बंगळूर : कर्नाटकच्या विविध भागांत प्रत्येक पक्षाचा लक्षणीय प्रभाव राहिला असताना सूक्ष्म चित्र निर्णायक ठरेल. कित्तूर कर्नाटक विभागातील ५० मतदारसंघांमध्ये लिंगायत मते निर्णायक ठरतात. या पट्ट्यात धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) अस्तित्व कमकुवत असल्यामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्यातील मुकाबला निर्णायक ठरेल.
कित्तूर कर्नाटकला यापूर्वी मुंबई कर्नाटक विभाग म्हणून ओळखले जायचे. यात बेळगावी, धारवाड, विजयापुरा, हावेरी, गदग, बागलकोट आणि उत्तर कन्नड हे सात जिल्हे येतात. स्वातंत्र्यापूर्वी तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये हा विभाग होता. २०२१ मध्ये त्याचे कित्तूर कर्नाटक असे नामांतर करण्यात आले. कित्तूर या नावाला ऐतिहासिक संदर्भ आहे. बेळगावजवळील कित्तूर येथील राणी चन्नम्माने (१७७८-१८२९) झाशीच्या राणीपूर्वी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला होता.
विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह अनेक वरिष्ठ राजकीय नेत्यांचे मतदारसंघ या भागात आहेत. पूर्वी येथे काँग्रेसचे वर्चस्व होते. १९९०च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी तेव्हाचे लिंगायत मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर काँग्रेसकडे या समाजाने पाठ केली.
मग भाजपचे अनुभवी नेते बी. एस. येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत समाज संघटित झाला. २०१३ पर्यंत जवळपास एका दशकाहून जास्त काळ येथे भाजपला साथ मिळाली. त्यानंतर येडीयुरप्पा यांचे भाजपशी बिनसले. त्यांनी कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली. याचा काँग्रेसला फायदा झाला. या विभागातील ५० पैकी ३१ जागा जिंकून काँग्रेसने दणदणीत पुनरागमन केले. मग येडीयुरप्पा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये स्वगृही परतले. त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला. त्यामुळे भाजपला येथे पुन्हा यश मिळाले.
दिग्गजांची मोर्चेबांधणी
कित्तूर कर्नाटकमधील लिंगायत मतांसाठी दोन्ही पक्षांतील दिग्गजांनी मोर्चेबांधणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी धारवाड आणि बेळगावी अशा भागांत जाहीर सभा तसेच भव्य रोडशो घेतले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गेल्याच महिन्यात बेळगावीमध्ये युवा क्रांती संमेलनाचे आयोजन केले.
स्वतंत्र धर्माची मागणी
लिंगायत हा स्वतंत्र धर्म जाहीर करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसने लावून धरली आहे, पण त्याचा पक्षाला फारसा फायदा होत नसल्याचे दिसून येते. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे स्वतः या विभागातील बदामीमधून उभे राहिले होते. त्यांना भाजपच्या बी. श्रीरामलू यांच्याविरुद्ध निसटता विजय मिळाला. इतर काही प्रमुख नेते मात्र पराभूत झाले. यामुळे यावेळी लिंगायत मतांची या विभागात कशी साथ मिळते यावर कर्नाटकमधील समीकरण अवलंबून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.