पुणे : कुटुंबाची जबाबदारी, लग्नाचे बंधन किंवा काही अपरिहार्य कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांना आपले पदवी शिक्षण अपूर्ण सोडावे लागते. मिळालेल्या एक-दोन वर्षांच्या शिक्षणातून ना नोकरी मिळते, ना भविष्यात त्याचा फायदा होतो. मात्र नवीन शैक्षणिक धोरणाने (एनईपी) विद्यार्थ्यांना ‘मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट’ पर्याय उपलब्ध केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अपरिहार्यप्रसंगी हा पर्याय स्वीकारता येईल.
ग्रामीण आणि आदिवासी भागात पदवीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या बहुतांश मुलींचे लग्न होतात. पुढे स्थिरस्थावर झाल्यावर त्यांना शिकण्याची इच्छा असते; पण त्यासाठी पुन्हा पदवीच्या पहिल्या वर्षापासून अभ्यास करणे शक्य होत नाही. अशावेळी जेथून शिक्षण सोडले, त्याच अभ्यासक्रमापासून पुढे शिकण्याची सुविधा ‘एनईपी’ने उपलब्ध केली आहे. तसेच मुलांनाही काही अपरिहार्य कारणामुळे शिक्षण सोडावे लागते. असे विद्यार्थी पुन्हा परत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतीलच असे नाही. मात्र ‘मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट’मुळे त्यांना संधी उपलब्ध होत आहे. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाला यंदापासून हा पर्याय उपलब्ध असेल, मात्र त्यासाठी काही व्यवसायाभिमुख श्रेयांक विद्यार्थ्यांना पूर्ण करावे लागणार आहेत.
कौशल्याभिमुख विषय गरजेचे :
अपरिहार्य कारणामुळे विद्यार्थ्याला जर त्या वर्षी शिक्षण थांबवायचे असेल, तर १० टक्के श्रेयांकाचा ‘एक्झिट कोर्स’ घ्यावा लागले. या अभ्यासक्रमांत कौशल्याभिमूखतेवर भर दिलेला असेल. जेणेकरून विद्यार्थ्याला त्या पदवीच्या आधारे नोकरी मिळू शकते. पुढे सात वर्षांच्या आत विद्यार्थ्याला परत येत पुन्हा तेथून अभ्यास सुरू करता येईल. विद्यार्थ्यांचे श्रेयांक ॲकॅडमिक बॅंक ऑफ क्रेडिट्समध्ये साठवले जाणार असून आवश्यकतेनुसार विद्यार्थ्याला ते वापरून पदवी प्राप्त करता येईल.
कोणत्या वर्षाला कोणती पदवी
१. पदवीचे प्रथम वर्ष पूर्ण झाल्यावर : प्रमाणपत्र
२. दोन वर्षे पूर्ण झाल्यावर : पदविका
३. तीन वर्षे पूर्ण झाल्यावर : पदवी
४. चार वर्षे पूर्ण झाल्यावर : पदवी ऑनर्स
‘‘अडचणींमुळे शिक्षण थांबविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधीबरोबरच भविष्यात पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची मुभा मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिटमुळे मिळणार आहे. पदवीच्या प्रत्येक वर्षाचा अभ्यासक्रम परिपूर्ण असून, विद्यार्थ्याला बाहेरच्या जगात रोजगार मिळविण्यासाठी सक्षम आहे.’’
- डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.