हटके : व्यवसायाची निवड करताना

कोणत्या व्यवसायाची निवड करायची आणि ते करताना काय काळजी घ्यायची याचा विचार करा. व्यवसाय करण्याची नुसती आवड काय कामाची, त्याविषयीचा अभ्यास तितकाच महत्त्वाचा.
हटके : व्यवसायाची निवड करताना
Updated on

- डॉ. उमेश दे. प्रधान

तर मग काय व्यवसाय करायचं ठरवलंय. अभिनंदन. असा नुसता विचार करून भागणार नाही, अजून अनेक टप्पे गाठायचे आहेत. व्यवसायाचा मार्ग स्वीकारताना अनेक आव्हानांना तोंड तर द्यावेच लागणार, हे लक्षात घ्या म्हणजे झालं. व्यवसाय करण्याविषयी काही आपली कौटुंबिक पार्श्वभूमी आहे का? का नुसतं वाटतंय व्यवसाय करावा असं, मग याचा जरा विचार करा. असू दे, ठरवलंय ना, नक्की केलंय ना. मग अभ्यासाला लागा.

कोणत्या व्यवसायाची निवड करायची आणि ते करताना काय काळजी घ्यायची याचा विचार करा. व्यवसाय करण्याची नुसती आवड काय कामाची, त्याविषयीचा अभ्यास तितकाच महत्त्वाचा. आपल्या अवतीभोवती पाहा, कोणत्या प्रकारच्या व्यवसायाची आवश्यकता वाटते आहे? सगळेच करत आहेत, त्यापेक्षा जरा हटके. त्यासाठी लोकांच्या गरजा, अपेक्षा काय आहेत? कोणत्या प्रकारच्या सेवावस्तूंची निकड त्यांना भासते आहे?

कोणत्या गरजेसाठी त्यांना दूरवर जावे लागते. ज्यासाठी लोकांना फिरत राहावं लागते, ते त्यांना त्यांच्या दाराशी मिळाले तर? लोकांची गरज शोधा. आपल्या परिसरात या दृष्टीने फेरफटका मारून पाहा. बाजाराचे सर्वेक्षण करा. ते तुम्हाला व्यवसायाची दिशा दाखवेल. जरा हटके असा व्यवसाय काही सुचतो आहे का? अनेक वेळा संकुचित विचार करण्यापेक्षा विशाल दृष्टिकोन ठेवणे फायद्याचे ठरू शकते.

व्यवसाय निवडीचे टप्पे काळजीपूर्वक पार केलेत तर यश नक्कीच मिळेल. अनेक व्यवसायामध्ये छोटे व्यवसाय लपलेले असतात. मूळ व्यवसाय हा मिठाई पदार्थांचा असला तरी त्यांना पुठ्याचे बॉक्सेस, पर्यावरणपूरक अशा पिशव्या, विविध प्रकारचे स्टिकर्स लागतात, कच्चा माल पुरवणारी, विविध सेवा पुरवणारी संसाधने लागतात, गिफ्ट पॅक करून देणारे असे कुशल व्यक्तींची गरज असते.

सध्या सगळ्यांना घरपोच सेवा अपेक्षित असते. त्याचाच विचार करायला काय हरकत आहे. इतर प्रस्थापित व्यवसाय बाजूला सारून आपला विचार करायचा असेल तर परिसराचा, लोकांच्या मनोप्रवृत्तीचा अभ्यास करणे तितकेच गरजेचे आहे.

वस्तू निर्मितीच्या व्यवसायात पडायचे असल्यास वेगळ्या अभ्यासाची गरज भासेल. त्या वस्तूच्या निर्मितीबाबत स्वतःची कुशलता महत्त्वाची. केवळ कामगार ठेऊन भागणार नाही ते तुम्हाला स्वतःला जमायला हवे. अनेक बाबींचा अभ्यास हा तुम्हाला व्यवसायाची बैठक तयार करून देण्यास उपयुक्त ठरेल हे नक्की.

व्यवसायाकरता आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन पुरवणाऱ्या अनेक संस्था आहेत त्यांना भेटी देऊन, छोटे मोठे कोर्सेस करून तुमचे मार्गक्रमण सुकर होईल.

कोणत्याही व्यवसायाची सुरुवात ही छोट्या पावलानेच होत असते. एकदम मोठी उडी मारण्यापेक्षा सुरुवात थोडी हलकेच केलेली बरी नाही का? व्यवसायाच्या निवडीत स्वतःच्या आवडीबरोबरच तुमचे कौशल्य, तयारी आणि त्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळही तितकेच महत्त्वाचे. जमिनीवर राहून विचार करा तुमचे क्षेत्र नक्कीच निश्चित करू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.