- नवनाथ शिंदे
शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांची मालिका निर्माण करणारे, उत्तम वक्तृत्वशैली, निवेदनाची आवड, हस्ताक्षराची देणगी, सुमधुर आवाज, उत्तम शिस्त, कार्यक्रमातला काटेकोरपणा अशा सर्व अंगांनी काम करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, माढा तालुक्यातील सोलंकरवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेतील सृजनशील शिक्षक रामकृष्ण केदार गुरुजी.
स्पर्धा परीक्षांमध्ये हातखंडा असलेल्या केदार यांचे अद्यापपर्यंत विविध शाळांमधील नवोदयमध्ये चार विद्यार्थी तर शिष्यवृत्तीमध्ये १५ विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले आहेत. विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरापर्यंत सातत्याने यश मिळवले. अरण व मोडनिंबसारख्या सर्वात जास्त पटाच्या शाळा आयएसओ करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.
मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे मुक्त शिक्षण घेता यावे म्हणून यांनी मोडनिंबच्या शाळेत ‘मुक्तांगण’ प्रकल्प राबवला. शिक्षक म्हणून नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू असतानाच त्यांच्याकडे मोडनिंब केंद्राच्या प्रमुखपदाची जबाबदारी आली. या कालावधीत त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. शाळांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ‘महसूल गावसभा’सारख्या उपक्रमातून केंद्रातील सर्व शाळांमध्ये लाख रुपयांच्या निधी संकलनासह भौतिक सुविधांनी शाळा संपन्न झाल्या.
लॉकडाउननंतर विद्यार्थी मूलभूत क्षमतेमध्ये मागे पडत आहेत, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी समूह साधन गटाच्या माध्यमातून ध्यास गुणवत्तेसारखा उपक्रम प्रभावीपणे राबवला. या उपक्रमाला स्पर्धात्मक स्वरूप देऊन शिक्षकांमध्ये स्पर्धा निर्माण केली. त्यांनी केंद्र स्तरावर सुरू केलेल्या ‘मिशन स्कॉलरशिप’ उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि शिष्यवृत्तीला केंद्रातील अनेक विद्यार्थी यशस्वी झाले.
‘आमच्यासाठी आम्हीच’ या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षक संख्या कमी असलेल्या शाळेवर पालक व शिक्षक सहभागाच्या माध्यमातून स्वयंसेवक नेमून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली.
या विविध उपक्रमांबरोबरच शाळा स्तरावरील ‘एक मूल- एक झाड’, ‘अभ्यासाचं गाव सोलंकरवाडी’, ‘प्रभावी गुणवत्ता कक्ष’, ‘आदर्श समूह साधन केंद्राची निर्मिती’ असे अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग त्यांनी त्यांच्या कार्यकाळात यशस्वीपणे पूर्ण केले. त्यावेळचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनीही त्यांच्या कामाविषयी गौरवोद्गार काढले होते.
जिल्हा परिषद शाळा, सोलंकरवाडी येथे शाळेचा अमृत महोत्सव सुरू आहे. त्यानिमित्त अमृत महोत्सव शुभारंभ, निपुण भारत अंतर्गत माता पालक मेळावा, विद्यार्थी विकास निधी संकलन योजना, अभिनव अमृत कलश योजना मेळावा, माता-पिता पाद्यपूजन, माजी विद्यार्थी मेळावा, लेकीचं घर असे विविध उपक्रम शाळेत सुरू असून,
त्यांनी ग्रामस्थ व शिक्षकांच्या सहकार्याने विविध संस्था व विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करत शाळा डिजिटल केली आहे. रोख व वस्तुरूपाने जवळजवळ ४.५ लाख रुपयांचा शैक्षणिक उठाव यावर्षी त्यांनी जमा केला आहे. गड- किल्ले ट्रेकिंगची त्यांना आवड आहे. १२५ पेक्षा जास्त किल्ले ट्रेकिंग पूर्ण केले आहे.
जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती आदर्श शिक्षक पुरस्कार, कृतिनिष्ठ शिक्षक पुरस्कार, छत्रपती परिवार, मरवडे, आदर्श शिक्षक पुरस्कार, पंचायत समिती कुर्डुवाडी, राज्यस्तरीय नवोपक्रमशील शिक्षक पुरस्कार, मुक्तांगण प्रकल्प, सर फाउंडेशन सोलापूर यांचा पुरस्कार.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.