विज्ञानात संशोधन करायचंय?

आयसर म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. कमी वयामध्ये कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांना संशोधन कार्यक्षेत्रात प्रवेश मिळावा, वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण देता यावे हे आयसर या संस्थेचे प्रयोजन आहे.
Intelligence
Intelligencesakal
Updated on

- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ

आयसर म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. कमी वयामध्ये कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांना संशोधन कार्यक्षेत्रात प्रवेश मिळावा, वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण देता यावे हे आयसर या संस्थेचे प्रयोजन आहे. आयसर येथील बीएस-एमएस हा कोर्स ड्युअल डिग्री स्वरूपाचा आहे. पदवी आणि पदव्युत्तर पदवी (मास्टर डिग्री) यांना एकत्रित आणण्याचा हा प्रयत्न आहे.

या संस्थेमध्ये शिक्षण घेणे आणि संशोधन करण्याचे बाळकडू मिळणे या दोन्ही बाबी एकत्रितपणे घडतील याची काळजी घेतलेली असते. हा राष्ट्रीय स्तरावरील सरकारी शैक्षणिक उपक्रम आहे. संपूर्ण देशात पुणे, मोहाली, कोलकाता, भोपाळ, तिरुपती, त्रिवेंद्रम, बेहरामपूर अशा एकूण सात ठिकाणी आयसर या संस्थेची संशोधन विषयाला समर्पित महाविद्यालये आहेत.

कालावधी व पात्रता

बीएस-एमएस म्हणजेच बॅचलर ऑफ सायन्स आणि मास्टर ऑफ सायन्स. बारावी सायन्सनंतर हा पाच वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स आहे. बारावी सायन्सचे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असतात. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, बायोलॉजी यापैकी किमान तीन विषय सायन्स शाखेतून शिकताना घेतलेले असावेत. एससी/एसटी/दिव्यांग यांच्यासाठी बारावीतील एकूण टक्केवारी ५५% असावी, तर इतर प्रवर्गांसाठी ६०% असावी.

मात्र, यासाठी प्रवेशपात्रता समजावून घ्यावी लागेल. पूर्वी तीन मार्गांनी या प्रवेशासाठी पात्र होता येत होते. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेच्या (केव्हीपीवाय) माध्यमातून, जेईई ॲडव्हान्स्डच्या गुणांवर आणि स्टेट सेंट्रल बोर्डच्या मार्गाने. आता मात्र केवळ स्टेट सेंट्रल बोर्डच्या माध्यमातून असलेल्या आयसर ॲप्टिट्यूड टेस्टमधून विद्यार्थ्यांची निवड या कोर्ससाठी होते.

प्रवेशपरीक्षा

आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट (आयएटी) ही कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, बायोलॉजी या चार विषयांसाठी प्रत्येकी १५ प्रश्न असे एकूण ६० प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला चार गुण असतात. त्यामुळे ही एकूण २४० गुणांची परीक्षा आहे.

प्रत्येक चुकीच्या उत्तरामुळे एक गुण वजा होतो. परीक्षेचा कालावधी तीन तास आहे. ही परीक्षा वर्षातून एकदा होते. एप्रिल महिन्यात या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन उपलब्ध होतात. साधारणपणे जून महिन्यात ही परीक्षा असते. जून महिन्याच्या शेवटी निकाल लागतो, लगेचच प्रवेशप्रक्रिया सुरू होते आणि जुलै महिनाअखेरपर्यंत प्रवेशप्रक्रिया पार पडते.

कोर्सचे स्वरूप

पाच वर्षांच्या अभ्यासक्रमातील पहिले आठ सेमिस्टर लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स आणि प्रोजेक्ट्सचे असतात. शेवटचे दोन सेमिस्टर मास्टरचे समजले जातात. त्यामध्ये संशोधनाचे काम असते. आता थोडा बदल झालेला आहे. पहिल्या तीन सेमिस्टरमध्ये सर्वच विषय सर्वांनी शिकायचे आहेत. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, बायोलॉजी, अर्थसायन्स आणि ह्युमॅनिटीचे विषय अभ्यासावे लागतात.

त्यानंतर चौथ्या सेमिस्टरपासून दोन विषय प्री-मेजर स्वरूपाचे असतात. म्हणजे पुढे जाऊन त्यातील एक विषय मेजर म्हणजे मुख्य विषय बनणार असतो. त्या दृष्टीने त्यांचे पुढील शिक्षण चालू राहते. त्यांना बीएस-एमएस डिग्री या मेजर विषयाच्या नावाने मिळते. काही विद्यार्थी ज्यांना अशा पद्धतीने मेजर विषय घ्यायचा नाही, ते विद्यार्थी सर्वच विषय अभ्यासात कोर्स पूर्ण करतात. त्यांना बीएस- एमएस (सायन्स) अशी पदवी मिळते. शेवटचे दोन सेमिस्टर संशोधनासाठी असतात.

पुढील संधी

या पदवीधरांना बार्क, डीआरडीओ, इस्रो आदी संस्थांमध्ये संशोधन विभागांमध्ये संधी मिळू शकते. केंद्र आणि राज्य शासनाचे विविध उपक्रम/विभाग/कंपन्या/ पब्लिक कॉर्पोरेशन्स यांमध्ये संबंधित परीक्षा देऊन निवड होते. काही मंडळी पीएचडीचे शिक्षण पूर्ण करतात. आयसरमधून ही पदवी मिळाल्यांनतर पीएचडीसाठी फेलोशिप आणि स्टायपेंड मिळणे सोपे असते. डॉक्टरेटनंतर शास्त्रज्ञ पदावर काम करण्यासाठीचा राजमार्ग खुला होतो. पुढील संधींसाठी देश-विदेशांमधील दर्जेदार संशोधन संस्था हात पुढे करू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.