यांच्या गळतीचे आणि अनुत्तीर्ण राहण्याचे प्रमाण कमी होईल, विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन उत्तम अध्ययन होईल, या हेतूने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षात राज्यात हा उपक्रम राबविण्यासाठी शिक्षण आयुक्त आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक हे रूपरेषा तयार करणार आहेत. लवकरच ही रूपरेषा शिक्षण विभागामार्फत शाळांपर्यंत पोहचवली जाईल.

उपक्रमाचा हेतू

  • खेळीमेळीच्या वातावरणातून विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी करणे

  • शालेय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे

  • विद्यार्थ्यांना ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यास सक्षम बनविणे

  • संभाषण कौशल्य आणि नैराश्यावर मात करण्याची क्षमता विकसित करणे

  • विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे

उपक्रमात समाविष्ट असणाऱ्या कृती

  • कृती, खेळ यावर आधारित उपक्रम

  • प्राणायाम, योग, ध्यानधारणा, श्वसनांची तंत्रे

  • आपत्ती व्यवस्थापनातील मूलतत्त्वे आणि व्यावहारिक प्रशिक्षणे

  • समस्या निराकरणासाठी उपाययोजना

शाळांमध्ये विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा भावनिक, सामाजिक विकास साधण्याचा प्रयत्न होत असतो. परंतु, आता ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमाच्या निमित्ताने त्यासाठी खास असा वेळ अधिकृतरीत्या राखीव ठेवणे शाळांना शक्य होणार आहे. या दिवसाचे औचित्य साधून शाळांनी अभिनव उपक्रम राबविण्यावर भर द्यायला हवा.

- अनिता नाईक, माजी मुख्याध्यापिका

शिक्षणाबरोबरच त्या-त्या वयोगटानुसार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपक्रमांचा समावेश ‘आनंददायी शनिवार’मध्ये करता येईल. उपक्रम, कृती, खेळ यातून शिक्षणाची गोडी लावणे याबरोबरच शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सामाजिक, भावनिक विकास साधण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. हा उपक्रम राबविण्याचा आदेश राज्य सरकारने दिल्याने आता शाळांच्या वेळापत्रकात दर शनिवार हा अशा उपक्रमांसाठी राखून ठेवावा लागणार आहे.

- जयवंत कुलकर्णी, समुपदेशक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com