नागपूर : ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (All India Council for Technical Education ) या संस्थेनं काही दिवसांपूर्वी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षासाठी काही नियम जाहीर केले आहेत. याप्रमाणे इंजिनिअर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली. आता गणित (Mathematics) आणि भौतिकशास्त्र (Physics) या महत्त्वाच्या विषयांशिवाय सुद्धा इंजिनिअरिंगला प्रवेश घेता येणार आहे.
AICTE चा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच असल्याचं बोललं जातंय. मात्र गणित आणि भौतिकशास्त्राशिवाय इंजिनीअरिंग करता येऊ शकतं का? आणि करता येत असेल तर इतर शाखांमधून आलेले विद्यार्थी इंजिनिअरिंग यशस्वीरीत्या करू शकतील का? हे दोन मोठे प्रश्न सध्या काही तज्ज्ञांकडून उपस्थित केले जात आहेत.
AICTE नं सांगितलेल्या एकूण १४ विषयांपैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुण मिळणं गरजेचं असल्याचं नमूद केलं आहे. इतकंच नाही तर आता अन्य विषयांची पार्श्वभूमी असलेले विद्यार्थीदेखील इंजिनिअरिंगचा अभ्यास करू शकतात, असाही निर्णय या संस्थेने घेतला आहे. गणित आणि भौतिकशास्त्राशिवाय एखाद्या विद्यार्थ्यानं इतर कुठल्याही तीन विषयांत ४५ टक्के गुण मिळवले तर तो विद्यार्थी इंजिनिअरिंग करण्यासाठी पात्र ठरणार आहे.
ज्या विज्ञानावर संपूर्ण इंजिनिअरिंग अवलंबून आहे त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे भौतिकशास्त्र. आणि गणितावर इंजिनिअरिंगचा मोठा अभ्यासक्रम आहे. हे दोन विषयच विद्यार्थ्यांना समजले नाही तर इंजिनिअरिंगचा संपूर्ण अभ्यासक्रम त्यांना कसा पेलवणार? तसंच इंजिनिअरिंगचं गणित दहावी आणि बारावीच्या गणितापेक्षा अनेक पटीनं वेगळं आणि सुधारित आहे. त्यामुळे जर विद्यार्थ्यांना समजलं नाही तर ते पास होऊ शकणार नाहीत, असं मत गणित विषयाचे तज्ज्ञ आणि इंजिनिअरिंगचे माजी प्राध्यापक के. सी. देशमुख यांचं म्हणणं आहे.
इंजिनिअरिंगमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित य विषयांशिवाय प्रवेश घेणारे इतर शाखांमधून आलेले विद्यार्थी पहिल्या वर्षाला असणाऱ्या विषयांना समजवून घेऊ शकणार नाही. भौतिकशास्त्र हा विषय जरी पहिल्या वर्षाला असला तरी गणिताशिवाय संपूर्ण इंजिनिअरिंगला स्पर्शही करता येऊ शकत नाही. मेकॅनिकल इंजिनिअरिंग असो किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग प्रत्येक ब्रांचला गणित विषय असतोच. त्यामुळे इतर शाखांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत हा विषय अतिशय कठीण जाऊ शकतो, असंही मत प्राध्यापक देशमुख यांनी व्यक्त केलंय.
ब्रांचनुसार ठरतो गणिताचा अभ्यासक्रम
इंजिनिअरिंगमध्ये प्रत्येक ब्रांचनुसार गणिताचा अभ्यासक्रम ठरतो. उदाहरणार्थ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या ब्रांचमध्ये Probability, Statistics अशा प्रकारचा काही कॅल्क्युलेशनवर आधारित असलेला अभ्यासक्रम असतो. तर इतर इंजिनिअरिंगला त्या ब्रांचनुसार बदल करण्यात येतात. त्यामुळे इतर शाखांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना गणिताच्या अभ्यासक्रमातील हे बदल झेपतील का, हा प्रश्न असल्याचे प्राध्यापक देशमुख म्हणाले.
