हैदराबाद: मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला पराभवाचं तोंड बघावं लागलं असलं तरी तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. रविवारी हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसला ६५, बीआरएसला ३९, भाजपला ८, एमआयएमला ७ आणि सीपीआयला एक जागेवर विजय मिळवता आलेला आहे.
तेलंगण विधानसभा निवडणुकीत के.चंद्रशेखर राव यांच्या दहा वर्षांच्या सत्तेला शह देत काँग्रेसने राज्यात पुनरागमन केले. पक्षाच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले रेवंथ रेड्डी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.
तेलंगणमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस कार्यकारिणीने पक्षाचे कर्नाटकमधील वरिष्ठ नेते व तेलंगणमधील निरीक्षक डी. के. शिवकुमार यांच्यासह काही नेत्यांना मंगळवारी दिल्लीत बोलविले. तेथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबरोबर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.
तेलंगणमधील राज्यपाल कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने शपथविधीची तयारी सुरू केली आहे. १७५ जणांसाठी आसन व्यवस्था असलेल्या दरबार हॉलमध्ये अन्य उपस्थितांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.
दोन उपमुख्यमंत्री मिळणार?
काँग्रेस सरकारमध्ये तेलंगणला यावेळी दोन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्रिपदी रेवंथ रेड्डी यांच्यासह उपमुख्यमंत्रिपदासाठी मल्लू भट्टी विक्रमार्का आणि सीताक्का यांच्या यांची नावे चर्चेत आहेत. विक्रमार्क हे अनुसूचित जाती तर सीताक्का अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
‘बीआरएस’च्या विजयी आमदारांची बैठक
निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष के. तारक रामा राव यांनी तेलंगण भवन या केंद्रीय पक्ष कार्यालयात बैठक घेतली. ते म्हणाले, ‘‘गेल्या दहा वर्षांत ‘बीआरएस’च्या नेतृत्वाखाली अनेक योजना राबविल्या आहेत. जनतेने अन्य पक्षाला संधी दिली असली तरी आपल्या पक्षाला सन्मानजनक स्थान दिले आहे. जनतेने सोपविलेली विरोधी पक्षाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू.’’ पक्षाचे नेते के.टी.आर राव यांनीही पक्षातील नेत्यांशी चर्चा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.