भारतीय संख्याशास्त्रज्ञांची यशोगाथा
भारतीय संख्याशास्त्रज्ञांची यशोगाथाsakal

भारतीय संख्याशास्त्रज्ञांची यशोगाथा

नुकत्याच आपल्या देशात लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या. या निवडणुकांच्या निकालाबद्दल आपल्याला अनेक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांतून बरीच आकडेवारी पाहायला मिळत होती.
Published on

नुकत्याच आपल्या देशात लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या. या निवडणुकांच्या निकालाबद्दल आपल्याला अनेक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांतून बरीच आकडेवारी पाहायला मिळत होती. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशातील निवडणूक निकालाची आकडेवारी सोप्या शब्दात सांगणे हे मोठे कठीण काम या माध्यमांनी करून दाखवले. परंतु, यामागे सर्वांत मोठा हात असतो तो संख्याशास्त्र जाणणाऱ्या व्यक्तींचा. केवळ निवडणुकाच नव्हे, तर अन्य क्षेत्रातील आकडेवारी गोळा करून तिचे विश्लेषण करणे आणि योग्य ते आकलन करून घेणे हे काम संख्याशास्त्रज्ञ अगदी लीलया करत असतात. अशाच भारतातील काही निवडक संख्याशास्त्रज्ञांची यशोगाथा डॉ. मधुसूदन डिंगणकर यांनी भारतीय संख्याशास्त्रज्ञ या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला सांगितली आहे.

स्टॅटिस्टिक (संख्याशास्त्र) हा मूळचा ग्रीक शब्द. या शब्दाची उत्पत्ती कशी झाली? नेमका स्टॅटिस्टिकचा वापर त्या काळात ग्रीकमध्ये कशा पद्धतीने केला जात होता? याची माहितीदेखील लेखकाने या पुस्तकात अगदी सुरुवातीच्या प्रकरणातच दिली आहे. बरेचदा आपण अनेक पाश्चात्त्य कल्पना या आपल्या देशात त्यापूर्वीच होत्या असे छातीठोकपणे सांगतो, पण त्यांचे संदर्भ मात्र आपल्याला ठाऊक नसतात. सांख्यिकी अर्थात स्टॅटिस्टिक हे भारतीय इतिहासातदेखील समाविष्ट झालेले शास्त्र होते. याचे महाभारतापासूनचे संदर्भ लेखकाने या पुस्तकात दिले आहेत. त्याचप्रमाणे भारतामध्ये संख्याशास्त्राचा विकास कसा झाला? त्यासाठी कोणी कोणी योगदान दिले? याची माहितीदेखील या पुस्तकात देण्यात आली आहे. पुढील प्रकरणांमध्ये लेखकाने संख्याशास्त्र या विषयात काम करून नावलौकिक मिळविलेल्या आणि एक वेगळे क्षेत्र निवडून देशाच्या विकासात हातभार लावलेल्या भारतीय संख्याशास्त्रज्ञांची माहिती, त्यांचे संक्षिप्त जीवन चरित्र आणि त्यांनी संख्याशास्त्राच्या क्षेत्रात दिलेले योगदान याबद्दल माहिती देण्यात आली आहे. गणेश व्यंकटेश जोशी, प्रा. प्रशांत महालानोबिस, डॉ. राजेंद्र बोस, डॉ. वि.म. दांडेकर प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्यासह १५ संख्याशास्त्रज्ञांनी केलेले कार्य उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

लेखकाने यातील चौथ्या प्रकरणामध्ये भारतातील नामवंत संख्याशास्त्रीय संस्थांची माहिती दिली असून, या संस्थांमध्ये काम करण्याची प्रेरणा युवकांना दिली आहे. तसेच आधुनिक काळातील विविध क्षेत्रात संख्याशास्त्र किती महत्त्वाचे ठरते आणि यात करिअरच्या कोणत्या संधी दडलेल्या आहेत, याबद्दलही लेखकाने एका स्वतंत्र प्रकरणात अंगुलीनिर्देश केला आहे. आधुनिक संख्याशास्त्राचे जनक मानले गेलेले डॉ. रोनल्ड फिशर यांच्याबद्दलही लेखकाने परिशिष्टामध्ये माहिती दिली आहे. त्यामुळे संख्याशास्त्र या विषयाबद्दल कुतूहल असणाऱ्यांसाठी हे पुस्तक मौल्यवान भेट ठरणारे आहे, पण एका आगळ्या-वेगळ्या क्षेत्राची आणि वर्तमानकाळात सर्व क्षेत्रात ज्याची गरज भासणार आहे अशा संख्याशास्त्राची ओळख करून देणारे हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे.

(संकलन : रोहित वाळिंबे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.