विद्यार्थ्यांवर येणार मानसिक ताण
आपल्या मुलानं किंवा मुलीनं इंजिनिअर व्हावं, असं स्वप्न आजकालच्या काळात प्रत्येक आई-वडिलांचं असतं. आजपर्यंत काही विशिष्ट शैक्षणिक पात्रता असलेले विद्यार्थीच इंजिनिअरिंगला प्रवेश घेत असत. इतर सर्व विद्यार्थी अन्य शाखांमध्ये शिक्षण पूर्ण करत असत. मात्र, आता सर्व शाखांमधील विद्यार्थी इंजिनिअरिंगकडे वळू लागतील तर स्पर्धा वाढेलच. जर हे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मार्क्स मिळवू शकले नाही किंवा गणित आणि भौतिकशास्त्र समजवून घेण्यात अपयशी ठरले तर अशा विद्यार्थ्यांना ताण येण्यास वेळ लागणार नाही.
लागू शकतात अनेक वर्षे
ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय समजलेच नसतील अशा विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. असं प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत घडेल असं नाही. मात्र, अशी शक्यता नाकारता येत नसल्याचे प्राध्यापक के. सी. देशमुख यांनी सांगितले.
कॉलेजचे शुल्क असू शकते मोठी समस्या
अनेक पालक मुलांच्या शिक्षण शुल्कासाठी वाट्टेल ते काम करून मेहनत करून पैसे जमा करत असतात. त्यांची स्वप्नसुद्धा मुलांप्रती मोठी असतात. मात्र, आपला इतर शाखेत शिकत असलेला मुलगा किंवा मुलगी इंजिनिअरिंगसाठी खरंच पात्र आहे का? याकडे पालकांनाही लक्ष दिलं पाहिजे. इंजिनिअरिंग कॉलेजचे शुल्क प्रत्येकाला परवडेलच असं नाही.
इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश वाढवण्यासाठी घाट
गेल्या काही वर्षांपासून इंजिनिअरिंगकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत आहे. दरवर्षी इंजिनिअरिंगच्या अनेक जागा रिक्त आहेत. याचा थेट परिणाम खासगी कॉलेजेसना बसतोय. म्हणूनच AICTE चा हा निर्णय विचार करून घेतलेला नसून प्रवेश वाढवण्यासाठी घेतलेला निर्णय आहे, असं स्पष्ट मत प्राध्यापक के. सी. देशमुख यांनी व्यक्त केलंय.
प्राध्यापकांनी करावी मदत
जगातील प्रत्येक विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग करण्याची संधी AICTE नं उपलब्ध करून दिली. याबद्दल सर्वच स्तरातून सरकारचं कौतुक होत आहे. मात्र ज्यांना गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय कठीण वाटतात अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेजनं आणि प्राध्यापकांनी पावलं उचलणं महत्त्वाचं आहे. अशा विद्यार्थ्यांचे एक्स्ट्रा क्लासेस घेऊन किंवा त्यांना मोकळ्या वेळेत समजवून सांगून प्राध्यापकांनी त्यांच्यात आत्मविश्वास जागा करावा. तसंच त्यांच्या अभ्यासात त्यांना मदत करावी, असं मत इंजिनिअरिंगच्या प्राध्यापिका श्रद्धा देवपुजारी यांनी व्यक्त केलंय.
कॉलेजनं घ्यायला हवी प्रवेश परीक्षा
इतर शाखांमधील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगमधील प्रवेश सोपा व्हावा यासाठी प्रत्येक कॉलेजनं प्रवेश परीक्षा घ्यायला हवी. यामुळे विद्यार्थ्यांना आधीच गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांचा अभ्यास करावा लागेल आणि प्रवेश परीक्षा पास करता येईल. असं केल्यास विद्यार्थ्यांना कॉलेजमधील पुढील शिक्षणात अडचणी निर्माण होणार नाहीत, असंही प्राध्यापिका श्रद्धा देवपुजारी यांनी म्हटलंय.
एकूणच काय तर AICTE नं घेतलेला निर्णय प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीनं जरी सोपा आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा वाटत असला तरी अशा विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अडचणींचा ठरू शकतो. त्यामुळे विद्यापीठ आणि कॉलेज यांनी विद्यार्थ्यांची सर्वतोपरी मदत केली तरच असे विद्यार्थी इंजिनिअरिंगसाठी स्वतःला तयार करू शकतील, असं तज्ज्ञ सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.