एन. डी. ए. म्हणजेच नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी. प्रशिक्षण संस्थेच्या नावानेच परीक्षा आहे. ती वर्षातून दोन वेळा होते.
- प्रा. विजय नवले
एन. डी. ए. म्हणजेच नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी. प्रशिक्षण संस्थेच्या नावानेच परीक्षा आहे. ती वर्षातून दोन वेळा होते.
जाहिरात आणि परीक्षा
एन.डी.ए.-१ परीक्षेची जाहिरात साधारणपणे डिसेंबर महिन्यात तर परीक्षा एप्रिल महिन्यात होते.
एन.डी.ए.-२ परीक्षेची जाहिरात साधारणपणे मे महिन्यात तर परीक्षा सप्टेंबर महिन्यात होते.
शुल्क
जनरल तसेच ओ बी सी प्रवर्गांसाठी १०० रुपये शुल्क आहे. इतर आरक्षित वर्गांसाठी परीक्षा निःशुल्क आहे.
पात्रता
वयोमर्यादा १६.५ ते १९.५ वर्षे अशी आहे. या वयोगटातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी परीक्षेसाठी पात्र असतात. शैक्षणिक पात्रता बारावी आहे.
लेखी परीक्षा, एस.एस.बी. आणि शारीरिक वैद्यकीय चाचणी हे या परीक्षेचे तीन टप्पे आहेत.
लेखी परीक्षा
ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते.
परीक्षेचे माध्यम इंग्लिश किंवा हिंदी आहे.
गणित आणि जनरल ॲबिलिटी टेस्ट असे दोन पेपर असतात. प्रत्येक पेपरसाठी अडीच तासांचा अवधी असतो.
गणितासाठी १२० प्रश्न आणि ३०० गुण असतात. गणित विषयातील प्रत्येक बरोबर उत्तरेस २. ५ गुण आहेत. गणितामध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरामुळे ०. ८३ मार्कांची वजावट होऊ शकते.
GAT साठी १५० प्रश्न आणि ६०० गुण असतात. यामध्ये २ सेक्शन्स असतात. इंग्लिश आणि सामान्य ज्ञान. इंग्लिशसाठी २०० गुण तर सामान्य ज्ञानासाठी ४०० गुण असतात. सामान्य ज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, जनरल सायन्स, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी असे उपविभाग असतात.
लेखी परीक्षेत एकूण २७० प्रश्न आणि ९०० गुण असतात. ती बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असते.
सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड
लेखी परीक्षेनंतर सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एस.एस.बी.) हा महत्त्वाचा टप्पा असतो. बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्वाची ही परीक्षा असते. यात उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाच्या सुमारे १५ गुणांची चाचपणी होते. ९०० गुणांची ही परीक्षा पार पडण्यासाठी ५ दिवसांचा कालावधी असतो.
यामध्ये २ टप्पे असतात. पहिला भाग असतो स्क्रीनिंग टेस्ट. त्यात ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग टेस्ट व पिक्चर पेर्सेप्शन अँड डिस्कशन टेस्ट अशा दोन चाचण्या असतात.
पहिल्याच दिवशीच्या या चाळणी थोडेच विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतात. त्या भागात सायकॉलॉजिकल टेस्ट्स असतात. तसेच वैयक्तिक सत्राच्या काही चाचण्या असतात.
यानंतर मुलाखत होते. सर्व मुद्द्यांचा अत्यंत काळजीपूर्वक विचार करून अंतिम निर्णय घेतला जातो.
यातून यशस्वी उमेदवारांची वैद्यकीय तपासणी हा शेवटचा टप्पा मानला जातो.
परीक्षेची तयारी
अनेकजण अकरावीपासून परीक्षेची तयारी करतात. परंतु तत्पूर्वी व्यक्तिमत्त्व विकास, अवांतर वाचन, हिंदी इंग्रजी भाषांवर प्रभुत्व, वक्तृत्व कौशल्य, टीम वर्क, प्रसंगांचे विश्लेषण, कल्पना विस्तार, लेखन, बौद्धिक तयारी, खेळ, व्यायाम यासाठी लक्ष देणे आवश्यक आहे.
प्रशिक्षण
परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षांचे निवासी पूर्ण वेळ मिलिटरी ट्रेनिंग खडकवासला येथील अकादमीत मिळते. हे पदवी शिक्षण देखील असते. अशा प्रशिक्षणानंतर एक वर्षाचे लष्कराचे पुढील प्रशिक्षण आय.एम.ए. डेहराडून येथे, नौदलाचे एझीमाला येथे तर वायूदलाचे हैदराबाद येथे पार पडते. प्रशिक्षण झाल्यानंतर लष्करामध्ये लेफ्टनंट, नौदलात सब लेफ्टनंट, वायूदलात फ्लायिंग ऑफिसर अशी रँक मिळते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.