‘सॉफ्टवेअर’ अभियंता होताना...

आपण चांगला अभियंता होण्यासाठी कोणते गुण लागतात याविषयी जाणून घेत आहोत, पण चांगला अभियंता होणे काही सोपी गोष्ट नाही.
Software Engineer
Software Engineersakal
Updated on

आपण चांगला अभियंता होण्यासाठी कोणते गुण लागतात याविषयी जाणून घेत आहोत, पण चांगला अभियंता होणे काही सोपी गोष्ट नाही. त्या-त्या प्रकारची बुद्धिमत्ता असणे, आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे आणि त्यासाठी आवश्यक स्वभाव असणे या गोष्टी न तपासताच आधीच विशिष्ट प्रकारचा अभियंता होण्याचे ठरवून टाकणे काही बरोबर नाही.

अभियंता म्हटले, तरी तो काही एकच एक प्रकार नाही; त्यात इतकी विविधता आहे की, प्रत्येक प्रकारच्या अभियंत्याला लागणारी बुद्धिमत्ता, कौशल्ये आणि वृत्ती टोकाच्या भिन्न आहेत. संगणक-प्रणाली (सॉफ्टवेअर) अभियंत्याला प्रणाली लिहिताना लागणारी बुद्धिमत्ता ही स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग)पेक्षा पूर्णपणे भिन्न आहे.

संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी तार्किक आणि रेखीय विचार करता येणे महत्त्वाचे असते, तर स्थापत्य अभियंत्यांना त्रिमितीय विचार करता येणे आणि चित्रकलेची जाण असणे आवश्यक असते. बहुतेक वेळा संगणक अभियंत्याला एका ठिकाणी बसून संगणकावर तासन्‌ तास काम करावे लागते, तो घरूनसुद्धा काम करू शकतो, तर स्थापत्य अभियंत्याला बांधकामाच्या ठिकाणी जाऊन लक्ष ठेवावे लागते. आज संगणक प्रणाली अभियंत्याला काय प्रकारचे गुण लागतात आणि त्यातील संधी व आव्हाने काय आहेत हे अधिक तपशीलात पाहूया.

संधी

संगणक प्रणाली अभियंत्यांना विविध प्रकारची उपकरणे चालविण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी, माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी संगणक प्रणाली तयार करावी लागते. रोबोट, सीएनसी मशिन्स, वाहने, विमाने, वैद्यकीय उपकरणे अशा अनेक यंत्रांना संगणक प्रणाली लागते. बँका, पतपेढ्या, शेअर मार्केट, संस्था, कंपन्या या सर्वांना आर्थिक हिशेब ठेवण्यासाठी संगणक प्रणाली लागते.

मालाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना, ते विकणाऱ्या दुकानांना अथवा मॉल्सना उत्पादनांच्या नोंदी ठेवण्यासाठी प्रणाली लागते. प्रवासी अथवा मालाची वाहतूक करणाऱ्यांना ट्रॅकिंग करणारी प्रणाली लागते. मोबाइल अथवा संगणक चालविण्यासाठी मूळ प्रणाली व त्यावर चालणारी ॲप्स विकसित करावी लगतात. जीवनातील सर्वच क्षेत्र संगणकीय प्रणालीद्वारे चालवलेल्या उपकरणांनी व्यापलेले आहे.

किचकट अभ्यासक्रम

बाहेरून सहज वाटणारी प्रणाली आतमध्ये तितकीच किचकट आणि अवघड असते. ती बनवण्यासाठी अभियंते खूप मेहनत घेत असतात. त्यातूनच ही प्रणाली रोज वेगवेगळा आकार घेत असते, नवनवीन वैशिष्ट्ये जोडत, अद्ययावत होत असते. थोडक्यात काळानुसार बदलत असते. हे सर्व करण्यासाठी नवीन गरज ओळखली जाते, विशिष्ट योजना आखली जाते आणि पूर्ण करण्यासाठी मुदतही ठरवली जाते.

हे सर्व काम वेगवेगळ्या स्तरांवर विभागले जाते आणि कामाला सुरुवात केली जाते. यासाठी C, C++, Python, Java अशा प्रकारच्या संगणकीय भाषा याव्या लागतात. अशा प्रणाली विकसित करण्याचे शिक्षण बीई-संगणकशास्त्र, संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी व बी.सी.एस. अशा पदव्यांच्या अभ्यासक्रमात मिळते. शिवाय औपचारिक अभियंत्रिकी महाविद्यालयांशिवाय अनौपचारिक व्यवस्थामधूनही याचे शिक्षण मिळते.

राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रात आहेत. बहुराष्ट्रीय कंपनीत कामाचे स्वरूप अगदी रचनात्मक पद्धतीने असते. प्रत्येकाचं काम ठरलेलं असत आणि जो तो ठरलेल्या वेळेनुसार काम करत असतो. असं सगळं पद्धतशीरपणे चालत असतं. त्या रचनेत बसून अत्यंत चिकाटीने काम करावे लागते. अलीकडच्या काळात संगणक प्रणाली अभियंत्याला गलेलठ्ठ पगार जरी मिळत असला आणि घरून काम करण्याची सवलत जरी मिळत असली तरी ते काम कमी तणावाचे नाही.

स्पर्धेचं जग

सतत बदलणारे तंत्रज्ञान आणि त्यासोबत जुळवून घेण्यासाठी लागणारी शक्ती, प्रोजेक्ट्सच्या डेडलाइन्स, विचित्र शिफ्ट्स आणि परदेशी क्लाएन्ट्सचे अवेळी कॉल्स अशा तणावाच्या गोष्टी असतात. शिवाय ऑफिसमधील राजकारणाला सामोरे जावे लागते ते वेगळेच. वयाने व अनुभवाने मोठे होत जाऊ तसा पगार वाढवून मिळेलच याची शाश्वती नसते.

अलीकडच्या काळात संगणक प्रणाली विकसित करणाऱ्या कंपन्याही खूप झाल्याने कंपन्यांना काम मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. शिवाय आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात या क्षेत्रात विद्यार्थी आल्याने स्पर्धा व पर्यायाने नोकरीची अनिश्चितता वाढली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता किती प्रमाणात नोकऱ्या कमी करेल हेही बघावे लागेल. या सर्वच बाबींचा संगणक अभियंता म्हणून जीवनकार्य निवडण्यापूर्वी विचार करावा लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.