- प्रा. तात्यासाहेब काटकर, अकलूज, मो. ९२२६१४४८३६
दहावी, बारावी परीक्षांचे निकाल नुकतेच लागले आहेत. विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये एक कॉमन विचार असेल. पुढे काय व कसे? कोणते व कशात करिअर करायचे? या प्रश्नांची उत्तरे शोधताना, त्यातील योग्य पर्याय निवडताना सर्वांचीच दमछाक होत आहे. शिक्षण क्षेत्रात उपलब्ध असलेले विविध कोर्सेस, त्यांची होत असलेली प्रचंड जाहिरात, बरोबरीच्या मित्रांचे दबाव या सर्व खेचाखेचीतून आपल्याला हवा तसा, खिशाला परवडणारा, समाजमान्यता असलेल्या योग्य करिअरची निवड करावी लागते. आधी करिअर महत्त्वाचं आहे.
आयुष्यात काही तरी बनून दाखवायचं असतं. स्वतःला सिद्ध करायचं असतं. स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात आपण कुठे तरी करिअर निवडताना स्वतःबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करायचं विसरतोय. मी खरंच कसा आहे? मला खरंच काय करायचं आहे? मला काय काय आवडतं? मी जे काही अभ्यासक्रम निवडतोय, त्याबद्दल मला पूर्ण माहिती आहे का? या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप महत्त्वाचा आहे.
कारण भारतामध्ये करियरच्या बाबतीत जी संशोधने होतात त्यामध्ये करिअर निवडल्यानंतर यशस्वी होणारे किती आहेत, याचा आढावा घेतला तर ड्रॉप आउट रेट म्हणजे मध्येच सोडण्याचा किंवा अपयश येण्याचा जो दर आहे, त्याचे प्रमाण खूपच जास्त आहे...मग असं का होतं? गफलत कुठे होते? मध्येच करिअर सोडणे, नैराश्य वाढणे, अपयश आल्यामुळे खचून जाऊन आत्महत्या करणे किंवा तसा विचार करणे, अशा गोष्टी होऊ नयेत, म्हणून स्वतःला ओळखा (Know yourself) मित्रांनो, म्हणाल तर सोपे... म्हणाल तर अवघड आहे.
कारण भल्याभल्यांना, मोठमोठ्यांना स्वतः ला ओळखता येत नाही पण ते आपल्याला करायचे आहे. पुढे जाऊन आपलं चुकलंच, आता हे आवडत नाही, मला जमत नाही, असं वाटायला नको, असेल तर आताच पाऊल टाकण्या अगोदर स्वतः ला व्यवस्थित ओळखा.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या जगण्याचे कारण, अर्थ शोधण्याचा प्रवास म्हणजे करिअर. स्वतःला काय आवडते ते पहा. जे आयुष्यभर करणार आहात त्यात आनंद मिळायला हवा. तो आनंद नेमक्या कोणत्या क्षेत्रात आहे, ते शोधा. नुसती आवड असून चालणार नाही, ते जमलं ही पाहिजे.
मित्रांनो आज कोरोना मुळे विचारधारा बदलली आहे. आजूबाजूचे जग बदलले आहे. त्या बदलानुसार स्वतः ला अपडेट करा. कारण जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, हे वर्षे म्हणजे मानसिक आजाराचे दशक असणार आहे. जगाला कशाची गरज आहे, ते ओळखून वेगवेगळी कौशल्य, क्षमता आत्मसात करून घ्या.
स्वतःला स्वीकारा (Accept yourself) मित्रांनो, आपण काय आहोत, कसे आहोत आहे तसेच स्वीकारा. कोणीच ‘ढ’ नसतो. काहीतरी त्यात विशेष असतेच किंवा कोणती ना कोणती बुद्धिमत्ता असतेच. तशी आपल्याकडे काय आहे त्याचा शोध घ्या. बघा हं तुम्ही स्मार्ट आहात, हे महत्त्वाचे नाही तुम्ही कसे स्मार्ट आहात, हे महत्त्वाचे. आपल्यातल्या निगेटिव्ह घटक स्वीकारून त्यावर मात करा. काही घटक कंट्रोल करता येत नसतील तर सोडून द्या.
तुमच्यातील सकारात्मक आणि वास्तवदर्शी विचार स्वीकारा. मनातील गोष्टी कृतीत उतरावा. जमिनीवर उतरून वास्तव कृती करा. तुम्हाला कुणी सांगितले तरच करण्यापेक्षा स्वतः करा व स्वीकारा. तुमच्यामध्ये भक्कमपणे किंवा कमकुवत बाजू काय आहेत, त्याचा स्वीकार करा. तसेच करिअर निवडताना धोके व कुठे-कुठे संधी आहेत याचा विचार करा. स्वतःला समृद्ध करा (Enrich yourself) मित्रांनो, तुम्हाला यशस्वी किंवा आनंदी व्हायचे असेल तर स्वतः ला वेगवेगळ्या पद्धतीने समृद्ध करायला हवं.
नेहमी आजूबाजूच्या घटना, परिस्थितीमधून काहीतरी शिकत किंवा घेत रहायला हवं. यासाठी तुम्हाला भरपूर वाचन करायला हवं. नुसतं वाचन करू नका, आपल्या करियरच्या बाबतीत नवनवीन गोष्टी, पुस्तके वाचा. त्यातील नेमकं ते शोधा व चिंतन करा. त्या त्या क्षेत्रातील लोकांना प्रत्यक्ष भेटा व चर्चा करा. शक्य असल्यास किंवा वेळ मिळाल्यास प्रत्यक्ष अनुभव घ्या. कोणत्याही दबावाखाली किंवा आकर्षणापोटी निर्णय घेऊ नका. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. निर्णयच नाही तर जबाबदारीही स्वतः घ्यायला शिका. जेवढे स्वतः ला समृद्ध करता येईल तेवढे करा आणि हो सर्वात महत्त्वाचे स्वतः वर विश्वास ठेवा.
करिअर म्हणजे फक्त कोर्स करायचा, नोकरी, व्यवसाय करायचा, पैसे कमवायचे इतके मर्यादित नाही. आयुष्यात पुढे जे करायचे आहे ते म्हणजे कारकीर्द किंवा करिअर त्यातून पैसाही मिळेल व आनंदही. पण आजकाल करिअर हा पैसा आणि नोकरी याचा समानार्थी शब्द झाला आहे. करिअर म्हणजे खरंच नोकरी आणि पैसा एवढंच असतं का? खरं तर, करिअर म्हणजे अशी गोष्ट जी करताना समाधान असतं, जे केल्याने आपल्याला आनंद मिळतो. विद्यार्थ्यांनो आत्ताच्या जगातील स्पर्धा तुम्हाला भेडसावत असतील पण स्पर्धा असली तरी निरनिराळ्या संधीसुद्धा वाढत आहेत. प्रत्येक मुलाला चाखता येतील इतकी फळे उपलब्ध आहेत, फक्त तिथपर्यंत पोचायची आणि ते गोड फळ चाखायची इच्छा असायला हवी तर करिअर घडेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.