ग्रोइंग माइंड्स
प्रांजल गुंदेशा,संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस
लहानपणी सांगितलेल्या अनेक गोष्टी आजही आम्हाला लक्षात आहेत. मात्र, पाठ्यपुस्तकांतील उतारे लक्षात ठेवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. असं का होतं? असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. हजारो वर्षांपासून मनुष्य मनाचा विरंगुळा करण्यासाठी, त्याला कुठे तरी गुंतवण्यासाठी, तसेच विद्येचा आणि परंपरांचा प्रसार करण्यासाठी, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला अनुभवांचे हस्तांतरण करण्यासाठी गोष्ट सांगण्याचा पर्यायाचा वापर केला जात आहे. कथाकथन या प्रभावी अस्त्राचा वापर आपल्याकडे प्रदीर्घ काळापासून केला जात आहे.
गोष्टीचे सामर्थ्य
इतर कोणत्याही सामान्य मजकुरापेक्षा गोष्ट किंवा कथा ही अधिक चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्यासाठी मेंदूला नैसर्गिकरीत्या तयार करण्यात आले आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट आपल्याला अगदी सहजपणे लक्षात राहते. कथा ऐकताना लक्ष एकाग्र करणारे हार्मोन्स आपोआप वाढतात आणि संपूर्ण मेंदूत शब्दशः उलथापालथ होते. या बदलामुळे लक्षात ठेवणे सोपे होते. अधिक अचूकतेने आपला मेंदू गोष्टीतील तपशीलही लक्षात ठेवतो. गोष्टीत रंगवून सांगितले जाणारे कथानक आपण दृश्यस्वरूपात डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. पात्रांच्या भावना, विचार समजून घेण्याचा प्रयत्न करतो. या सर्व प्रक्रियेत आपल्या मेंदूच्या दोन्ही बाजू गुंतून राहतात.
मेंदूतील प्रक्रिया
कथांमध्ये इतके सामर्थ्य असते की, त्यामुळे मेंदूतील मज्जासंस्थेची क्रिया सामान्य क्रियेपेक्षा पाचपट अधिक प्रमाणात होऊ शकते. प्रोसेसिंग डेटाच्या तुलनेत, एक कथा मेंदूच्या ७ वेगवेगळ्या भागांना गुंतवून ठेवू शकते, हे आपल्याला माहीत असायला हवे. कारण आपण पाहतो, वास घेतो, ऐकतो किंवा चव घेतो अशा अनुभवांचीदेखील आपण कल्पना करत असतो. जेव्हा आपण एखादी कथा ऐकतो - विशेषत: ज्यामध्ये आपले लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसे भावनिक घटक असतात, त्या वेळी आपण भावनिक पातळीवर त्या कथेशी स्वतःला जोडून घेतो. आपले मेंदूचे नेटवर्क एखाद्या ख्रिसमसच्या झाडासारखे क्षणार्धात उजळते. भावनांमुळे अनुभव लक्षात ठेवण्याची आणि मिळालेल्या माहितीवरील प्रक्रिया सुधारण्याची आपली क्षमता वाढते. भावना मेंदूला एक प्रकारचा ‘सिग्नल’ देते की, हा अनुभव महत्त्वाचा आहे. हा सिग्नल मिळाल्यावर मेंदू त्यावर अधिक लक्ष केंद्रित करतो आणि भावनांनी भरलेली माहिती मेंदूच्या खोल भागात, उदा. सेरिबेलममध्ये संग्रहित करतो. आपण पात्रांशी किंवा कथेशी जितके अधिक संबंधित असू तितक्याच प्रमाणात तो संपूर्ण अनुभव आपल्याला आठवण्याची शक्यता जास्त असते.
परस्पर संबंध
कथा ऐकताना मेंदूचे काही भाग अधिक सक्रिय होतात जे ऐकणाऱ्याला त्याच्या स्वतःच्या कल्पना त्या कथेशी जोडण्याची, अनुभवांमध्ये रूपांतरित करण्याची अनुमती देतात. त्यामुळे ती गोष्ट हा त्या व्यक्तीचा आपला अनुभव होऊ लागतो. ‘न्यूरल कपलिंग’मुळे हे साध्य होते. यामुळे आपण जर बारकाईने निरीक्षण केले तर, आपल्याला लक्षात येईल की, गोष्टीतल्या पात्रांना राग येतो तेव्हा आपल्यालाही राग येतो. ते हसतात तेव्हा आपणही हसतो आणि जेव्हा त्यांना काही त्रास होतो, तेव्हा आपल्यालाही वेदना होतात, त्रास होतो. गोष्टीत घडणाऱ्या कथानकाचे पुढे काय होईल? याची काळजी आपल्याला वाटू लागते.
कथातंत्र वापरण्याच्या संधी
शैक्षणिक शिक्षण, टीम बिल्डिंग, प्रभावी संवाद, भावनिक कौशल्ये, समस्या सोडवणे, निर्णायक परिस्थिती यांसह विविध क्षेत्रांमध्ये आणि आपल्या दैनंदिन जीवनातही गोष्ट सांगण्याच्या तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर करता येतो.
थेट उपयोग
कथांचे सामर्थ्य केवळ आपली कल्पनाशक्ती वाढवण्यापुते मर्यादित नाही, तर आपल्या दृष्टिकोनाला बदलण्याची, त्याला विशिष्ट आकार देण्याची, आपल्या भावनांवर प्रभाव टाकण्याची, चांगले बदल घडवून आणून आपल्याला प्रेरित करण्याची क्षमतामध्येदेखील आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला स्वतःची एखादी गोष्ट लोकांना पटवून द्यायची असले, प्रेरित करायचे असेल किंवा एखादी महत्त्वपूर्ण माहिती शेअर करायची असेल, तेव्हा तुमचे म्हणणे मांडताना गोष्टीचा आधार घ्या. तुमचं म्हणणं लोकांना पटेल आणि दीर्घ काळ ते लक्षातही राहील. तुम्ही मांडत असलेली तथ्ये आणि आकडेवारी यांना गोष्टीची जोड दिल्यास त्याचा खूप फायदा होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. गोष्टीप्रमाणेच मेंदूच्या विकासाला गती देणाऱ्या इतर माध्यमांची माहिती घेण्यासाठी याच विषयावरील पूर्वीचे आणि आगामी लेख आवर्जून वाचा. अधिक माहितीसाठी इन्स्टाग्रामवर Pranjal_gundesha या पेजला आणि यू-ट्यूबवर TheIntelligencePlus या चॅनेलला माहिती द्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.