‘नेट’ची तयारी कशी कराल?

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यू.जी.सी.) २७ मार्च २०२४ रोजी एक सूचना जारी केली असून, त्यात असे नमूद केले आहे की, पीएचडी करण्यासाठी नेट परीक्षा अनिवार्य आहे.
Net Exam
Net Examsakal
Updated on

- डॉ. सय्यद इलियास, सहयोगी प्राध्यापक

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यू.जी.सी.) २७ मार्च २०२४ रोजी एक सूचना जारी केली असून, त्यात असे नमूद केले आहे की, पीएचडी करण्यासाठी नेट परीक्षा अनिवार्य आहे. या सूचनेनुसार जून २०२४ पासून नेट पास होणाऱ्यांसाठी तीन वेगवेगळ्या श्रेणी तयार केल्या गेल्या आहेत. पहिल्या श्रेणीत नेट उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पी.एच.डी. प्रवेशास पात्र होतील, तसेच त्यांना जेआरएफ मिळेल.

त्याबरोबरच सहायक प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यासही ते पात्र ठरतील. दुसऱ्या विभागात पीएचडी प्रवेशासाठी पात्र होतील, परंतु जेआरएफ मिळणार नाही व सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र असतील. तिसऱ्या विभागात फक्त पीएचडी प्रवेशासाठी पात्र असतील, तसेच त्यांना जेआरएफ मिळणार नाही व सहायक प्राध्यापक पदासाठीही पात्र नसतील. त्यामुळेच आपण आता यूजीसी सीएसआयआर नेट परीक्षेची तयारी कशी असावी? याचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.

यूजीसी सीएसआयआर नेट परीक्षेला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ज्युनिअर रिसर्च फेलो किंवा सहायक प्राध्यापक होण्याची इच्छा असलेले उमेदवार या परीक्षेला बसू शकतात. ही परीक्षा पाच विषयांसाठी घेतली जाते - रसायनशास्त्र, पृथ्वीविज्ञान, भौतिक विज्ञान, जीवनविज्ञान आणि गणितविज्ञान. प्रश्नपत्रिका प्रत्येक विषयासाठी तीन भागांमध्ये विभागली आहे- भाग A, भाग B आणि भाग C. भाग A हा सामान्य योग्यतेचा असतो व तो सर्वांसाठी समान असतो. भाग B आणि C मध्ये उमेदवारांच्या संबंधित विषयाचे प्रश्न असतात.

महत्त्वाच्या टीप्स

परीक्षा पॅटर्न आणि मार्किंग स्कीम

अभ्यासक्रमाची तपशीलवार माहिती घेतल्यानंतर, उमेदवाराने परीक्षा पॅटर्न आणि मार्किंग स्कीम समजून घेतली पाहिजे. विविध विषयांसाठी असलेल्या एकूण प्रश्नांची संख्या, जास्तीत जास्त प्रश्नांची संख्या आणि विभागीय गुण वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या विषयांसाठी निगेटिव्ह मार्किंगही असते. हे सर्व नीट समजून घ्या.

अभ्यासाची सर्वोत्तम साधने

पुस्तके उमेदवारांना त्यांच्या विषयांचे मूलभूत ज्ञान देतात. योग्य पुस्तके आणि नोट्सशिवाय महत्त्वाच्या संकल्पना शिकता येत नाहीत व स्पष्टही होत नाहीत. त्यामुळे पुस्तकांची निवड काळजीपूर्वक करा. पुस्तके वाचताना स्वतःसाठी नोट्स काढा.

मागील प्रश्नपत्रिकांचा सराव

मागील वर्षांच्या प्रश्‍नपत्रिका हे परीक्षेच्या तयारीसाठी सर्वांत महत्त्वाचे साहित्य मानले जाते. त्यामुळे उमेदवारांना अभ्यासक्रम आणि परीक्षापद्धती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होते. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बहुपर्यायी प्रश्नांच्या सरावासाठी वापरल्या जाऊ शकतात.

ऑनलाइन मॉक टेस्ट

पुस्तके आणि इतर अभ्यास साधनांमधील संकल्पनांचे सखोल वाचन केल्यानंतर उमेदवारांनी मूळ परीक्षेच्या टाइमरसह प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव केला पाहिजे. यामुळे त्यांना स्वतःचे मूल्यमापन करणे सोपे होते.

कट ऑफ जाणून घ्या

नेटसाठी कट ऑफ जाणून घेणे आवश्यक मानले जाते. उमेदवारांनी त्यांच्या संबंधित श्रेणीतील कट ऑफ, तसेच सर्वाधिक कट ऑफ असलेली श्रेणी जरूर पाहावी. निवडीची जास्तीत जास्त शक्यता तसेच, आपल्या पसंतीची संस्था मिळावी यासाठी कट ऑफचा अंदाज घेणे आवश्‍यक ठरते.

अभ्यासाची योजना

निर्धारित वेळेत अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी योग्य योजना आखणे आवश्यक आहे. सीएसआयआर नेटच्या तयारीसाठी योग्य वेळापत्रकाशिवाय अभ्यास करणे शक्य होणार नाही. तयारी दरम्यान सातत्य राखणेही महत्वाचे आहे; अन्यथा, उमेदवार महत्त्वाच्या संकल्पना चुकू शकतात.

‘लाइफ सायन्स’ची तयारी

पेशींची रचना, अनुवांशिकता आणि उत्क्रांती यांसह जीवशास्त्राची मूलभूत तत्त्वे समजून घ्या. संकल्पना समजून घेण्यासाठी आकृती आणि विविध मार्गदर्शकांची मदत घ्या. उमेदवाराने अभ्यासाची आवृत्ती करण्यासाठी, नवीन शिकण्यासाठी आणि जुने पेपर सोडवण्यासाठी वेळ दिला पाहिजे. लाइफ सायन्ससाठी दिवसातून किमान ९ ते १० तासांचा वेळ देऊन अभ्यास करावा लागेल.

तयारी कशी सुरू करावी?

सीएसआयआर नेट परीक्षेची तयारी करणे सोपे काम नाही. खालील काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा -

  • अभ्यासाचा आराखडा : एकदा तुम्ही अभ्यासक्रमाशी परिचित झाल्यावर त्या पुढील पायरी म्हणजे सर्वसमावेशक योजना तयार करा. त्यामध्ये तुम्ही प्रत्येक विषयासाठी किती वेळ द्याल आणि अभ्यासपद्धतीचा उल्लेख करा.

  • विश्रांती घ्या : अभ्यास करताना तुमच्या मेंदूला विश्रांती द्या. त्यासाठी ठराविक कालावधीनंतर ‘ब्रेक’ घ्या.

  • चालू घडामोडी : चालू घडामोडींबाबत अपडेट राहा. या परीक्षेत तुमच्या चालू घडामोडींच्या ज्ञानाची चाचणी घेतली जाते.

  • ताण घेऊ नका : कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नका. ताण येऊ नये यासाठी अभ्यासातून वेळ काढून तुमचे छंद जोपासा. त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल.

(लेखक पूना कॉलेज ऑफ आर्ट्‌स, सायन्स अँड कॉमर्स, कॅम्पच्या वनस्पतिशास्त्र विभागात आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()