पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला, की राज्यातील उमेदवारांची संख्या किती, मराठी टक्का घसरला की वाढला, राज्यातील उमेदवारांनी कितव्या क्रमांकावर स्थान मिळविले, अशा असंख्य चर्चांना उधाण येते. परंतु, राज्यात परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांपैकी १० ते १२ टक्केच विद्यार्थी यशस्वी होतात. यामागे नेमके कारण काय असेल, आपण कोणत्या पातळीवर कमी पडतो, याबाबत आजी-माजी सनदी अधिकारी, मार्गदर्शक यांच्याशी संवाद साधला.
माजी सनदी अधिकारी, चाणक्य मंडलचे संस्थापक आणि संचालक अविनाश धर्माधिकारी म्हणाले, ‘यापूर्वी युपीएससीच्या परीक्षेत कायमच उत्तर प्रदेश आणि बिहारमधील उमेदवार सर्वाधिक यशस्वी ठरायचे. खरंतर गेल्या काही वर्षांपासून हे चित्र बदलायला सुरुवात झाली होती. उत्तर प्रदेश आणि बिहार खालोखाल महाराष्ट्रातील उमेदवारांची संख्या सर्वाधिक असायची.
परंतु, युपीएससीच्या या निकालात राज्यातील उमेदवारांची संख्या गेल्या दहा-बारा वर्षांच्या तुलनेने दुर्दैवाने कमी आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये हुशार मुलांना उपलब्ध अन्य संधी खूप कमी आहेत. त्यामुळे ही मुले युपीएससीकडे वळतात आणि यशस्वी होतात. महाराष्ट्रातील उमेदवारांची संख्या वाढविण्यासाठी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीत राष्ट्रीय आणि जागतिक दर्जा गाठायला हवा. महाविद्यालयीन अभ्यासक्रमात सातत्याने काळानुरूप बदल होणे अपेक्षित आहे.’
द युनिक अकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव म्हणाले, ‘राज्यातील साधारणत: आठ ते दहा टक्के उमेदवार हे युपीएससीत यशस्वी ठरतात, यंदाही हे प्रमाण कायम आहे. १९९५-२००६मध्ये ही परीक्षा देणाऱ्या राज्यातील उमेदवारांची संख्या तुलनेने खूप कमी होती. त्यानंतर हे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले. अशा परीक्षेचा अभ्यास करताना मूलभूत शिक्षणाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात त्यादृष्टीने बदल होणे अपेक्षित आहे. सध्या बालभारती राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पाठ्यपुस्तक निर्मिती करत असल्याची बाब स्वागतार्ह आहे.’
राजमुद्रा अकॅडमीचे संचालक मनोहर भोळे म्हणाले, ‘उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील शालेय अभ्यासक्रम हा युपीएससीच्या मूलभूत अभ्यासाशी साधर्म्य साधणारा आहे. त्याशिवाय तेथील उमेदवार हे अधिक प्रमाणात हिंदी भाषेतून परीक्षा देतात. शालेय शिक्षणातूनच मूलभूत अभ्यास पक्का झाल्याचा अधिकचा फायदा या उमेदवारांना मिळतो. त्याशिवाय उत्तर प्रदेश, बिहारमधील विद्यार्थी खूप आधीपासूनच आपले ध्येय ठरवून अभ्यासाला लागतात. आपल्याकडील उमेदवारांनीही युपीएससीचा अभ्यास करण्याची तयारीला खूप आधीपासून करायला हवी.’
राज्यातील उमेदवारांचे प्रमाण वाढण्यासाठी...
महाविद्यालयीन अभ्यासक्रम हा जागतिक दर्जाचा हवा
दर्जेदार अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकाची निर्मिती गरजेची
अभ्यासक्रमात सातत्याने काळानुरूप बदल होणे अपेक्षित
शालेय अभ्यासक्रमात देश आणि जागतिक आवाका सामावलेला
हवा
गुणवत्ता असणारे शिक्षक, प्राध्यापक आणि मार्गदर्शक असावेत
१५ ते १६ वयोगटातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन आवश्यक
मुलांच्या क्षमता ओळखून पालकांनी करिअरची दिशा ठरवावी
‘युपीएससीची परीक्षा हे विद्यार्थ्यांची गुणवत्ता मोजण्याचे एकमेव परिणाम नाही. विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले करिअर घडवू शकतात. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये मात्र स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीला ‘फॅक्टरी’चे स्वरूप आले आहे. अन्य पर्याय न पडताळता अनेक विद्यार्थी यामध्ये वर्षानुवर्षे कालापव्यय करीत असल्याचे दिसते. त्यामुळे करिअच्या या पर्यायाचा अति बाऊ न करता विद्यार्थी वेगवेगळ्या कोणत्या क्षेत्रात जात आहेत, तिथे कशी कामगिरी करत आहेत, याचा विचार करून निष्कर्ष काढणे जास्त योग्य होईल.’
- सूरज मांढरे, सनदी अधिकारी (राज्य शिक्षण आयुक्त)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.