‘लक्ष्य’भेद : शिस्तीचे महत्व

लोकसेवा आयोगाची परीक्षा ही एक लढाईच आहे आणि शूर समुराईसारखी ती जिंकण्यासाठी आवश्यक असते शिस्त आणि प्रयत्नातील नियमितता.
discipline
disciplinesakal
Updated on

- सोनल सोनकवडे

लोकसेवा आयोगाची परीक्षा ही एक लढाईच आहे आणि शूर समुराईसारखी ती जिंकण्यासाठी आवश्यक असते शिस्त आणि प्रयत्नातील नियमितता. अभ्यास करण्याची पद्धत आणि सवय आणि त्यातील नियमितता या परीक्षेच्या यशामध्ये महत्त्वाची असते.

प्रेरणेने सुरुवात जरूर होते परंतु एखाद्या सवयीनेच आपल्या ध्येयाचा पाठलाग अधिक सुकर होतो. इच्छुक उमेदवारांचा पुढचा प्रश्न तयार असतो तो म्हणजे दिवसातून किती तास अभ्यास केला तर यूपीएससी, एमपीएससीतून उत्तीर्ण होता येतं? त्याचं ठोस उत्तर नाही. किती तास अभ्यास केला यापेक्षा कसा अभ्यास केला याला महत्त्व आहे.

आपल्या सगळ्यांकडे दिवसाचे २४ तास असतात. त्या २४ तासांचा अभ्यासाच्या दृष्टीने पुरेपूर फायदा कसा करून घ्यायचा हे जाणून घ्यावं लागेल. अनेक वेळा खूप तास सलग अभ्यासाला बसल्याने आपली ताकद संपते, आपल्याला थकायला होतं आणि मग आपण पुढे अभ्यास करू शकत नाही.

त्यामुळे आपल्याकडील मर्यादित वेळेत आपली सारी ऊर्जा एकाच चार तासांच्या बैठकीत न संपवता, तिचा वापर अधिक काळासाठी करता येईल अशा पद्धतीने अभ्यासाच्या सवयी लावून घेणं म्हणजे गुड स्टडीहॅबिट्स. अभ्यासाला सुरुवात करताना अनेक वेळा आपलं मन प्रसन्न असतं म्हणून अगदी सुरुवातीचा एक दोन तास आपण अगदी मन लावून, उत्साहाने अभ्यास करतो तेव्हा आपला वाचनाचा वेग वाढतो.

वाचलेलं सगळं आपल्याला कळत जातं, काही अंशी लक्षातही राहतं परंतु हळूहळू वेळ जसा पुढे जाऊ लागतो तस तसं आपण दमायला लागतो आणि पुस्तकावरून नजर जरी फिरत असली तरी आपण जे काही वाचतो ते प्रभावीपणे आपल्या लक्षात राहत नाही, डोक्यात शिरत नाही आणि मग जसजसा हा उत्साह कमी होतो, तसतसं आपण वाचत असतो त्या विषयातलं आपलं लक्ष उडतं.

हल्लीच्या काळात सलग अभ्यासाला बसता न येण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे मोबाईल आणि समाज माध्यमं. अभ्यास करता करता तुम्ही फेसबुक, इन्स्टाग्राम पाहत असाल किंवा एखाद्या मित्र अथवा मैत्रीणीशी गप्पा मारत असाल, तर अशा वेळी ते टाळून भारताच्या भूगोलाकडे अथवा राज्यशास्त्राकडे लक्ष वळवणं, थोडक्यात अभ्यासावर लक्ष एकाग्र करणं जास्त अवघड असतं. या बहुअवधानांचं नियोजन करणं आपल्याला जमत नाही आणि मग अशा वेळी केलेल्या अभ्यासाचा फायदा तर सोडाच पण अशा रीतीने केलेला अभ्यास मारकच ठरतो.

या आणि अशा सगळ्या अडथळे आणि लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून स्वत:चा बचाव करत उपलब्ध वेळात चांगला आणि पुरेसा अभ्यास करता यावा यासाठी अभ्यासाच्या सवयी गरजेच्या असतात. आपल्या अभ्यासाच्या सवयी आणि आपली जीवनशैली म्हणजेच आहार, झोपेची वेळ आणि त्याचा कालावधी, शारीरिक क्षमता, व्यायाम हे घटक परस्परावलंबी असतात.

आपल्या दिनक्रमात चांगली शिस्त असेल तर अधिक चांगला अभ्यास होतो आणि अभ्यासामध्ये सातत्य राखता येते. स्पर्धा परीक्षा आणि त्यातही विशेषतः लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यासक्रम पाहता अशा लहरी आणि अनियमित अभ्यासाचा फायदा होत नाही.

दिवसातील ठराविक काळ मान खाली घालून, संपूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करूनच अभ्यास करावा लागतो. यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा.

(लेखिका ‘आयआरएस’अधिकारी, गीतकार, गायिका आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.