तीन वर्षांपूर्वी हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपाने चार जागांवर झेप घेत ४८ जागांवर विजय पटकावला होता. तेलंगणातील स्थानिक निवडणुकीत भाजपाचे बडे नेते तळ ठोकून होते. योगी आदित्यनाथांनीही या निवडणुकीत प्रचार केला होता. आता तीन वर्षांनंतर तेलंगणातील विधानसभा निवडणुकीतही भाजपाने एका जागेवरून सात जागांवर झेप घेतली आहे. दक्षिणेतील राज्य काबीज करण्याची स्वप्न बघणाऱ्या भाजपासाठी या निकालाचा अर्थ काय हे समजून घेऊया...
भाजपाची तेलंगणातील Strategy काय होती?
2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तेलंगणात भाजपने केवळ एका जागेवर विजय मिळवला होता. 2023 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने सातत्याने केसीआर आणि बीआरएसला लक्ष्य केले. बीआरएस ही भाजपाची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. Delhi Liqour Scam प्रकरणात बीआरएस नेत्याचे नाव होते, मात्र त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला नव्हता, ईडीच्या या दिरंगाईमागे भाजपा- बीआरएसमध्ये झालेली डील कारणीभूत असल्याचा आरोप विरोधक करत होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणामधील सभांमध्ये केसीआर यांच्यावर बोचरी टीका केली. ही टीका BJP च्या Election Strategy चा एक भाग होता, याकडे जाणकार लक्ष वेधतात.
तीन वर्षांपूर्वीच भाजपाने दिले होते संकेत
भाजपा हा सतत इलेक्शन मोडवर असणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. दुपारी दोनपर्यंत हाती आलेल्या कलानुसार तेलंगणात भाजपा सात जागांवर आघाडी आहे. ज्या राज्यात भाजपा पाच वर्षांपूर्वी एका जागेवर होता, त्या राज्यात सात जागांवर विजय मिळवणं हे भाजपाच्या फायद्याचेच आहे, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.
२०२० मध्ये झालेल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपाने ४ वरुन ४८ जागांवर झेप घेतली होती. योगी आदित्यनाथ यांच्यासारखा हिंदुत्ववादी चेहरा भाजपाने मैदानात आणला होता. ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या अंतर्गत तेलंगणातील ११९ पैकी २४ विधानसभा मतदारसंघ येतात. यावरूनच तेलंगणात भाजपाची तयारी कधीपासून सुरू होती, हे लक्षात येईल.
दक्षिणेतलं 'हिंदी' समजणारं राज्य
भाजपाला हिंदी भाषिक राज्यांमध्ये वर्चस्व निर्माण करता आलं. मात्र, अद्याप दक्षिण भारतात भाजपाला अपेक्षित यश मिळालेले नाही. तेलंगणातील मोठ्या वर्गाला हिंदी भाषा समजते. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये एखाद्या हिंदी भाषिक राज्यात जागा कमी झाल्या तरी त्याची भरपाई दक्षिणेतील राज्यांमधून करता येईल असं भाजपाचं आकड्यांचं गणित आहे. या दृष्टीने भाजपासाठी तेलंगणा विधानसभेतील सात जागाही महत्त्वाच्या ठरू शकतात.
भाजपाला अपेक्षित जागा मिळाल्या का?
तेलंगणात खरी चुरस काँग्रेस आणि बीआरएसमध्येच असेल, असे ऑक्टोबरमध्ये झालेल्या सर्व्हेमधून स्पष्ट झाले होते. भाजपालाही याचा अंदाज आला होता, असे दिसते. 'द क्विंट'ने ऑक्टोबरमध्ये दिलेल्या वृत्तानुसार, भाजपाला २५ जागांच्या अपेक्षा आहेत. सत्ता नाही मिळाली तरी किंगमेकर ठरण्यासाठी २५ जागा पुरेशा आहेत असे भाजपाच्या एका नेत्याने म्हटले होते. रविवारी झालेल्या मतमोजणीत भाजपाला सात जागांवर समाधान मानावे लागले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.